सावधान तुमचा पास बनावट तर नाही, पोलिसांच्या नावे बनावट पास एकाला अटक

नाशिक पोलिसांच्या नावाने कोरोना साठी प्रवास करायचा म्हणून खोटा ईपास तयार करुन त्याची विक्री होत असल्य़ाचा प्रकार शहरात उघड झाला आहे. या गंभीर प्रकरणी योगेश कोदे या 31 वर्षीय तरुणाला नाशिक पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीने व्हॉट्सअॅप ग्रुपवर अर्जंट तात्काळ ईपास तयार करुन मिळेल अशा आशयाची पोस्ट व्हायरल केली होती. त्यावेळी एका महिलेने संपर्क साधला असता आरोपीने महिलेला ईपास तयार करुन दिला. मात्र, हा प्रकार संशयास्पद वाटल्याने महिलेने अंबड पोलिसांकडे या बाबत माहिती साठी धाव घेतली.
 
या प्रकरणी आरोपीने अनेकांना बनावट पास देऊन पैसे उकळल्याचा पोलिसांना संशय आहे. हा तरुण प्रत्येकी 500 रु प्रमाणे पास विकत होता. लॉकडाउनमध्ये शहराबाहेर जाण्यासाठी पोलिस आयुक्तांच्या नावाने बनावट ई पास काढून देण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी अंबड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
 
ई पास मिळण्यासाठी साधारणत: दोन दिवसांचा कालावधी लागतो, मात्र सिडकोत एका व्यक्तीला एका दिवसातच हा पास मिळाला. संबंधित व्यक्तीने काही जणांना ई पासची गरज असल्याने त्यांनी योगेश सुधाकर कोदे यांच्याशी संपर्क साधला. योगेश याने एका दिवसात पास काढून देण्याचे सांगितल्याने यांना याबाबतचा संशय आला. त्यांनी याप्रकरणी अंबड पोलिसांना कळवल्यानंतर पोलिसांनी चौकशी केली असता, हा सर्व प्रकार उघडकीस आला.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती