सुशांत सिंह राजपूत: एकेकाळी एका शोसाठी 250 रुपये घेणारा सुशांतसिंह कसा झाला सिनेस्टार?

सोमवार, 15 जून 2020 (12:37 IST)
जर तुमची सर्व कार्यक्रमांवर बारीक नजर असेल किंवा तुमची स्मरणशक्ती चांगली असेल तर कदाचित 2006 साली झालेल्या राष्ट्रूकुल खेळातील नृत्याचा कार्यक्रम तुम्हाला आठवेल. ऐश्वर्या राय या नृत्यामध्ये सहभागी होती आणि मागे भरपूर इतर नर्तक. त्यावेळेस नाचाचा एक भाग म्हणून तिला उचलण्याची जबाबदारी एका साध्या लाजाळू मुलावर होती. तो मुलगा म्हणजेच सुशांत सिंह राजपूत. तोच पुढे टीव्ही आणि सिनेमात मोठा स्टार झाला.
 
त्याने आज आत्महत्या केल्याचे समजले. ज्या तरुण, संघर्ष करुन यशस्वी झालेल्या प्रतिभावान अभिनेत्यांनी अकाली एक्झिट घेतली अशा कलाकारांच्या यादीत त्याचा समावेश झाला आहे. सिनेसृष्टीत अत्यंत यशस्वी पावलं टाकणाऱ्या मोजक्या कलाकारांमध्ये सुशांत होता.
 
1986 साली पाटण्यात जन्मलेल्या सुशांतनं दिल्लीच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये प्रवेश घेतला खरा. पण त्याचं खरं लक्ष डान्सिंग आणि अभिनयात होतं.जोखिम घेण्याची क्षमता हे त्याचं वैशिष्ट्य होतं. हातात काही नसताना त्यानं इंजिनिअरिंग सोडून मुंबईत नादिरा बब्बर यांच्या थिएटर ग्रुपमध्ये प्रवेश घेतला.
 
दुसऱ्याच मालिकेत भरपूर यश मिळाल्यावर 2011 साली पवित्र रिश्तामधली मुख्य भूमिका सोडून त्यांनं सर्वांना चकीत केलं होतं. नंतर दोन वर्षं त्याचा काहीच पत्ता नव्हता. नव्या तारे-तारकांनी भरलेल्या या सिनेसृष्टीत दोन वर्षांचा काळ फार मोठा असतो.
2013 मध्ये त्याचा काय पो छे सिनेमा आला. गुजरात दंगलीची पार्श्वभूमी असलेल्या सिनेमात त्यानं इशांतची भूमिका साकारली होती. नवख्या कलाकारासाठी ही भूमिका सोपी नव्हती.
 
रिस्क घेण्याबरोबर सुशांतचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे वैविध्य आणि प्रयोग करणं. त्यात तो कधी यशस्वी झाला तर कधी अपयशी.सहा वर्षांच्या फिल्मी कारकि‍र्दीत त्यानं महेंद्रसिंह साकारला आणि व्योमकेश बक्षीही. तर कधी त्यानं विवाहावर प्रश्नचिन्ह उभा करणारा शुद्ध देसी रोमान्समधला रघुरामही साकारला.
 
सुशांतला सर्वांत जास्त यश आणि त्याची वाहवा झाली ती धोनी: अन अनटोल्ड स्टोरीमुळे. धोनीच्या हालचाली, शैली जशीच्यातशी उचलल्याबद्दल धोनीनेही त्याचं कौतुक केलं होतं. ज्याप्रकारे त्यानं हेलिकॉप्टर शॉट लगावले होते त्यामुळे तो विशेष प्रभावित झाला होता.
 
खऱ्या आयुष्यातही अनेक विषयांवर भूमिका घेतल्यामुळे तो दुसऱ्यांपेक्षा वेगळा होता. संजय लीला भन्साळींना राजपूत करणी सेनेने सतत विरोध केल्यानंतर त्यानं ट्वीटरवर आपल्या नावातून आडनाव वगळून फक्त सुशांत ठेवलं होतं.
 
ट्रोल्सना उत्तर देताना तो म्हणाला होता, ''मूर्ख मैंने अपना सरनेम बदला नहीं है. तुम यदि बहादुरी दिखाओगे तो मैं तुमसे 10 गुना ज़्यादा राजपूत हूं. मैं कायरतापूर्ण हरकत के ख़िलाफ़ हूं.'
 
अभिनयाबरोबर त्याला खगोलशास्त्राचंही वेड होतं लॉकडाऊनच्या काळात तो इन्स्टाग्राम कधी गुरु तर कधी मंगळाचे फोटो पोस्ट करत होता.त्याचे चाहते त्याला एक विचारी कलाकार म्हणून लक्षात ठेवतील.
 
चंदा मामा दूर के हा त्याचा सिनेमा झाला नाही. या सिनेमात तो अंतराळप्रवाशाची भूमिका करणार होता. त्यासाठी तो नासामध्ये जाऊन तयारी करणार होता. सोनचिडीयामध्ये त्यानं आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन काम केलं. लाखन नावाच्या डाकूची भूमिका त्यानं त्यामध्ये केली. विशाल हृद्य असलेल्या आणि तत्वनिष्ठ डाकूची ही भूमिका होती.
 
"गैंग से तो भाग लूँगा वकील, अपने आप से कैसे भागूँगा" हा डायलॉग जेव्हा तो म्हणतो तेव्हा प्रेक्षक म्हणून तुम्ही त्याचीच बाजू घेता. त्यानं सर्वच सिनेमांमध्ये उत्तम काम केलं आणि कधी त्याच्यावर टीका झालीच नाही असं नाही.
 
राब्ता आणि केदारनाथमुळे त्याच्यावर टीकाही झाली. चित्रपटगृहातील त्याचा शेवटचा सिनेमा छिछोरे फार काही विशेष प्रगती करु सकला नाही. पण त्याच्यात एक खास आत्मविश्वास होता. बीबीसीला दिलेल्या एका मुलाखतीत तो म्हणाला होता, मला सिनेमे मिळाले नाहीत तर मी टीव्हीवर जाईन, टीव्हीवर काम नाही मिळालं तर थिएटर करेन. थिएटरमध्ये मी 250 रुपयांत शो केले आहेत. कारण लोकांना माझा अभिनय आवडायचा. मला अपयशी होण्याची भीती नाही.
 
इतक्या आत्मविश्वासानं भारलेल्या तरुणानं, ज्याला अपयशाची भीती वाटत नव्हती, समोर अख्खं आयुष्य पडलेलं असताना, यश पायाशी असताना आत्महत्या केली हे ऐकून धक्का बसतो. मेरा दिल या मालिकेत त्याचा सुरुवातीलाच मृत्यू झाल्याचं दाखवलं होतं. मात्र त्याचा अभिनय इतका आवडला होता की त्याला आत्म्याच्या रुपात मालिकेत पुन्हा आणलं होतं. ते एक काल्पनिक जग होतं म्हणून शक्य झालं. आता तो परत येणार नाहीये.
 
त्याचा सोनचिडीयामधील डॉयलॉग सर्वांना आठवतो. मनोज वाजपेयी त्याला मृत्यूचं भय वाटतंय का विचारतो तेव्हा सुशांत म्हणजे लाखन म्हणतो, "एक जन्म निकल गया इन बीहड़ों में दद्दा, अब मरने से काहे डरेंगे."
 
'धोनी आणि माझं आयुष्य एकसारखंच'
एम. एस. धोनी अनटोल्ड स्टोरी या सिनेमाच्यावेळेस बीबीसीने सुशांत सिहं राजपूत यांच्याशी चर्चा केली होती. त्यावेळेस सुशांतने धोनी आणि आपलं आयुष्य एकसारखंच असल्याची भावना व्यक्त केली होती. तो म्हणाला होता, "माझं आणि धोनीचं आयुष्य यामध्ये अनेक साम्यस्थळं आहेत. त्यामुळे धोनीची भूमिका साकारायला मदत झाली. त्याच्या जीवनप्रवासामध्ये मी माझा जीवनप्रवास पाहात होतो त्यामुळे ही भूमिका साकारणं सोपं गेलं होतं.
 
आमचं क्षेत्र वेगवेगळं असलं तरी जीवनाचा पॅटर्न एक आहे. प्रत्येक आघाडीवर आम्ही जोखिम घेतली आहे आणि यश मिळवलं आहे. लोक धोनीला इतकं नीट ओळखतात की पडद्यावर त्याला साकारताना लहानशी चूक झाली तरी ती मोठी चूक दिसेल." सुशांतच्या या बोलण्यातूनच तो भूमिकेसाठी घेत असलेल्या मेहनतीचा अंदाज येतो. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती