जॅकलिन साकारणार स्मिताची भूमिका ?

मंगळवार, 25 जून 2019 (10:11 IST)
स्मिता पाटील हे चित्रपटसृष्टीला पडलेले एक सुंदर, पण अल्पजीवी स्वप्न होते. स्मिताने आपल्या अल्पायुष्यात जे काही चित्रपट केले त्याधील तिच्या अभिनयाने नवे मापदंड निर्माण केले. तिच्या कारकिर्दीतील एक गाजलेला चित्रपट म्हणजे 'अर्थ'. 1982मधील या महेश भट्ट दिग्दर्शित चित्रपटात स्मिता पाटील आणि शबाना आझमी यांच्या अभिनयाची जुगलबंदीच रंगली होती. आता या चित्रपटाचा रिमेक बनवला जाणार असून त्यामध्ये स्मिताने साकारलेली भूमिका जॅकलिन फर्नांडिस करण्याची शक्यता आहे! 2017 मध्येच शरद चंद्र यांनी या चित्रपटाची घोषणा केली होती. मात्र, अद्याप त्याची जुळवाजुळवच सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जॅकलिनकडे या भूमिकेविषयी विचारणा करण्यात आली आहे. तिला चित्रपटाची संकल्पना आणि त्यामधील भूमिकाही आवडली असून, ती स्वतः हा चित्रपट करण्यासाठी उत्सुक असल्याचे समजते. अर्थात स्मिताने साकारलेल्या भूमिकेचे आव्हान पेलणे ही सहजसोपी गोष्ट नाही. मात्र, जॅकलिनने ते स्वीकारण्याचे ठरवले आहे. अद्याप याविषयी कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नसली तरी या चित्रपटात जॅकलिन दिसू शकते, असे म्हटले जाते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती