#कोरोना_डायरीज : आता विश्वात्मके देवे...

शुक्रवार, 3 जुलै 2020 (13:35 IST)
6 दिवसांपूर्वी बाबा पोजिटिव्ह आले. आज मी, आई आणि पत्नी पोजिटिव्ह आलो. आमच्या 7 वर्षांच्या मुलाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला म्हणून लगेच डॉक्टरांच्या मार्गदर्शनाने त्याला बायकोच्या माहेरी पाठवलं. आम्हाला मालाड पूर्वेच्या रामलीला मैदानाच्या बिल्डिंगमध्ये पाठवलं.

इथे कोरोना सेंटरमध्ये आल्यावर सुरुवातीला मन अस्वस्थ झालं. किमान 10 दिवस इथे राहायचं म्हणजे त्रासदायकच आहे. अशा वातावरणात चांगला माणूस आला तरी आजारी पडेल. पण नियम म्हटल्यावर तो पाळलाच पाहिजे. आयुष्यात पहिल्यांदा चाळीत राहण्याचं दुःख होतंय कारण बिल्डिंगमध्ये राहत असतो तर कदाचित घरात राहून उपचार करता आले असते. असो...

मी माझ्यासोबत सावरकरांचं "माझी जन्मठेप" हे पुस्तक घेतलेलं आहे. सावरकर नावाच्या बारीक आणि बुटक्या मूर्तीचा नुसता फोटो जरी पहिला तरी हजार हत्तीचं बळ अंगात येतं. आता तर सोबतीला माझी जन्मठेप आहे. हे पुस्तक मी यापूर्वी वाचलेलं आहे. म्हणजे मला आता फक्त रिव्हिजन करायचं आहे. सावरकरांना 50 वर्षांची काळ्यापाण्याची शिक्षा झाली होती तेव्हा ते माझ्या आताच्या वयाप्रमाणे 10 - 12 वर्षे लहान होते. विशीतला तो नवतरुण. त्या मानाने मी बराच प्रौढ आहे. जेव्हा पहिल्यांदा अस्वस्थ वाटलं तेव्हा सर्वप्रथम माझ्या डोळ्यांपुढे सावरकर आणि ज्ञानेश्वर माऊली उभी राहिली. माऊली आणि सावरकरांमध्ये मला नेहमीच साम्य वाटले आहे. दोघांनी समाजाकडून हालअपेष्टा सहन केल्या आणि दोघांनी विश्वाच्या ईश्वराकडे विश्वाच्या कल्याणासाठी पसायदान मागितले. काय मनःस्थिती असेल या दोघांची... नेमके कोणत्या मातीचे ते बनले होते कुणास ठाऊक. आणि आपल्यावर लोकांनी जरा टीका केली की आपण वैतागतो....

आता इथे कोविड सेंटरमधल्या लोकांकडे मी बघतो आणि मला प्रश्न पडतो की आम्ही सगळे एकत्र का आलो? त्यांचं आणि माझं नात काय? कोरोना नसता तर आम्ही एकत्र आलोच नसतो. ज्ञानदेवांसारख्या तपस्वी लोकांच्या दृष्टिकोनातून बोलायचं झालं तर त्यांच्यातही तो आहे जो माझ्यात आहे. आम्ही सगळे त्या एका शिव तत्वाने बांधलेले आहोत. हे जग त्या एका शिव तत्वाने बांधलेले आहे. म्हणून ज्ञानदेव राम, कृष्ण म्हणण्याऐवजी आता विश्वात्मकें देवे अस म्हणतात. ज्ञानदेवांनी भक्ती संप्रदाय आणि नाथ संप्रदायाची सांगड घालून जगावर खूप मोठे उपकार केले आहे. त्यांनी आपल्याला अमृत पाजले आहे. या न्यायाने आपण अमृताचे पुत्र आहोत.

आता कोरोनाचा आपण विचार केला तर अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहे. पण जे काही होतं ते चांगल्यासाठी होत अशी सकारात्मक श्रद्धा ठेवायला आपली हिंदू संस्कृती शिकवते. म्हणजे पोजिटिव्ह आल्याने कोरोना होतो पण कोरोना झाल्यावर निगेटिव्ह होऊ नये. म्हणून आपण या घटनेकडेही सकारात्मकतेने पाहिले पाहिजे. सावरकर आणि ज्ञानदेवांना जो त्रास सहन करावा लागला त्यापेक्षा आपला त्रास अगदीच कमी...

या कोरोना सेंटरमध्ये शांतपणे डोळे बंद करून बसल्यावर माझ्यासमोर ज्ञानदेवांची सालस मूर्ती उभी राहते. जगाच्या कल्याणासाठी पसायदान मागणारी ती मूर्ती, जिच्यात स्वार्थाचा कणही नाही... आपण सगळेच एकदा ज्ञानदेवांची ती मूर्ती डोळ्यापुढे आणून विश्वाच्या ईश्वराला साद घालूया का?

पुढचे 10 - 15 दिवस मी स्वतःला जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. मुंबईच्या धकाधकीच्या जीवनात आपल्याला सगळे लोक दिसतात पण आपण स्वतः मात्र आपल्याला दिसत नाही. आता हे 10 - 15 दिवस स्व संवादाचे आहेत... आता हे दिवस मी ला मी शी भेट करून द्यायचे आहेत... मी म्हणजे कोण? ज्ञानदेवांनी त्या मी ला साद घालून म्हटले होते, आता विश्वात्मकें देवे....

क्रमशः
लेखक: जयेश शत्रुघ्न मेस्त्री

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती