जान्हवी कपूरच्या बायोपिकचे टायटल अनिश्चित

शनिवार, 11 मे 2019 (14:33 IST)
बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या गुंजन सक्सेना यांच्या जीवनावर आधारित असलेल्या बायोपिकच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. गुंजन या भारताच्या पहिल्या महिला हेलिकॉप्टर पायलट असून त्यांनी कारगिल युद्धात निर्णायक अशी भूमिका पार पाडली होती. या चित्रपटाचे शूटिंग लखनऊ येथे फेब्रुवारीपासूनच सुरू करण्यात आले आहे. या चित्रपटाचे टायटल 'कारगिल गर्ल' असे ठेवण्यात आले आहे. पण संरक्षण मंत्रालयाकडून अद्याप त्याला मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे चित्रपटाच्या टायटलची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
 
जान्हवी कपूरचा हा दुसरा चित्रपट असून ती पहिल्यांदाच बायोपिकमध्ये काम करत आहे. या बायोपिकमध्ये जान्हवी कपूरशिवाय अंगद बेदीही काम करणार असून ते तिच्या भावाची भूमिका साकारणार आहेत. तसेच तिच्या वडिलांच्या भूमिकेत पंकज त्रिपाठी दिसणार आहेत. या चित्रपटाचे शूटिंग लखनऊ येथील एअरफोर्स स्टेशनवर करण्यात येणार आहे.
 
दरम्यान, सिद्धार्थ मल्होत्रा स्टारर विक्रम बत्रा यांच्या बायोपिकला संरक्षण मंत्रालयाने ग्रीन सिग्नल दिला आहे. हा चित्रपट 'कारगिल के शेर शाह' या नावाने प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या स्क्रिप्टलाही मंजुरी मिळाली असून लवकरच शूटिंग सुरू करण्यात येणार आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती