शिवाजी महाराजांच्या मैत्रीखातर प्राण पणाला लावणारे तानाजी

शनिवार, 1 ऑगस्ट 2020 (15:10 IST)
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल तर आपण ऐकले असेल परंतू त्यांचे बालपणाचे मित्र आणि महाराजांच्या अतिशय विश्वासातील साथीदार होते तानाजी मालुसरे. ‍त्यांना महाराजांचा उजवा हात म्हणायचे. महाराजांच्या प्रत्येक संकटाच्या काळात तानाजींनी मोलाची साथ दिली होती.
 
जेव्हा महाराजांनी किल्ले हाती घेण्याची मोहीम चालवली तेव्हा प्रत्येकवेळी तानाजी आघाडीवर होते. शिवाजी महाराजांच्या सैन्यात अनेक शूरवीर असतानाही जेव्हा कोंढाणा जिंकून आणण्याची वेळ आली तर महाराजांच्या मनात एकच नाव होते ते म्हणजे तानाजी मालुसरे.
 
इतिहासातील हे युद्ध सिंहगडची लढाई म्हणून नोंदवले गेले आहे. तेव्हा ते कोंढाणा म्हणून ओखळले जात होते. शिवाजी महाराजांचे परममित्र तानाजी मालसुरे आपल्या मुलाच्या लग्नाच्या तयारीत व्यस्त असताना हे सर्व घडले होते. कोंढाणा किल्ल्यासह 23 किल्ले पुरंदर करारामध्ये मुघलांना सोपविल्यानंतरही मोगल सल्तनत तहान भागली नव्हती. औरंगजेबाने आपला विश्वासू उदयभानु राठोड यांना कोंडाणा किल्ल्याकडे पाठवून मराठा साम्राज्य नष्ट करण्याचा नेम धरला होता.
 
तेव्हा शिवाजी महाराजांना आपल्या शूर व प्रिय मित्राला युद्धाच्या घटनेत सामील करायचे नव्हते, कारण तानाजीच्या घरी लग्नाची तयारी सुरु होती. पण स्वराज्य आणि शिवाजी महाराजावर संकट आल्याचे कळले तर तानाजींनी मुलगा रायबाच्या लग्नाची पर्वा न करता भगवा परिधान केला. अत्यंत कठीण प्रसंगी राज्यासाठी कामास येण्यापेक्षा मोठे भाग्य काय असावे असा विचाराने तानाजींची छाती गर्वाने फुलून गेली.
 
आधी लग्न उरकून घेऊ, मग कामगिरीसाठी निघू असे शेलार मामांनी म्हटल्यावर तानाजींनी उत्तर दिले की आधी लगीन कोंढाण्याचे मग लगीन रायबाचे. तानाजी जिजाऊंना भेटून रायबाची जबाबदारी शिवाजी महाराजांच्या हाती देऊन म्हणाले की कोंढाण्याहून परतलो तर मी मुलाचे लग्न लावेन आणि जर मेलो तर तुम्ही त्याचे लग्न लावून द्या.
 
4 फेब्रुवारी 1670 रोजी तानाजी मालुसरे यांच्या नेतृत्वाखाली राजगडावरुन मराठा सैन्य निघाले. आपले प्राण पणाला लावून कोंढाणा ताब्यात घेतला. महाराजांना विजयाची बातमी कळताच आनंद झाला पण तानाजींनी प्राण गमावले कळताच त्यांचे अश्रु अनावर झाले आणि त्यांच्या तोंडून उद्गार निघाले- गड आला पण सिंह गेला...

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती