राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या २०

शनिवार, 14 मार्च 2020 (11:27 IST)
राज्यात नागपूर येथे तीन आणि पुणे, नगर आणि मुंबईत प्रत्येकी एक मिळून आणखी सहा जणांना कोरोनाची लागण झालेली आहे. यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या २० झाली आहे.
 
अमेरिकेहून पुण्यात आलेला आणखी एक तरुण तर अहमदनगरमध्ये एक जण पॉझिटिव्ह असल्याचे शुक्रवारी स्पष्ट झाले. तसेच मुंबईत हिंदुजा हॉस्पिटलमध्येही एक जण पॉझिटिव्ह आढळला आहे. पुण्यातील रुग्णांची संख्या दहावर गेली आहे. या व्यक्तींपैकी नऊ रुग्ण परदेशामध्ये जाऊन आलेले असून, केवळ ओला टॅक्सी ड्रायव्हर हा एकमेव स्थानिक व्यक्ती आहे. दरम्यान पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण भागातील २१६ संशयित कोरोना रुग्णांची तपासणी करण्यात आली. दहा व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले असून, १९१ रुग्णांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सध्या १५ व्यक्ती नायडू रुग्णालयात दाखल असून, त्यांचे तपासणी अहवाल एक-दोन दिवसांत प्राप्त होतील, असे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले.
 
नागपुरातील कोरोनाग्रस्त रुग्णाची पत्नी व मामेभाऊ यांच्यासह आणखी एकाला लागण झाल्याचे स्पष्ट झाले. अमेरिकेहून आलेल्या ४५ वर्षीय व्यक्तीला बुधवारी इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) दाखल केले. या रुग्णाचे नमुने पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्याशी संपर्कात आलेल्या १४ संबंधितांचे नमुने तपासले. यात त्यांचे सासरे, दोन्ही मुले, तपासणी करणारे दोन्ही डॉक्टर, कर्मचारी व मित्राचे असे १२ संबंधितांच्या नमुन्यांचा अहवाल गुरुवारी रात्री उशिरा निगेटिव्ह आला. परंतु त्यांच्या ४३ वर्षीय पत्नी व ४५ वर्षीय मामेभाऊ यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. पॉझिटिव्ह आलेली महिला शिक्षिका आहे. या तिघांची प्रकृती स्थिर असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रवींद्र पातुरकर यांनी सांगितले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती