कोरोना लसीकरण : कोल्हापुरात जास्तीच्या 13 हजार लोकांचं लसीकरण कसं शक्य झालं?

सोमवार, 24 मे 2021 (18:23 IST)
स्वाती पाटील
महाराष्ट्रात एकीकडे कोरोना लशींचा तुटवडा असताना, कोल्हापूर जिल्ह्यानं लसीकरणात कौतुकास्पद पायंडा पाडला आहे.
सरकारकडून मिळालेल्या लशींच्या डोसपेक्षा जास्त संख्येत लोकांना लस कोल्हापुरात देण्यात आलीय. केरळमध्येही असंच करण्यात आलं होतं.
 
कोल्हापूर जिल्ह्यात कोविड प्रतिबंधक लसीकरणाला 16 जानेवारी रोजी सुरूवात झाली. योग्य नियोजन करत कोल्हापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहिम यशस्वी करण्यात आलीय.
सुरूवातीला 8 केंद्रांवर आणि नंतर 20 केंद्रांवर लसीकरण सुरू होतं. यात प्रामुख्याने फ्रन्टलाईन वर्कर्सना लस देण्यात आली. त्यानंतर सर्वसामान्यांना लसीकरणाची घोषणा झाली. पण लोकांकडून तितकासा प्रतिसाद मिळत नसल्याने लस वाया जाण्याचं प्रमाण अधिक होतं.
 
याच कारण असं की, लशीची एक व्हायल फोडल्यानंतर अवघ्या चार तासात ती वापरणं बंधनकारक असते. अन्यथा ती लस वाया जाते. त्यामुळे लोकांची संख्या आणि लसीकरणाचा वेग याचा मेळ बसणं गरजेचं होतं.
लशीच्या एक व्हायलमध्ये 5 मिली लस असते. एका व्यक्तीला 0.5 मिली डोस दिला जातो. त्यामुळे एका व्हायलमधून केवळ 10 व्यक्तींचे लसीकरण होते. त्यामुळे उपलब्ध लस आणि लाभार्थ्यांची संख्या याचा मेळ बसवणं गरजेचं होतं.
 
याबाबत कोल्हापूर जिल्ह्याच्या लसीकरण मोहिमेचे समन्वय अधिकारी डॉ. फारुख देसाई सांगतात की, "एक एप्रिलपासून लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू झाला. यावेळी लस वाया जाणार नाही याची काळजी घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाने नियोजन केलं.
 
त्याचा पहिला भाग म्हणून जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी घेतलेल्या निर्णयातून एकाच वेळी 150 लसीकरण केंद्र सुरू करण्यात आली. महाराष्ट्रात अशा प्रकारे इतक्या मोठ्या संख्येने लसीकरण केंद्र सुरू करणारा कोल्हापूर एकमेव जिल्हा आहे."
 
नोडल अधिकारी डॉ. देसाई पुढे सांगतात की, "कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना जास्तीत जास्त संख्येने लसीकरण करण्यासाठी प्रोत्साहन दिलं. कोल्हापूर जिल्ह्यातील तालुका स्तरावर नेटके नियोजन करत अधिकाऱ्यांना काम वाटून दिलं. त्यामुळे गोंधळाची स्थिती झाली नाही. ग्राम समितीच्या माध्यमातून गाव पातळीवर सकारात्मक वातावरण निर्माण केल्याने लोकांनी लसीकरणासाठी चांगला प्रतिसाद दिला. 45 ते 60 वर्षं वयोगटातील लोकांचा लस घेण्याच्या मानसिकतेकडे कल वाढला. त्यामुळे लसीकरणाचं प्रमाण वाढलं."
सुरूवातीला लोकांचा प्रतिसाद नसल्याने शिल्लक लस वाया जात होती. पण लसीकरणाचं प्रमाण वाढल्याने लस पुरवठा आणि लसीकरण यांचा मेळ घालणं शक्य झालं. त्यातून एक पाऊल पुढे जात मिळालेल्या लसीच्या व्हायल अर्थात कुप्यामधून जास्तीत जास्त लोकांना लसीकरण कसं करता येईल याबाबत विचार सुरू झाला.
 
याबद्दल डॉ. देसाई सांगतात, "लसीच्या एका व्हायलमधून म्हणजे कुपीमधून दहा लोकांना इंजेक्शनद्वारे लस दिली जाते. मात्र तरीही त्या व्हायलमध्ये एखाद दुसरा डोस शिल्लक राहत होता. हे लक्षात आल्यानंतर लसीचा एकही थेंब वाया जाणार नाही याची काळजी घेत नियोजन केलं."
 
एकीकडे लशींचा तुटवडा आणि दुसरीकडे लाभार्थ्यांची संख्या जास्त अशी स्थिती आहे. त्यामुळ योग्य प्रकारे लस नियोजन करण्याची गरज आहे हे ओळखून कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे सर्व कर्मचाऱ्यांना याचं प्रशिक्षण देण्यात आलं. उपलब्ध लशीतून अधिकाधिक लोकांचं लसीकरण करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आलं.
याची अंमलबजावणी सुरू केल्यानंतर असं लक्षात आलं की, एका व्हायलमधून कधी दहा, कधी अकरा तर कधी बारा डोस मिळत आहेत. त्यामुळे अपेक्षित संख्येच्या अधिक प्रमाणात लोकांचं लसीकरण करण्यात प्रशासनाला यश मिळालं. याचा परिणाम असा झाला की, एप्रिल महिन्याच्या आकडेवारीनुसार अपेक्षित लाभार्थ्यापेक्षा अधिकच्या 13 हजार लोकांचं लसीकरण या नियोजनामुळे शक्य झालं.
 
कोल्हापूर जिल्ह्याचं लसीकरणाचं उद्दीष्ट 34 लाख 43 हजार 817 इतकं आहे. आतापर्यंत लस घेतलेल्या लोकांची संख्या ही 11 लाख 20 हजार 182 इतकी आहे. यात पहिला डोस घेतलेल्या लाभार्थ्याची संख्या 8 लाख 95 हजार 85 आहे तर दुसरा डोस घेणाऱ्या लाभार्थ्याची संख्या 2 लाख 25 हजार 97 इतकी आहे.
कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितलं की, "जिल्हा प्रशासनाच्या अथक प्रयत्नामुळे जिल्ह्यातील 45 ते 60 पेक्षा जास्त वयोगटातील 65 टक्के लोकांचं लसीकरण करण्यात आलं आहे.
 
सध्या राज्य सरकारच्या आदेशानुसार 45 ते 60 वयोगटातील लोकांना प्राधान्याने दुसरा डोस देण्याचं नियोजन सुरू आहे, मात्र लसीची उपलब्धता होणं हा मोठा विषय आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून मिळालेल्या लसीचा पुरवठा हा राज्य सरकारद्वारे जिल्ह्यांमध्ये केला जातो. त्यामुळे जितका साठा उपलब्ध होईल तो वाया जाऊ न देता मोठ्या प्रमाणात लसीकरणाचं उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी जिल्हा पातळीवर प्रयत्न केले जात आहेत."
 
सोबतच 45 ते 60 वर्षं वयोगटातील लोकांसाठी लसीकरण केंद्रावर वेगळी रांग करण्याची व्यवस्था केल्याने लोकांना त्रास होणार नाही याची काळजी घेत असल्याचंही मंत्री पाटील यांनी सांगितलं.
 
उपलब्ध लस आणि त्याचा वापर याची टक्केवारी काढली तर कोल्हापूरमध्ये लस वाया जाण्याचं प्रमाण नगण्य आहे. अशा प्रकारे लसीचं नियोजन केलं तर राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही लसीकरण उद्दीष्ट पूर्ण करण्यात यश येईल.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती