क्रिकेट वर्ल्ड कप : गतविजेत्या इंग्लंडच्या धक्कादायक घसरणीचं काय कारण आहे?

गुरूवार, 26 ऑक्टोबर 2023 (22:28 IST)
‘मी हे यापूर्वी अनेकदा सांगितलंय. आम्ही स्वत:ला गतविजेते म्हणून पाहत नाही.’
 
इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरनं 2023 ची क्रिकेट विश्वकप स्पर्धा सुरू होण्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत हे विधान केलं होतं.
 
इंग्लंडचा या स्पर्धेतील पहिल्या पाच सामन्यानंतरचा खेळ पाहिल्यानंतर चार ही खरंच गतविजेती टीम आहे का? हा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना सतावतोय.
 
‘आम्ही इथं काही तरी नवं करण्याचा प्रयत्न करणार आहोत.’ असंही बटलरनं त्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं. आपल्या कर्णधाराचं हे विधानही त्याचा संघ खरं करून दाखवतोय.
 
इंग्लंडची धक्कादायक घसरण
चार वर्षात आयसीसीच्या दोन स्पर्धा जिंकणाऱ्या इंग्लंडची भारतामध्ये सुरू असलेल्या विश्वकप स्पर्धेत अभूतपूर्व घसरण झालेली आहे.
 
वन-डे विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात आजवर कधीही गतविजेत्या संघानं पहिल्या पाच पैकी चार सामने गमावले नव्हते.
 
या विश्वचषक स्पर्धेपूर्वी इंग्लंडचा कधीही अफगाणिस्तान विरुद्ध पराभव झाला नव्हता.
 
जोस बटलरचा संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 229 धावांनी पराभूत झाला. हा वन-डे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठा पराभव आहे.
 
‘आम्ही इथं काही तरी नवं करण्याचा प्रयत्न करणार आहोत.’ हे कर्णधार बटलरचं वाक्य त्यांच्या टीमनं वेगळ्या पद्धतीनं खरं करून दाखवलंय.
 
कसे झाले होते चॅम्पियन?
2015 साली झालेल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत इंग्लंडला पहिल्याच फेरीत गाशा गुंडाळावा लागला होता. बांगलादेश विरुद्धचा तो पराभव जगाला क्रिकेट शिकवणाऱ्या टीमच्या चांगलाच जिव्हारी लागला.
 
या पराभवानंतर इंग्लंडनं त्यांच्या क्रिकेट खेळण्याच्या पद्धतीमध्ये बदल केला. इऑन मॉर्गन या आक्रमक फलंदाजाला कर्णधार म्हणून पूर्ण स्वातंत्र्य दिलं.
 
मॉर्गननं 2019 चा विश्वचषक डोळ्यासमोर ठेवून टीममध्ये बदल केले. जोस बटलर, बेन स्टोक्स, जॉनी बेअरस्टो, जेसन रॉय मोईन अली, असे आक्रमक खेळाडू इंग्लंडच्या कोअर टीमचा भाग बनले. प्रत्येकाला खास भूमिका देण्यात आली होती.
 
2015 ते 2019 या कालावधीमध्ये इंग्लंडनं 88 एक दिवसीय सामने खेळले. या सामन्यात इंग्लिश टीमनं 34 खेळाडूंना संधी दिली. या सामन्यांमधून प्रमुख 13 खेळाडूंची कोअर टीम निश्चित करण्यात आली.
या 13 खेळाडूंनी 2019 च्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेपूर्वी किमान 40 तर कमाल 83 एकदिवसीय सामने खेळले होते.
 
मॉर्गनच्या संघानं 2019 पूर्वीच्या चार वर्षात 20 पैकी 15 द्विपक्षीय एकदिवसीय मालिका जिंकल्या होत्या. त्यामुळे इंग्लंडमध्ये विश्वचषक स्पर्धा सुरू होण्यापूर्वी ती टीम नंबर 1 होती. संघातील प्रत्येकाचा पुरेसा सराव झाला होता. प्रत्येकाला आपला नेमकी भूमिका माहिती होती.
 
सर्वात मोठं कारण
2015 ते 2019 या कालावधीमध्ये केलेल्या गृहपाठाच्या आधारावर मॉर्गनच्या टीमनं वन-डे विश्वचषक स्पर्धा जिंकली. या ऐतिहासिक विजेतेपदानंतर इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाचं (ECB) धोरण बदललं.
 
2019 ते 2023 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या दरम्यान इंग्लंडनं फक्त 42 एकदिवसीय सामने खेळले आहेत.
 
या सामन्यात 44 खेळाडूंना संधी देण्यात आली. त्यामधील फक्त 8 खेळाडू निम्मे सामने खेळले आहेत. मागील चार वर्षात सर्वाधिक 32 सामने खेळणाऱ्या जेसन रॉयला विश्वचषक स्पर्धा सुरू होण्याच्या काही आठवडे आधी संघातून वगळण्यात आलं.
 
2019 मधील संपूर्ण विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडनं फक्त 13 खेळाडू खेळवले. या विश्वचषकातील पहिल्या चार सामन्यातचं सर्व 15 खेळाडूंना मैदानात उतरवण्यात आलं.
 
दक्षिण आफ्रिका विरुद्ध मुंबईत झालेल्या सामन्यात तर संपूर्ण बॉलिंग अटॅकच बदलला. वन-डे क्रिकेटला मिळालेलं कमी महत्त्व आणि टीममध्ये होणारे मोठे बदल हे इंग्लंडच्या सध्याच्या अवस्थेचं मुख्य कारण आहे.
 
मुलभूत प्रश्न कायम
विश्वचषक स्पर्धेसाठी निवड झालेल्या 15 पैकी सर्वोत्तम 11 कोण? नाणेफेक जिंकल्यानंतर काय निर्णय घ्यायचा? या मुलभूत प्रश्नांचं उत्तर इंग्लिश टीमला स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात सापडलेलं नाही.
 
एका सामन्यात त्यांनी फलंदाजी बळकट केली. अष्टपैलू खेळाडूंना मैदानात उतरवलं. तर पुढील सामन्यात यू टर्न घेत स्पेशालिस्ट खेळाडूंना संधी दिली.
 
मुंबईतील सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याच्या जोस बटलरच्या निर्णयावरही चांगलीच टीका झाली होती.
 
या टीकेनंतर बेंगळुरूत बटलरनं निर्णय बदलत प्रथम फलंदाजी करण्याचं ठरवलं. या निर्णयाचा निकालावर काहीही परिणाम झाला नाही.
 
3 आठवड्यात बदललं चित्रं
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील सामन्यानं विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला सुरूवात झाली. त्यानंतरच्या तीन आठवड्यात जोस बटलरच्या संघाला चार मोठे पराभव स्विकारावे लागले आहेत.
 
न्यूझीलंड, अफगाणिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका या चार संघाविरुद्ध झालेल्या पराभवानंतर गतविजेत्यांच्या मर्यादा उघड झाल्या आहेत.
 
 इंग्लंडच्या क्रिकेट संघातील खेळाडूंचं सरासरी वय हे 31.8 वर्ष आहे. या विश्वचषक स्पर्धेतील ही सर्वात वृद्ध टीम आहे. ‘या खेळाडूंचा सर्वोत्तम कालखंड आता संपलाय.’ ही जाणीव प्रत्येक पराभवानंतर क्रिकेट चाहत्यांना होतीय.
 
एका पर्वाची समाप्ती
2019 च्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेविरुद्धच्या पराभवानंतर इंग्लंडचं स्पर्धेतील आव्हान धोक्यात आलं होतं. मागील वर्षी झालेल्या टी20 वर्ल्ड कपमध्ये आयर्लंडनं त्यांचा पराभव केला.
 
यावर्षीच्या अ‍ॅशेस मालिकेत ऑस्ट्रेलियानं 2-0 अशी आघाडी घेतली होती. या सर्व महत्त्वाच्या स्पर्धेत पहिल्या टप्प्यातील पिछेहाटीनंतर उत्तरार्धात इंग्लिश टीमनं जबरदस्त उसळी मारली होती.
 
या स्पर्धांमध्ये पहिल्या टप्प्यात पराभव झाला असला तरी इंग्लंडचा संघ विजयापासून दूर नव्हता. या स्पर्धेतील पाचपैकी चार सामन्यात ते विजयाच्या जवळपासही नव्हते.
 
अन्य स्पर्धा आणि या विश्वचषक स्पर्धांमधील पराभवांमध्ये हा मोठा फरक आहे. या फरकामुळेच इंग्लंड क्रिकेटमधील वैभवशाली पर्वाची समाप्ती होण्याच्या मार्गावर आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती