रेमडेसीवीर इंजेक्शन तुटवडा, काळा बाजार करतांना दोघांना अटक

शनिवार, 11 जुलै 2020 (18:49 IST)
रेमडेसीवीर इंजेक्शन तुटवडा असल्याने हे औषध ज्यादा दराने विक्री होत असल्याच्या अनेक तक्रारी अन्न आणि औषध प्रशासनाकडे येत आहेत. रेमडेसीवीर औषधांचा काळाबाजार मुंबईसह राज्यात मोठ्या प्रमाणात सुरू आहे. मीरारोड येथे या औषधाचा काळा बाजार समाजसेवक डॉ. बिनू वर्गीस यांनी उघडकीस आणला. मीरा रोड, साईबाबा नगर या ठिकाणी दोन इसम रेमडेसीवीर इंजेक्शन बेकायदेशीररित्या चढ्या भावाने विकण्यासाठी येणार असल्याची माहिती डॉ. बिनू वर्गीस यांना मिळाली. 
 
डॉ. वर्गीस यांनी ही माहिती ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड यांना दिली. पोलीस अधीक्षक डॉ. राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली मीरारोड पोलीस ठाणे आणि अन्न आणि प्रशासन विभागाच्या अधिकारी यांनी शनिवारी सायंकाळी सदर परिसरात सापळा रचून दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याजवळून रेमडेसीवीर इंजेक्शनचे ४ बॉटल जप्त करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेल्या एका  इंजेक्शनची मूळ किंमत ५ हजार ४०० रुपये असून काळाबाजारात रेमडेसीवीर हे इंजेक्शन ४०ते ४५ हजार रुपये किंमतीत विकले जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ताब्यात घेण्यात आलेल्या दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडे याबाबत चौकशी सुरू आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती