एक अनुभव आणि अनुभूती : दासबोध अभ्यास वर्ग, शिवथर घळ - २०१९

सौ स्मिता देशपांडे

सोमवार, 19 ऑगस्ट 2019 (16:19 IST)
एक अनुभव आणि अनुभूती 
सह्याद्री च्या पर्वत रांगा. हिरव्यागार. सतत कोसळणारा पाऊस. पवित्र शिवथर घळ. तेथे वाहणारा प्रपात.. रौद्र रूप. महाकाय.
गिरीचें मस्तकी गंगा | तेथुनि चालली बळें |
धबाबा लोटती धारा | धबाबा तोय आदळें|| 
 
समर्थ रामदास स्वामींच्या महान कार्याची सतत ग्वाही आणि जागृती देणारा. अशा पवित्र वातावरणात ७ दिवस चालणारा ज्ञानयज्ञ.
शिबिराला जायचे ठरले आणि आम्ही सगळ्या (११ जणी) तयारी ला लागलो. सोबत इतर साधक वर्ग होताच. २७ जुलै ते 3 ऑगस्ट २०१९
अनेक सत्रात हा वर्ग होतो. सकाळी ४वाजता उठायचे.  ५.३० पासून वर्गाला सुरवात. उपनिषदातील योग साधना. प्रातः प्रार्थना, दासबोध वाचन, निरूपण, भटकंती, सायं प्रार्थना आणि आनंद मेळा अशी दिनचर्या.
 
अलका ताई मुतालिक, माधुरी ताई जोशी, डॉ शुभदा जोशी आणि सुहास दादा जावडेकर यांचे दासबोध व अनेक विषयांवर सुंदर निरूपण आणि समज. गायत्री, सावित्री आणि सरस्वती अशी या गुरू भगिनींना दिलेली उपमा अगदी योग्य आहे.
 
पद्मजा ताई आणि मधुरा ताईच्या सुंदर, मधुर आवाजात त्या पवित्र वातावरणात होत असलेली प्रार्थना अजूनही कानात गुंजते आहे. आणि योगासने घेणार्‍या मृदुला ताई तर फारच गोड. अगं काहीतरी करा पण करा असे प्रेमाने सांगणार्‍या.
अन्न हे पूर्णब्रह्म | त्या प्रसादाची काय वर्णू कथा
जैसा अन्न खाए वैसा मन होये। 
जैसा पानी पिये वैसी वाणी बोले।। 
या उक्तीप्रमाणे सात्त्विक भोजन आणि शुद्ध पाणी इथे मिळते. 
दासबोध मधील काही समास यावर निरूपण आणि विचार.
 दास होतो म्हणून दासबोध. दास झाला म्हणून बोध झाला.
समर्थांची प्रस्थान त्रयी - दासबोध, मनाचे श्लोक आणि आत्माराम
दासबोधात समर्थ पितृभूमिकेत
मनाचे श्लोक मध्ये मातृभूमिकेत
आत्माराम मध्ये गुरूभूमिकेत आहेत.
 
अशा अनेक भूमिकेतून समर्थाचे कार्य समजावण्यात आले. मुंबई विद्यापीठाच्या तत्त्वज्ञान विभागाच्या प्रमुख डॉ. शुभदा जोशी यांचे या वर्षी प्रथमच मार्गदर्शन साधकांना लाभले. वेद आणि दासबोध याची उत्तम सांगड घालत अनेक व्यावहारिक उदाहरणे देत ताई नी विचार समजावले. Human Rightsला संस्कृत शब्द नाही. कारण आम्ही व्यक्ती स्वातंत्र्यावर नाही तर समाज स्वातंत्र्यावर विश्वास ठेवतो हा विचार ताईने परखडपणे मांडला. इतर भाषा जरूर शिका पण मातृभाषेचा आग्रह. 
ग्रंथाचे सहा आधार-
उपक्रम, अभ्यास, अपूर्वता, ग्रंथ फळ, युक्ती आणि अंतरंगात बदल होणे. हेच दासबोधाचे फळ. याची समज दिली. चिंता करायची की चिंतन? चिंता परमार्थाची करायची आणि चिंतन परमात्म्याचे करावे हे अलका ताईने सुंदर, सहज शब्दात सांगितले. मामा गांगल, डॉ. काका देशमुख, मंदा ताई गाढे यांची आठवण व विचार साधकांना मिळत होते.
नवविधा भक्ती मधील नामस्मरण माधुरी ताई च्या शांत आवाजात सर्वांना भावले. 
सुहास दादा जावडेकर हे दासबोध कार्याला वाहिलेले अष्टपैलू व्यक्तिमत्त्व. दासबोध, भगवद्गीता, इतिहास, राजकारण,योगसाधना, नाटक या व अनेक विषया चा सखोल अभ्यास आणि त्या क्षेत्रात सक्रिय सहभाग. ज्ञान कर्म भक्तीचा संगम. 
या वर्षी विशेष भाग्याचे म्हणजे सज्जनगड येथील प्रमुख परम पूज्य योगेश बुआ यांचे दोन दिवस मार्गदर्शन. सहज, सुलभ आणि अतिशय थोडक्यात योग्य ते मार्गदर्शन बुवा ना फारच छान जमते. धन्य पावलो. 
सावरकर प्रेमी, सखोल अभ्यासक मातृभाषेचा जाज्वल्य अभिमान असलेले श्री विद्याधर नारगोळकर काका यांनी तुलनात्मक पद्धतीने समर्थ आणि सावरकर समजावले. काय ते तप, अभ्यास. आणि या ही वयात काका महिनाभर घळीत सेवेला आलेले आहेत. 
शिबीर प्रमुख हर्षल बर्वेचे उत्तम आयोजन. युवा पिढीला अशा कार्यात समरस होताना बघून विशेष आनंद होतो. 
सगळीकडे शिस्त इथे अनुभवायला मिळते. या भूमीची पवित्रता इथे सांभाळली जाते. समर्थाचे विचार जोपासले जातात. ते कार्य पुढे नेण्याचे, मानवता, संस्कृती जोपासण्याचे काम केले जाते ते ही सेवा भावनेने. 
या पुण्य, निसर्गाने नटलेल्या भूमीत जाण्याचे भाग्य मिळाले ते केवळ आई, वडिलांच्या पुण्याईने.
या वर्षी मी, माझी बहीण क्षमा, मावशी मेघा, मामी वर्षा, मैत्रिणी शुभांगी, मैथिली, कल्पना, वैजु ताई, हेमा, कांचन, माधुरी, अर्चना असा छान ग्रुप जमला. केवळ 3,4 तास आम्ही झोप घेत असू. पण उत्साह रोज वाढत होता. 
श्रीराम जयराम जय जय राम हा १३ अक्षरी बीज मंत्र खूप काही देतो. भूमिका तशी हवी. 
ज्योतीने ज्योत लावायची ही शिकवण. 
"हे ही दिवस जातील" हा विश्वास आणि धडा. 
"जाणते व्हा" ही समज. 
सर्वांना समजेल अशा शब्दात सांगायचे तर 
Know the System
Use the system 
Get Result 
Forget the System... 
हे मंतरलेले दिवस आहेत. अंतरंग भारावले आहे. आम्हा कडून पण असे सांस्कृतिक कार्य होऊ दे ही समर्थ चरणी प्रार्थना. 
या ठिकाणी ज्यांनी सेवा दिली त्या सर्वांना विनम्रतापूर्वक नमस्कार 
 
विश्रांती वाटते तेथे | जावया पुण्य पाहिजे |
कथा निरूपणे चर्चा | सार्थके काळ जातसे||
जय जय रघुवीर समर्थ 
 
साधक 
सौ स्मिता देशपांडे 
शारजाह 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती