.नाशिकचे मनपा वैद्यकीय अधीक्षक आणि वैद्यकीय अधिकारी पॉझिटिव्ह

शुक्रवार, 26 मार्च 2021 (08:46 IST)
नाशिक कोरोना नियंत्रणाची जबाबदारी ज्यांच्यावर मुख्यत: आहे ते महापालिकेचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे आणि वैद्यकीय अधिकारी डॉ. आवेश पलोड यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे महापालिकेत एकच खळबळ उडाली आहे. त्यांचा चार्ज डॉ. राजेंद्र त्र्यंबके यांच्याकडे देण्यात आला आहे. 
 
आता महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारीच कोरोनाबाधित होत आहेत. मुख्यालयात सतत येणाऱ्या जाणाऱ्यांची वर्दळ असल्याने त्यातून हा संसर्ग वाढत आहे. महापालिकेच्या वैद्यकीय विभागातील कोरोना योध्दा म्हणून ओळख असलेले डॉ. बापूसाहेब नागरगोजे आणि डॉ. आवेश पलोड यांनाही कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. त्यामुळे महापालिकेच्या वैद्यकीय विभागाचा डोलाराच कोसळतो की काय अशी शंका उपस्थित होत आहे. 
 
आता  महापालिकेतील सर्वच अधिकारी व कर्मचार्‍यांची आरटी-पीसीआर चाचणी करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. नागरिकांशी कायमचा संबंध येत असलेले महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी, सुरक्षारक्षक, सफाई कर्मचारी यांना आरटी-पीसीआर करणे बंधनकारक केले आहे. त्यानुसार १५ मार्चपासून महापालिकेत अधिकारी, कर्मचारी व सुरक्षारक्षकांची आरटी-पीसीआर चाचणी केली जात आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती