कोरोना विषाणु नेपाळ सीमेवर १० लाख २४ हजार लोकांची तपासणी

बुधवार, 4 मार्च 2020 (10:14 IST)
कोरोना विषाणुच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नेपाळ सीमेवर आतापर्यंत १० लाख २४ हजार लोकांची तपासणी केली आहे.
 
उत्तराखंड, बिहार, उत्तरप्रदेश, पश्चिंम बंगाल आणि सिक्कीम या पाच राज्यांच्या २१ सीमावर्ती जिल्ह्यांत ३ हजार ६९५ ग्रामसभा बैठका आयोजित केल्या आहेत. विविध विमानतळांवर पाच लाखांहून अधिक प्रवाशांची तपासणी केली आहे, अशी माहिती केंद्रिय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी दिली.
 
ते नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलत होते. एकात्मिक रोग टेहळणी कार्यक्रमांतर्गत प्रवाशांची आणखी तपासणी केली जाईल, असंही त्यांनी सांगितलं. सध्या १५ प्रयोगशाळा कार्यरत आहेत आणि १९ लवकरच कार्यरत होतील. कोविड-१९ मुळे निर्माण होणा-या कोणत्याही परिस्थितीला तोंड द्यायला सरकार तयार आहे, असं हर्षवर्धन यांनी सांगितलं. संबंधित मंत्र्यांचा गट कोविड-१९ प्रकरणी सातत्यानं नजर ठेवून आहे.
 
पाच कोरोना रूग्णांपैकी,सुरूवातीचे तिघं जण केरळचे असून त्यांना अगोदरच उपचार करून घरी पाठवलं आहे.  आणखी दोन कोरोनाचे रूग्ण नवी दिल्ली आणि तेलंगणामध्ये आढळल्याचं हर्षवर्धन यांनी सांगितलं. सरकारनं सिंगापूर, दक्षिण कोरिया, इराण आणि  इटाली या देशांमध्ये अनावश्यक प्रवास करू नये,असं आवाहन केलं आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती