लसीकरण : कोरोना प्रमाणेच या आजारांवरील लशीही तुम्ही घेऊ शकता

सोमवार, 14 जून 2021 (16:34 IST)
जान्हवी मुळे
कोरोना विषाणूच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी जगभरात लसीकरण सुरू आहे. पण कोव्हिडच्या साथीने एकंदरीतच आजारांविषयी आणि त्यावरच्या प्रतिबंधात्मक लशींविषयीही उत्सुकता निर्माण केली आहे.
लसीकरण केवळ त्या व्यक्तीला आजारांपासून संरक्षण देत नाही, तर सार्वजनिक आरोग्यासाठीही ते महत्त्वाचं असतं. म्हणून एखाद्या समुदायात एखाद्या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी लसीकरण मोहिमांचं आयोजन केलं जातं.
 
खरंतर भारतात वैश्विक लसीकरण कार्यक्रमा अंतर्गत घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात, पोलिओ आणि क्षयरोग अशा आजारांवरच्या महत्त्वाच्या लशी लहानपणीच (0 ते 16 वयोगट) दिल्या जातात. पण काही लशींचे बूस्टर डोस मोठेपणीही घेणं फायद्याचं ठरतं.
 
त्याविषयी अमरावतीच्या डॉ. तृप्ती जावडे सांगतात की, "तुमचं वय काय आहे, तुम्ही गरोदर महिला आहात का, तुम्हाला कुठला आजार आहे, तुम्ही कुठलं काम करता, कुठल्या देशात प्रवास करून जाणार आहात किंवा तुमच्या शहरात कुठली साथ आली आहे यानुसार तुम्हाला लशीची गरज पडू शकते."
 
गरोदर माता, वैद्यकीय कर्मचारी, सफाई कामगार आणि काही देशांत सेक्स वर्कर्सनाही वेगवेगळ्या आजारांवरील लस उपलब्ध करून दिली जाते. अर्थात कुठलीही लस डॉक्टरांच्या सल्ल्यानंच घ्यावी असंही डॉ. तृप्ती स्पष्ट करतात.
मग अशा कुठल्या लशी आहेत ज्या प्रौढ व्यक्तीही घेऊ शकतात आणि ज्याविषयी आपल्याला माहिती असायला हवी?
 
हिपॅटायटिस-बी (HBV)
हिपॅटायटिस-बी हा विषाणू लिव्हर म्हणजे यकृताला संसर्ग करतो. त्यामुळे काहींना सौम्य स्वरुपाची लक्षणं किंवा काविळीसारखा आजार होऊ शकतो, पण काहीवेळा लिव्हर सोरायसिस आणि पुढे जाऊन यकृताचा कॅन्सर होण्याची शक्यताही असते.
या विषाणूला रोखणारी लस 1986 साली शोधण्यात आली होती आणि 2008-09 पासून या लशीचा भारताच्या सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रमात समावेशही करण्यात आला आहे. पण त्याआधी जन्मलेल्या व्यक्तींना या विषाणूपासून संरक्षण हवं असेल, तर डॉक्टरांच्या सल्ल्यानं ही लस घेता येते. साधारणपणे तीन डोसमध्ये ही लस दिली जाते.रुग्णांच्या किंवा कुठल्याही मार्गानं रक्ताच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींना हिपॅटायटिस बी वरील लस आवश्यक मानली जाते. यामध्ये रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसोबतच रक्तपेढीत काम करणाऱ्या व्यक्ती किंवा डायलिसिस करणाऱ्या व्यक्तींचाही समावेश आहे.त्याशिवाय HIV ची लागण झालेल्या व्यक्तींना, यकृत आणि किडनीचे आजार असलेल्या व्यक्तींमध्येही हिपॅटायटिस बी ची लागण होण्याचा धोका जास्त असतो. हिमोफिलिया, ल्युकेमियासारखे आजार आणि काही शस्त्रक्रियांमध्ये रुग्णांना रक्त चढवावं लागतं. अशा परिस्थितील रुग्णांना आधी तपासणी करून मग ही लस दिली जाऊ शकते.
 
फ्लू शॉट
इन्फ्लुएन्झा विषाणूला रोखणाऱ्या आणि नाकावाटे दिल्या जाणाऱ्या लशीला 'फ्लू शॉट' म्हणूनही ओळखलं जातं.
भारतात इन्फ्लुएन्झाच्या विषाणूंचं साथरोग सर्वेक्षण तुलनेनं कमी असल्यानं फ्लू शॉटविषयी अनेकांना फारशी माहिती नसते. पण 2009 साली आलेल्या H1N1 विषाणू अर्थात स्वाईन फ्लूच्या साथीनंतर हे चित्र बदलू लागलं.
फ्लूची साथ असेल तेव्हा जास्तीत जास्त लोकांनी ही लस घ्यायला हवी, असं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. मात्र फ्लूचा विषाणू सतत बदलत असल्याने या लशीची उपयुक्तता वर्षभरच टिकू शकते.
त्यामुळेच भारताच्या सार्वत्रिक लसीकरण मोहिमेत या लशीचा समावेश नाही. मात्र अनेक रुग्णालयांमध्ये ही फ्लू शॉट उपलब्ध होऊ शकतो.गरोदर माता, 50 वर्षांवरील व्यक्ती, श्वसनाशी निगडित आजार असलेल्या व्यक्ती तसंच आरोग्य कर्मचाऱ्यांना आणि ज्यांची रोग प्रतिकारशक्ती कमी झाली आहे अशा रुग्णांना फ्लू शॉट घेण्याचा सल्ला डॉक्टर्स देऊ शकतात.
 
ह्युमनपॅपिलोमा व्हायरस (HPV)
ह्युमनपॅपिलोमा व्हायरस किंवा HPV विषाणूचे जवळपास 200 प्रकार आहेत. त्यातले सगळेच धोकादायक नसले, तरी काही प्रकारांमुळे लिंगसांसर्गिक रोग (लैंगिक संबंधांद्वारा प्रसार होणारे रोग) होऊ शकतात.
गर्भाशयाच्या 95% कर्करोगांचा या विषाणूशी संबंध असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे लैंगिक संबंध सुरु होण्याआधीच्या काळात म्हणजे पौगंडावस्थेत ही लस देणं जास्त प्रभावी ठरतं. स्कॉटलंडसारख्या ठिकाणी 9 ते 25 वर्षाच्या वयातील मुलींबरोबरच मुलांनाही ही देण्यास सुरुवात झाली आहे.भारतात ही लस उपलब्ध असून स्त्रीरोगतज्ज्ञांच्या सल्ल्यानं महिला ती घेऊ शकतात.
 
धनुर्वातावरील लस
धनुर्वातावरील लशीचा लहान मुलांना दिल्या जाणाऱ्या लशींमध्येही समावेश आहे.भारतात धनुर्वात (Tetanus किंवा TT), घटसर्प (diphtheria) आणि डांग्या खोकला (pertussis) या आजारावरील एकत्रित (ट्रिपल किंवा त्रिगुणी) लस आणि तिचा बूस्टर डोस लहानपणीच दिला जातो.पण तरुण आणि प्रौढांनी धनुर्वातावरील लशीचे किमान तीन बूस्टर डोस घेतले, तर त्यांना या आजारापासून पूर्ण संरक्षण मिळू शकतं.
18 ते 64 वयोगटातील प्रौढांना ही लस घेता येते.एखाद्या मोठ्या दुखापतीनंतर संसर्ग टाळण्यासाठी अँटी टिटॅनस टॉक्झॉईड दिलं जातं. जिथे लहानमोठी इजा होण्याची शक्यता असते अशा पेशातील व्यक्तींना ठराविक काळानंतर खबरदारी म्हणून अँटी टिटॅनस इंजेक्शन घेण्याचा सल्ला दिला जाऊ शकतो.
 
BCG
क्षयरोग (Tuberculosis किंवा TB) या आजाराला प्रतिबंध करणारी बीसीजी ही लस भारतात सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रमाचा भाग आहे. म्हणजे लहान मुलांना ती सरकारकडून मोफत उपलब्ध करून दिली जाते. साधारणपणे बालकांना जन्मानंतर वर्षभराच्या आत बीसीजीचा डोस दिला जातो.प्रौढांमध्ये बीसीजी लस फारशी परिणामकारक दिसत नाही. पण ज्यांना लहानपणी बीसीजी डोस मिळालेला नाही किंवा जे क्षयरोगानं ग्रस्त रुग्णांच्या संपर्कात येतात अशा 35 वर्षांखालील वैद्यकीय कर्मचाऱ्यांना ही लस दिली जाऊ शकते.प्रौढांना बीसीजीची लस देण्याआधी एका स्किन टेस्टद्वारा त्यांच्या शरीरात क्षयरोगाच्या अँटीबॉडीज नाहीत ना, याची पाहणी केली जाते.
 
रेबीज
कुत्रा चावल्यास डॉक्टर्स लगेच रेबीजवरची लस इंजेक्शनद्वारा देतात. ही लस सर्वांनी घेण्याची गरज नसते. पण अशा प्राण्यांसोबत काम करणाऱ्या व्यक्ती किंवा त्यांच्यावर उपचार करणाऱ्या व्यक्तींना रेबीजच्या संसर्गाचा धोका जास्त असतो. त्यामुळे त्यांना ही लस दिली जाऊ शकते.

MMR आणि व्हेरिसेला
मिसल्स, मम्प्स आणि रुबेला (MMR) म्हणजे गोवर आणि गालगुंड यांवरची लस तसंच व्हेरिसेला म्हणजे कांजिण्यांवरची लस भारतात लहानपणी दिल्या जाणाऱ्या लशींचा भाग आहे. पण ज्यांना ही लस मिळालेली नाही त्यांना ही लस दिली जाऊ शकते.स्थानिक आजारांवरील लशी भारतात काही जिल्ह्यांमध्ये कॉलरा (पटकी) किंवा जॅपनीज एन्सिफलायटिस अशा रोगांचा प्रादुर्भाव आढळतो. तसंच काहीवेळा एखाद्या आजाराची साथ पसरते. अशा वेळी स्थानिक परिस्थितीनुसार त्या आजारांवरील लस घेण्याचा सल्ला आरोग्य विभागाकडून दिला जातो.
 
प्रवासासाठी दिल्या जाणाऱ्या लशी
काही देशांत प्रवास करायचा असेल तर तुम्हाला तिथल्या एंडेमिक म्हणजे स्थानिक आजारांवरील लशी घेणं बंधनकारक असू शकतं. काही वेळा एखाद्या देशात गेल्यावर किंवा देशातून परत येताना लसीकरण गरजेचं असतं.
उदाहरणार्थ, आफ्रिकन देशांत जायचं असेल तर यलो फिव्हरवरची लस बंधनकारक असते. परदेशात प्रवासाला जाताना त्याविषयीची माहिती घेऊन तुम्ही अशी लस घेऊ शकता.
 
प्रौढांमधल्या लसीकरणाविषयी जागरुकता
खरंतर प्रौढांमध्ये अनेक आजारांचा मोठा प्रादुर्भाव असतानाही प्रौढांच्या लसीकरणाविषयी तेवढी जागरुकता दिसत नाही. याचं पहिलं कारण म्हणजे प्रौढांचं लसीकरण बंधनकारक नाही. सुविधांचा अभाव असल्यानं सरकार लसीकरण मोहीम राबवू शकत नाही. तसंच लसीकरणासाठी वेळ काढून जाणं प्रत्येकालाच परवडत नाही.
पण वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्ती (डॉक्टर्स, नर्सेस, आरोग्यसेवक) प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे वेगवेगळ्या रुग्णांच्या संपर्कात येतात. स्वच्छता कर्मचारी तसंच प्लंबिंगसारखी कामं करणाऱ्या व्यक्ती तसंच प्राण्यांवर उपचार आणि त्यांची देखभाल व्यक्तींनाही एखाद्या आजाराचा संसर्ग होण्याची शक्यता असते. पोलीस किंवा दुर्घटनांच्या ठिकाणी मदतकार्यात सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आवश्यक लशी घेणं फायद्याचं ठरू शकतं.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती