दोन दिवसात शिवसेनेच्या दोन नगरसेवकांचा कोरोनामुळे मृत्यू

बुधवार, 8 जुलै 2020 (21:31 IST)
औरंगाबादमध्ये  करोनामुळे दोन दिवसात शिवसेनेच्या दोन नगरसेवकांचा मृत्यू झाला आहे. नितीन साळवे आणि रावसाहेब आम्ले अशी या नगरसेवकांची नावं आहेत.करोनामुळे परिस्थिती गंभीर होत असून शहरात १० ते १८ जुलै दरम्यान पुन्हा एकदा लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. 
 
शिवसेनेचे उत्तम नगर बौद्धनगर वॉर्डाचे माजी नगरसेवक नितीन साळवी यांचं मंगळवारी निधन झालं. करोनाची लागण झाल्याने नितीन साळवे यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरु होते. २६ जून रोजी एका खासगी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं होतं. पण मंगळवारी उपचारादरम्यानच त्यांचं निधन झालं.  तर दुसरीकडे शिवसेनेचे पडेगावचे माजी नगरसेवक रावसाहेब आम्ले यांनाही करोनाचा संसर्ग झाला होता. घाटी रुग्णालयातून त्यांना खासगी रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. त्यांना प्लाझ्मा थेरपी दिली जाणार होती. पण त्यापूर्वीच बुधवारी सकाळी त्यांचं निधन झालं. 
 
बुधवारी सकाळी औरंगाबाद जिल्ह्यात १६६ नवे करोनाबाधित रुग्ण आढळले. यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या ७ हजार ३०० वर पोहचली आहे. बुधवारी आढळलेल्या १६६ रुग्णांमध्ये औरंगाबाद शहरातील ९९ व ग्रामीण भागातील ६७ रुग्णांचा समावेश आहे. यामध्ये ९२ पुरुष व ७४ महिला रुग्ण आहेत. आतापर्यंत ३ हजार ८२४ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. तर, ३ हजार १४९ रुग्णांवर अद्यापही उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत करोनामुळे ३२७ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती