AUS vs ENG: इंग्लंडचं विश्वचषकातील आव्हान संपुष्टात, ऑस्ट्रेलियाचा सेमी फायनल प्रवेश निश्चित?

शनिवार, 4 नोव्हेंबर 2023 (23:15 IST)
ऑस्ट्रेलियानं पारंपारिक प्रतिस्पर्धी इंग्लंडचा 33 धावांनी पराभव केलाय. विश्वचषक स्पर्धेतील इंग्लंडचा हा सलग पाचवा पराभव आहे. या पराभवानं इंग्लंडचं स्पर्धेतील आव्हान आता संपुष्टात आलंय. तर ऑस्ट्रेलियाचा सेमी फायनलमधील प्रवेश निश्चित झालाय.
 
ऑस्ट्रेलियाचा लेग स्पिनर अ‍ॅडम झम्पा या विजयाचा हिरो ठरला. त्यानं 10 ओव्हर्समध्ये फक्त 21 धावा देत बेन स्टोक्स, जोस बटलर आणि मोईन अली या तीन महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या.
 
या स्पर्धेत फॉर्मात नसलेल्या इंग्लंडच्या फलंदाजांनी 287 धावांचं पाठलाग करण्याचा जोरदार प्रयत्न केला.
 
इंग्लंडकडून बेन स्टोक्स, दाविद मालन यांनी अर्धशतक झळकावलं. मालननं 50 धावा केल्या. तर बेन स्टोक्सनं सर्वाधिक 64 धावांची खेळी केली.
 
मोईन अलीनं 43 बॉलमध्ये 42 धावा केल्या. ख्रिस वोक्सनंही 32 धावांची खेळी करत प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. पण, इंग्लंडच्या एकाही फलंदाजाला मोठी धावसंख्या करता आली नाही.
 
जॉनी बेअरस्टो पहिल्याच बॉलवर शून्यावर बाद झाला. तर ज्यो रूट (13) आणि कर्णधार जोस बटलर (1) , लियाम लिव्हिंगस्टोन (2) या प्रमुख फलंदाजांनी पुन्हा निराशा केली.
 
ऑस्ट्रेलियाकडून अ‍ॅडम झम्पानं 3, मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स आणि जॉश हेझलवूड यांनी प्रत्येकी 2 तर मार्कस स्टॉईनिसनं 1 विकेट घेतली.
 
ऑस्ट्रेलिया सेमी फायनलमध्ये?
इंग्लंडविरुद्धच्या विजयानंतर ऑस्ट्रेलियाचे 7 सामन्यानंतर 10 पॉईंट्स झाले असून त्यांचा सेमी फायनलमधील प्रवेश जवळपास निश्चित झालाय.
 
ऑस्ट्रेलियाचे आता अफगाणिस्तान आणि बांगलादेशविरुद्धचे सामने शिल्लक आहेत. या दोन्ही पैकी एक सामना जिंकला तरी ऑस्ट्रेलियाच्या उपांत्य फेरीतील प्रवेशावर शिक्कामोर्तब होईल.
 
दुसरिकडं इंग्लंडचे सात सामन्यानंतर फक्त 2 पॉईंट्स असून पॉईंट टेबलमध्ये गतविजेते शेवटच्या क्रमांकावर आहेत.
 
कशी होती ऑस्ट्रेलियाची इनिंग ?
 
त्यापूर्वी ऑस्ट्रेलियानं पहिल्यांदा फलंदाजी करताना 286 धावा केल्या होत्या. मार्नस लबुशेनचं अर्धशतक हे ऑस्ट्रेलियाच्या इनिंगचं मुख्य वैशिष्ट्य ठरलं.
 
ऑस्ट्रेलियाची या सामन्यात सुरूवात खराब झाली. ट्रेव्हिस हेड 11 आणि डेव्हिड वॉर्नर 15 धावांवर बाद झाले.
 
सलामीवीर झटपट परतल्यानंतर स्टीव्ह स्मिथ आणि मार्नस लबुशेन यांनी ऑस्ट्रेलियाची इनिंग सावरली. त्यांनी तिसऱ्या विकेटसाठी 75 धावांची भागिदारी केली. ऑस्ट्रेलियनच्या डावातील ही सर्वोच्च भागिदारी ठरली.
 
स्टीव्ह स्मिथ 44 धावांवर बाद झाला. तर लबुशेननं या स्पर्धेतील दुसरं अर्धशतक झळकावताना 71 धावा केल्या.
 
स्मिथ-लबुशेन परतल्यानंतर कॅमेरॉन ग्रीन आणि मार्कस स्टॉईनिस यांनी सहाव्या विकेटसाठी 45 धावांची भागिदारी केली.
 
स्टॉईनिसनं 35 धावा केल्या तर ग्रीनचं अर्धशतक 3 धावांनी हुकलं. लेग स्पिनर अ‍ॅडम झम्पानं 19 बॉलमध्ये 29 धावा करत ऑस्ट्रेलियाच्या धावसंख्येला हातभार लावला.
 
इंग्लंडकडून ख्रिस वोक्सनं सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. आदिल रशीद आणि मार्क वूड यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेत वोस्कला उत्तम साथ दिली. डेव्हिड वायली आणि लियाम लिव्हिंगस्टोन यांना प्रत्येकी 1 विकेट मिळाली.
 




Published By- Priya Dixit 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती