Friendship Day : घट्ट मैत्रीचा फंडा...

मैत्री म्हणजे नवं नातं.. नातं असं असतं की ते जपण्यासाठी आपण जिवाचीही पर्वा नाही करत. ते टिकवण्यासाठी आपल्याला अनेकदा आपल्या आयुष्यात तडजोड करावी लागते. पण ते खरंच टिकवायचं असेल तर.. तर काही नियम आपल्या मनाशी घट्ट बाळगा आणि मग पाहा आपला मैत्रीचा प्रवास कसा फुलतो ते.....

* मैत्री करताना कोणतेही भेदभाव पाळू नका.
*आपल्या मित्र मैत्रिणींना कधीही त्यांची जात विचारू नका.
* मित्र मैत्रिणींचा वाटदिवस कधी विसरू नका.
* मैत्री करताना कोणतीही अट आपल्या मित्राला घालू नका.
* काही प्रसंगी तुम्ही मित्रासाठी काही तडजोड करत असाल तर, त्याच्या फुशारक्या चारचौघात किंवा कट्ट्यावर मारू नका.
* मित्रावर दडपण येईल असे कोणतेही काम त्याला सांगू नका.
*मैत्रीत व्यवहार नसलेलाच बरा. आणि असा कधी व्यवहार करण्याची वेळच जर तुमच्यावर आली तर तो व्यवहार तंतोतंत पाळा.
* तुमची मैत्री एखाद्या मुलीशी झाली असेल तर तिला समजून घेण्याचा प्रयत्न करा. (मुलींसाठीही हाच नियम महत्त्वाचा आहे)
* मित्रांकडून आवाजवी अपेक्षा करू नका.
*मित्राच्या भिडेखातर कोणतेही व्यसन स्वतःला लागू देऊ नका. त्याने आग्रह केला तरी त्याला विनंती करून त्याचा आग्रह टाळा.
* आपल्या मित्र-मैत्रिणींना कमी लेखू नका.

*मित्रांचीही कॅटॅगिरी करा.
अ. काही मित्र हे आपल्याला ओळखीपुरतेच बरे असतात.
ब. काही मित्रांना घरापर्यंत न्यावे. घरातल्यांची ओळख करून द्यावी.
क. काही जणांशी सुसंवाद वाढवत त्यांच्या कुटुंबाविषयी माहिती करून घ्या.
ड. काही जणांना आपली गुपितं सांगा, यामुळे मनावरचा ताण कमी होण्यास मदत होते.
इ. आपण सांगितले म्हणून आपल्या मित्राने त्याची गुपितंही आपल्याला सांगावीत हा आग्रह सोडा. अशाने संबंधांमध्ये दुरावा निर्माण होण्याची शक्यता अधिक असते.

* मित्रांच्या स्वभावानुसार त्यांच्याशी संबंध वाढवा.
*मैत्रीच्या प्रवासात अनेक जण स्वार्थासाठी आपल्याशी मैत्री करत असतात. अशा स्वार्थी प्रवृत्तीच्या मित्रांपासून दूर राहा.
* मित्रांशी गप्पा मारताना कधीही आपल्या कुटुंबीयांच्या ऐपतीचा उल्लेख अथवा आपण किती श्रीमंत आहोत याची जाणीव होऊ देऊ नका.
* तुमच्या मित्रांमधील चांगले गुण घेण्याचा प्रयत्न कराच, परंतु त्याच्यातील वाईट गुणांची त्याला जाणीव करून द्या. शक्यता असेल तर ते बदलण्यासाठी त्याला भाग पाडा.

* मैत्रिणींशी जवळीक करण्याचा प्रयत्न टाळा.
* मैत्रीचं नातं हे पवित्र असतं, असं केवळ म्हणू नका, आचरणात आणायचाही प्रयत्न करा.
*मित्रावर एखादे संकट कोसळले आहे, याची माहिती त्याने तुम्हाला आधी का कळवली नाही हा टेप वाजवण्यापेक्षा त्याला त्वरित कोणत्या प्रकारची मदत देणे शक्य आहे ते पाहा, आणि कामाला लागा.
*मुलींचा मित्र म्हटलं की घरातील मंडळींच्या कपाळावर आट्या पडणे साहजिकच आहे, परंतु अशा प्रसंगी आपल्या मैत्रिणींच्या कुटुंबीयांची ओळख करून घेत त्यांचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न करा.
*शक्यतो कट्ट्यावर आपल्याच ग्रुपमधील मित्र-मैत्रिणींचे अफेर वगैरे आहे, या गप्पा करणे टाळा.
* काही प्रसंगी मुली कितीही बोल्ड असल्या तरी त्यांना नमते घेत तुम्ही दिलेल्या ऑफर्सला नकार देणे भाग पडते, अशा प्रसंगी त्यांना समजून घ्यायला शिका. त्यांच्याविषयी गैरसमज टाळा.
*मुलींनीही आपल्या मित्रासोबत मैत्री करताना काही प्रसंगी अंतर ठेवणेच चांगले असते.
* मैत्रीची ऑफर जर कोणी देत असेल, तर त्याचा त्या मागील दृष्टिकोन काय? त्याचा स्वभाव कसा आहे? याची खात्री झाल्याखेरीच मैत्रीसाठी हात पुढे करू नका.
* इंटरनेटचे जग सध्या वेगाने वाढत आहे, अशा प्रसंगी जर तुम्हाला कोणी नेटच्या माध्यमातून किंवा इ-मेलच्या माध्यमातून मैत्रीची ऑफर दिली, तर पटकन निर्णय घेऊ नका. इंटरनेटवर देण्यात येणारी माहिती खरी असतेच असे नाही.
*मिस कॉल येत असेल तर अशा प्रसंगी घरातील मंडळींना ही माहिती द्या. फोनवरून कोणतीही मैत्रीची ऑफर स्वीकारू नका.
* आपल्याला घरी जाण्यास उशीर जरी झाला तरी घरातील सर्वांना आपल्या प्रत्येक मित्राविषयी अथवा मैत्रिणींविषयी माहिती द्या.
*मैत्रीत कधीकधी आकर्षणही असतंच.. अशा प्रसंगी स्वतः:च्या मनाला सावरायला शिका.
*एखादा मित्र अथवा मैत्रीण आवडायला लागली तर त्यांचा तेवढा आदर करून त्यांना हे स्पष्टपणे सांगा. त्याने अथवा तिने घेतलेल्या निर्णयाचा आदरही करा.
*मी तुला केवळ मित्र मानतो, बाकी काही नाही, असा पाढा नेहमीच वाचने मैत्रीसाठी घातक ठरू शकते.
* एखाद्या विषयी मित्र अथवा मैत्रीण करण्याची ओढ असली तरी त्याच्या मर्जी शिवाय मैत्रीचा अट्टहास धरू नका.

असे अनेक नियम आपण मैत्री करताना पाळावेत. यातूनच आपल्याला एक सच्चा दोस्त मिळू शकतो. मैत्री हे असे एक रसायन आहे की ज्यात आपण कोणताही रंग मिसळला तरी त्याचा रंग बदलतो. उदाहरण द्यायचेच झाले तर आपण मैत्रिणीला किंवा मित्राला आपली गुपितं सांगितली की आपली मैत्री अधिक घट्ट होतेच शिवाय त्याचा रंगही पक्का होतो. पाहा तर हे करून आणि मग पाहा कसा होतो आपला प्रवास......

वेबदुनिया वर वाचा