सम्राट आश्विन..

गौरीगणपतीने नटलेला भाद्रपद संपला की गंधगार वारा सांगतच येतो.. आश्विन आला! आश्विन आला! दसरा आणि दिवाळी घेऊन येणारा हा आश्विन म्हणजे सुखाची पौर्णिमा! दसरा झालारे झाला की, गंधगार हवेची रूणझुण सुरू होते. ‘ताथै ताथै’ असे झुंझर नूपुर वाजवायला लागते. गारवा शिरशिरी भरायला लागतो. मध्यरात्रीनंतर सहज उठून अंगणात पाऊल टाकलं तर रात्री इकडंतिकडं अवलिासारखं भटकणारं गारठय़ाचं पिलू खेळकरपणे अंगाखांद्यावर उडी मारायला लागतं आणि अंगावर सर्रकन् काटा फुटतो. श्रवणझडीनं हिरवीगार केलेली राने आश्विनात मनसोक्त उन्हं अंगावर घेत उत्साहाने सळसळत असतात. पावसाळ्यामधील दमट हवामानामध्ये रोगराई पसरवणार्‍या  जीवजंतूंचे वारेमाप पिकलेले पीक नष्ट करण्याचं आगळंवेगळं सामर्थ्यं आश्विनातील उन्हात असतं. या उन्हात सूर्याच्या  जंतुनाशक अल्ट्राव्हायोलेट किरणांचं प्रमाण जरा जास्तच असतं. याचकरिता अंथरूणे पांघरूणे धुऊन या महिन्याच्या उन्हात वाळू घालायची पद्धत असावी. पाटावर ऐरावताचं चित्र काढून भोंडल्याचा फेर धरायची गंमत याच महिन्यातली..! ‘ऐलमा पैलमा गणेश देवा..’ अशी विविध देवदेवतांची नावे पेरलेली गाणी म्हणत भवसागराचा फेरा ईश्वरी कृपेशिवाय पूर्ण होणार नाही. याचा संस्कार आश्विन खूपच सहज करत राहतो. नवरात्रीच्या नऊमाळामध्ये मुसळधार पाऊस पाडणारा हत्ती सापडतोच यावर अजूनही गावकरी बांधवांची लाखमोलाची श्रद्धा असते. रात्ररात्र विजेच्या कडकडाटासह गडगडाट करणारा हत्तीचा पाऊस येऊन जातो, वाहणार्‍या ओढय़ातून आपली आठवण पुढे बरेच महिने ठेवत राहतो. काळाच्या ओघात ओढय़ांची पात्रेच वाहून गेल्यामुळे आणि भसाभसा पाणी उपसणार्‍या विजेच्या पंपामुळे आश्विन महिन्याचे हे ओढाळ सौंदर्य आज हरवून गेले आहे. तरीही आश्विनाने माणसाला, एक गोष्ट मात्र हिरावून घेऊ दिली नाही. आपले दुधाळ, टिपूर चांदणे..!

आकाशगंगेला दुधाचा महापूर येत राहतो. कोजागरी पौर्णिमेला हे दुधी चांदणे रानोमाळ खडकातून, मातीतून, रानातून, अंगणातून, घरांच्या झोपडय़ातून वाहात राहते. घराघरातील अंगणात रांगत रांगत समृद्धीशी नाते सांगत राहते. कोजागरी पौर्णिमेच्या रात्री साक्षात लक्ष्मी ‘कोण कोण जागे आहे.? को जागरती?’ असे विचारीत फिरत असते; असे पुराणकथांमधून सांगितले जाते. यातील श्रद्धेचा भाग थोडासा बाजूला ठेवला तरीही रोजच्या कष्टाच्या जीवनातून बाहेर पडून माणसाने टिपूर चांदणचा मनमुराद आस्वाद घ्यावा. जीवनातील कोवळे अमृतकण वेचावेत. ताजे-टवटवीत व्हावे. शीतल चांदणे धारण करून नवथर चैतन्य श्वासा-श्वासात भरावे, यासाठी कोजागरीला चंद्र पृथ्वीच्या खूप जवळ येतो. आपल्या मातेला कोटीकरांनी कृतज्ञतेने वंदन करीत असतो. अशा दुधाळ चांदण्यात आटवलेल्या केशरदुधासारखे स्निग्धामृत प्यावे आणि येणार्‍या थंडीमध्ये  त्वचेची निगा राखण्यासाठी त्वचेच्या आतील थरातच कोल्डक्रीम तयार व्हावे अशीच संस्कृतीची योजना असावी. नित्यनवीन ऊर्जा देणारा हा आश्विन सरता सरता निरोप घेतानाही आपल्या जीवनात दिवेलागण करून जातो. पुढील वर्षी येण्याचे वचन देऊन काळाच्या प्रवाहात गुप्त होताना अमावास्येलाही प्रकाशाच्या साठवणीची आठवण देतो. 

तेजस्वी उन्हाने वसुंधरेच्या हिरव्या वस्त्रांना वेगळी-आगळी झळाळी देणारा, समृद्ध‍ीच्या   वाटेवर जगन्मातेची उपासना करायला सांगणारा, अंधार दूर करून तेजाची आरती शिकवणारा, प्रकाशाचे वेड घेऊन जगणार्‍यांच्या जीवनात आपोआप समृद्ध‍ी येते, असा संदेश देणारा आश्विन बारा महिन्यात वेगळा उठून दिसतो. सम्राट आश्विन होऊन मनात रेंगाळत राहातो. 

दीपक कलढोणे 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती