देशात दुसरी कोरोना लसही तयार, मानवी चाचणीसाठी परवानगी

शुक्रवार, 3 जुलै 2020 (16:49 IST)
कोरोनावर लस विकसित करणाऱ्या देशांमध्ये भारतदेखील आघाडीवर आहे. काही दिवसांपूर्वी देशात कोरोनाची पहिली लस तयार करण्यात आली होती. तसेच जुलै महिन्यात त्या लसीची चाचणी करण्यात येणार असल्याची माहितीही समोर आली होती. दरम्यान, देशात दुसरी कोरोना लसही तयार करण्यात आली असून त्याच्या मानवी चाचणीसाठी परवानगी देण्यात आली आहे. यापूर्वी COVAXIN या लसीची चाचणी करण्यात आली होती. या लसीचे १५ ऑगस्ट रोजी भारतात लाँचिंग होण्याची शक्यता आहे. ही लस लाँच झाल्यानंतर लगेच या लसीचा
वापर कोरोना रूग्णांच्या उपचारादरम्यान होणार असल्याचे सांगितले जात आहे.

गेल्या पाच दिवसांमधील ही दुसरी लस असून याचीही मानवी चाचणी केली जाणार आहे. यासाठी ‘ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया’ने (डीसीजीआय) मान्यता दिली आहे. ही लस अहमदाबादची कंपनी झायडस कॅडिला हेल्थकेअर लिमिटेडने तयार करत आहे. ‘ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया’ने (डीसीजीआय) या लसीच्या फेज १ आणि फेज २ च्या मानवी चाचणीसाठी मान्यता दिली आहे. ही मानवी चाचणी पूर्ण होण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी लागणार असल्याचे सांगितले जात आहे. तसेच या लसीची प्राण्यांवर यशस्वीरित्या चाचणी करण्यात आली असून आता पुढील फेजसाठी मानवावर चाचणी करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती