सर्वात आव्हानात्मक विश्वचषक

बुधवार, 22 मे 2019 (15:58 IST)
2019 ची आयसीसीची विश्वचषक क्रिकेट स्पर्धा ही सगळ्यात कठीण आणि आव्हानात्क असेल. कारण ही एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा आहे, असे मत भारताचा कर्णधार विराट कोहली याने व्यक्त केले आहे.
 
आतापर्यंत मी ज्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत खेळलो आहे, त्यात मी खेळाडू म्हणून खेळलो होतो. पण आता मात्र मी कर्णधार म्हणून संघाचे नेतृत्व करणार आहे. त्यामुळे हा विश्वचषक नक्कीच आव्हानात्मक असणार आहे, असे विराट याने सांगितले. यंदाचा विश्वचषक हा इंग्लंडमध्ये खेळला जाणार आहे. त्यासाठी प्रयाण करण्याआधी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत तो बोलत होता. या वेळी प्रशिक्षक रवी शास्‍त्री हेदेखील उपस्थित होते.
 
आमचा संघ हा अत्यंत समतोल आहे. त्यामुळे खेळावर लक्ष केंद्रित करून चांगली कामगिरी करणे हेच यंदाच्या विश्वचषकातील आमचा उद्देश आहे. जो संघ दडपणाचा चांगला सामना करू शकेल, तोच संघ विश्वचषक स्पर्धेत चांगली कामगिरी करू शकेल असा मला विश्वास आहे. इंग्लंडमधील वातावरणापेक्षाही सामन्याचा आणि स्पर्धेचा दबाव पेलणे महत्त्वाचे असणार आहे. आमचे सगळे गोलंदाज हे ताजेतवाने आहेत. कोणताही गोलंदाज थकलेला नाही. चार षटके फेकल्यानंतर कोणताही गोलंदाज थकलेला दिसला नाही. 50षटकांच्या सान्यातही गोलंदाजांना ताजेतवाने ठेवणे आणि त्यांच्याकडून चांगली कामगिरी करून घेणे हे आमचे ध्येय असणार आहे, असे विराटने स्पष्ट केले.
 
इंग्लंडमध्ये क्रिकेट खेळणे हे खूप वेगळे असणार आहे. आम्ही विश्वचषकात पूर्ण क्षमतेने खेळू. दबावातही आम्ही चांगली कामगिरी करू. किंबहुना ते आम्हाला करावेच लागले. एकदिवसीय क्रिकेट सामने आणि टी-20 क्रिकेट यात खूप फरक आहे. 
 
कुलदीपला आपीएलमध्ये चांगली कामगिरी करता आली नाही, हे चांगले झाले. कारण हे जर विश्वचषकात झाले असते तर सुधारणेला वाव नव्हता. पण आपीएलमध्ये त्याची कामगिरी खराब झाली. त्यामुळे आता त्याला नक्की कोणत्या गोष्टीत सुधारणा करायची हे समजले आहे. तो विश्वचषकात चांगली कामगिरी करेल, असा विश्वास विराटने व्यक्त केला.
 
रवी शास्त्री म्हणाले की, भारताच्या खेळाडूंना या स्पर्धेत चांगली कामगिरी करण्याची संधी आहे. कोणताही संघ कोणालाही हरवू शकतो. विंडीज किंवा बांगलादेश हे संघ 2015 ला जसे होते, त्यापेक्षा आता फारच वेगळे आणि सुधारित दिसत आहेत. अशा वेळी महेंद्रसिंह धोनी याची संघातील भूमिका महत्त्वाची असणार आहे. एकदिवसीय
 
क्रिकेटमध्ये धोनी अत्यंत अनुभवी आहे. महत्त्वाच्या सामन्यांना कलाटणी देण्याचे काम अनेकदा त्याने केले आहे. धोनी यंदाच्या विश्वचषकात महत्त्वाचा खेळाडू ठरेल, असेही शास्त्री म्हणाले.
 
भारताचा संघ पाच जून रोजी दक्षिण आफ्रिकेविरुध्द पहिला विश्वचषक सामना खेळणार आहे. त्यानंतर 9 जून (ऑस्ट्रेलिया), 13 जून (न्यूझीलंड), 16 जून (पाकिस्तान), 22 जून (अफगाणिस्तान), 27 जून (वेस्ट इंडीज), 2 जुलै (बांगलादेश), 6 जुलै (श्रीलंका) रोजी सामने खेळणार आहे.
 
संघ : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, महेंद्रसिंह धोनी (यष्टिरक्षक), दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, केदार जाधव, रवींद्र जडेजा, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, लोकेश राहुल, विजय शंकर.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती