कोरोना संसर्गाची सगळी लक्षणं दिसत असूनही अनेकांमध्ये टेस्ट निगेटिव्ह का येते?

बुधवार, 21 एप्रिल 2021 (14:54 IST)
कोरोना संसर्गाची प्रमुख लक्षणं म्हणजे ताप, सर्दी, खोकला, कफ, अंगदुखी, खूप थकवा आणि जुलाब आहेत. लक्षणं दिसून येताच, डॉक्टर तातडीने टेस्ट करण्यास सांगतात. कोरोनासंसर्ग झालाय की नाही, हे तपासण्यासाठी टेस्ट हा खात्रीशीर पर्याय आहे.
 
कोरोनासंसर्ग झालाय का नाही हे शोधण्यासाठी दोन प्रकारच्या टेस्ट केल्या जातात-
 
· RT-PCR
 
· आणि अॅन्टीजीन टेस्ट
 
तुमच्यासोबत कधी असं झालंय की, कोरोना संसर्गाची सगळी लक्षणं असूनही टेस्ट निगेटिव्ह आलीये? तुमच्यापैकी काही लोकांना हा अनुभव नक्कीच आला असेल. 'फॉल्स पॉझिटिव्ह, फॉल्स निगेटिव्ह' हे शब्द तुम्ही फॅमिली डॉक्टरांकडून ऐकले असतील.
मग, सगळी लक्षणं असूनही टेस्ट निगेटिव्ह का येते? यामागे नेमकं काय कारण आहे? म्युटेट झालेल (बदललेला) व्हायरस टेस्टमधून निसटतोय? असे प्रश्न तुम्हाला पडले असतील. तज्ज्ञांकडून आम्ही या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
 
RT-PCR टेस्ट म्हणजे काय?
RT-PCR म्हणजे Real Time Reverse Transcription Polymerase Chain Reaction. सामान्य भाषेत याला 'स्वॅब टेस्ट' म्हणतात. या टेस्टमध्ये नाकातून किंवा घशातून स्वॅब (नमुना) घेतला जातो.
तज्ज्ञांच्या मते, RT-PCR टेस्ट, कोव्हिड-19 चा संसर्ग झाला आहे किंवा नाही, हे खात्रीशीर पद्धतीने सांगू शकते. जगभरातील डॉक्टर RT-PCR ला 'गोल्ड टेस्ट' मानतात.
 
कशी केली जाते टेस्ट?
तज्ज्ञांच्या मते, रुग्णाच्या नाकातून किंवा घशातून नमुना घेतल्यानंतर, कॉटनस्वॉब द्रव पदार्थ असलेल्या ट्यूबमध्ये मिसळला जातो. या ट्यूबमध्ये असलेल्या द्रव पदार्थात कॉटनवर असलेला व्हायरस मिसळतो आणि जिवंत रहातो. त्यानंतर हा नमुना प्रयोगशाळेत तपासणीसाठी नेला जातो.
 
लक्षणं असूनही टेस्ट निगेटिव्ह येते?
मुंबई रहाणाऱ्या नम्रता गोरे (नाव बदललेलं) यांना पाच दिवस ताप होता. पण, टेस्ट निगेटिव्ह आली होती.
 
"लक्षणं दिसून आल्यानंतर डॉक्टरांनी RT-PCR करण्याचा सल्ला दिला. टेस्ट निगेटिव्ह आली. पण, ताप-खोकला थांबला नाही. डॉक्टरांनी उपचार सुरू केले. पुन्हा काही दिवसांनंतर केलेल्या टेस्टमध्ये कोरोनासंसर्ग असल्याचं स्पष्ट झालं."
 
तज्ज्ञांच्या मते, RT-PCR चाचणीने आपल्याला कोरोना संसर्गाचे खात्रीशीर रिझल्ट मिळतात. पण, काहीवेळा लक्षणं असूनही टेस्टचा रिपोर्ट निगेटिव्ह येतो.
वाशीच्या फोर्टिस-हिरानंदानी रुग्णालयाच्या इंटर्नल मेडिसिन विभागाच्या संचालक डॉ. फराह इंगळे सांगतात, "काही रुग्णांमध्ये कोव्हिडची सर्व प्राथमिक लक्षणं दिसत असतात. पण, त्यांची टेस्ट निगेटिव्ह येते. याला वैद्यकीय भाषेत 'फॉल्स निगेटिव्ह' म्हणतात."
 
तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, कोव्हिडची लक्षणं असूनही रिपोर्ट निगेटिव्ह येणं धोक्याचं आहे. याचं कारण, रुग्ण स्वत:ला निगेटिव्ह समजून फिरू लागतात आणि संसर्ग अधिक पसरण्याची शक्यता असते.
 
लक्षणं असूनही रिपोर्ट निगेटिव्ह येण्याची कारणं?
डॉ. फराह इंगळे सांगतात, ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी यासारखी लक्षणं असूनही कोव्हिड रिपोर्ट निगेटिव्ह येण्याची चार प्रमुख कारणं आहेत.
 
· स्वॅब घेण्यात झालेली चूक
 
· योग्य पद्धतीने रुग्णाचा स्वॅब घेण्यात न येणं
 
· व्हायरसला जिवंत रहाण्यासाठी द्रवपदार्थ योग्य प्रमाणात वापरण्यात आला नाही तर
 
· स्वॅबच्या नमुन्यांची योग्य वाहतूक न झाल्यामुळे
 
काही रुग्णांमध्ये व्हायरल लोड (शरीरातील व्हायरसची संख्या) फार कमी असतं. त्यामुळे सर्व लक्षणं असूनही टेस्ट 'फॉल्स निगेटिव्ह' येण्याची शक्यता असते, असं डॉ. इंगळे पुढे सांगतात.
नवी मुंबई महापालिकेत मायक्रोबायोलॉजिस्ट म्हणून काम करणाऱ्या डॉक्टर नाव न घेण्याच्या अटीवर सांगतात, "कोव्हिड-19 रायबोन्यूक्लिक अॅसिड (RNA) प्रकारचा व्हायरस आहे. हा फार नाजूक आणि लवकर खराब होण्याची शक्यता असते. यासाठी कोल्डचेन योग्य असणं आवश्यक आहे. स्वॅबची वाहतूक करताना, व्हायरस सामान्य तापमानात राहिला तर खराब होतो. त्यामुळे लक्षणं असूनही टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह येत नाहीत."
 
तज्ज्ञ सांगतात, काहीवेळा स्वॅब घेण्यासाठी जाणारे लोकांना योग्य प्रशिक्षण नसतं. हे देखील टेस्ट निगेटिव्ह येण्याचं एक कारण आहे.
 
पाणी प्यायल्याने किंवा खाल्याने टेस्टवर फरक पडतो?
त्या पुढे सांगतात, "कोव्हिड-19 टेस्ट करण्याआधी रुग्णाने पाणी प्यायलं किंवा काही खाल्लं असेल तर याचा परिणाम पीसीआर टेस्टवर होण्याची शक्यता असते. यामुळे पॉझिटिव्ह रिपोर्ट निगेटिव्ह येण्याची शक्यता असते."
 
"शरीरातील हे घटक टेस्टला अडथळा निर्माण करतात. त्यामुळे टेस्टचे योग्य परिणाम मिळत नाहीत," असं त्या पुढे म्हणाल्या.
 
काय म्हणतं केंद्र सरकार?
केंद्रीय आरोग्यमंत्रालयाने शुक्रवारी (16 एप्रिल) म्युटेशन झालेला व्हायरस RT-PCR टेस्टमधून निसटण्याची शक्यता कमी असल्याचं म्हटलं होतं.
 
"भारतात वापरले जाणारे RT-PCR टेस्ट कीट दोन 'जीन' शोधण्यासाठी बनवले आहेत. त्यामुळे व्हायरसमध्ये म्युटेशन झालं तरी, टेस्टमधून व्हायरस सुटणार नाही. टेस्टची अचूकता आणि विशिष्टता आधीसारखीच असल्याचं," असं केंद्रीय आरोग्यमंत्रालयाने म्हटलं होतं. हिंदुस्तान टाईम्सने ही बातमी दिलीये.
 
राज्यसभेच्या संसदीय समितीने, नोव्हेंबर महिन्यात आपल्या रिपोर्टमध्ये सदोष टेस्ट कीटमुळे फॉल्स निगेटिव्ह रिपोर्ट येत असल्याबाबत चिंता व्यक्त केली होती.
 
लक्षणं असून टेस्ट निगेटिव्ह आली तर काय करावं?
याबाबत बोलताना डॉ. इंगळे म्हणतात, "लक्षणं असूनही RT-PCR निगेटिव्ह आली आणि लक्षणं कायम असतील तर रुग्णांनी पहिली चाचणी केल्यानंतर 5 ते 6 दिवसांनी पुन्हा RT-PCR टेस्ट करून घ्यावी."
 
फोर्टिस रुग्णालयाच्या आपात्कालीन विभागाचे संचालक डॉ. संदीप गोरे सांगतात, "लक्षणं असूनही टेस्ट निगेटिव्ह आली तर वैद्यकीय सल्ल्याने उपचार सुरू करावेत आणि त्यानंतर पुन्हा टेस्ट करून घ्यावी. टेस्ट निगेटिव्ह असेल तर सीटीस्कॅन खूप महत्त्वाचं आहे."
 
फॉल्स पॉझिटिव्ह म्हणजे काय?
सुक्ष्मजीवतज्ज्ञ सांगतात, एखाद्या व्यक्तीच्या शरीरात व्हायरस नसेल तरी, त्याची टेस्ट पॉझिटिव्ह येऊ शकते. याला 'फॉल्स पॉझिटिव्ह' असं म्हणतात.
कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तीची RT-PCR टेस्ट पॉझिटिव्ह येऊ शकते. कारण, त्या व्यक्तीच्या शरीरात मृत कोरोनाव्हायरस असू शकतो. कोरोनामुक्त झाल्यानंतर एक महिनाभर टेस्ट पॉझिटिव्ह येऊ शकते.
 
म्युटेट झालेला व्हायरस RT-PCR मधून निसटण्याची शक्यता आहे?
देशात कोव्हिड-19 चा डबल म्युटंट आढळून आलाय. महाराष्ट्राच्या टास्कफोर्सनुसार, कोरोनासंसर्ग पसरण्यामागे डबल म्युटंट कारणीभूत आहे. तज्ज्ञ सांगतात, शरीरातील रोगप्रतिकारशक्ती या डबल म्युटंटला ओळखू शकत नाहीये. त्यामुळे संसर्ग झपाट्याने पसरतोय.
हा डबल म्युटंट RT-PCR टेस्टमधून निसटण्याची शक्यता आहे? यावर बोलताना सुक्ष्मजीवतज्ज्ञ सांगतात, "RNA व्हायरस लवकर म्युटेट होतात. टेस्टमध्ये जो भाग आपण तपासणार आहोत. त्यात बदल झाला तर परिणाम वेगळे येतात. म्युटेशनसाठी सरकारकडून टेस्ट किटमध्ये बदल करून घेण्यात येत आहेत."
 
महाराष्ट्रातील विविध भागातून नॅशनल इंनस्टिट्टुट ऑफ व्हायरॉलॉजीला जिनोम सिक्वेंन्सिंगसाठी नमुने पाठवण्यात येत आहेत. जेणेकरून व्हायरस कुठे म्युटेट झालाय याची माहिती मिळू शकते.
 
"व्हायरस म्युटेट झाल्यामुळे RT-PCR टेस्टमधून निसटण्याची शक्यता नाकारता येत नाही," असं सुक्ष्मजीवतज्ज्ञ सांगतात.
 
अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने, जानेवारी महिन्यात व्हायरसमध्ये झालेल्या बदलामुळे टेस्ट फॉल्स निगेटिव्ह येऊ शकते अशा प्रकारची माहिती जारी केली होती. "व्हायरसच्या ज्या भागाची (जीनची) टेस्ट तपासणी करणार आहे. त्यात बदल झाला असेल तर, टेस्ट फॉल्स निगेटिव्ह येऊ शकते," असं अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने म्हटलं होतं.
 
संशोधनात शास्त्रज्ञांनी गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात म्युटेशन होणारा व्हायरस आणि टेस्ट याबाबत प्रश्न उपस्थित केले होते. "व्हायरसमध्ये म्टुटेशन झाल्याने फॉल्स पॉझिटिव्ह आणि फॉल्स निगेटिव्ह परिणाम येऊ शकतील," असं संशोधकांचं म्हणणं होतं.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती