बिग बॉस 17 : सुशांत सिंहसोबत ब्रेकअप झाल्यानंतर अंकिता लोखंडेनं विकी जैनला म्हटलेलं...

मंगळवार, 31 ऑक्टोबर 2023 (21:50 IST)
मधु पाल
अभिनेत्री अंकिता लोखंडे सध्या पुन्हा एकदा चर्चेत आहे.
 
तिच्या चर्चेत येण्याचं कारण म्हणजे तिची बिग बॉस 17 मध्ये स्पर्धक म्हणून झालेली एन्ट्री.
 
अंकिता एकटी बिग बॉसच्या घरात आली नाही. तिचा बिझनेसमन पती विकी जैन तिच्यासोबत आहे.
 
बिग बॉस शो सुरू होऊन थोडेच दिवस झाले आहेत, पण बिग बॉसच्या घरात भांडणं आणि वाद-विवादांना तोंड फुटलंय.
 
अनेक स्पर्धक एकमेकांशी हुज्जत घालताना दिसतात. पण शोच्या पहिल्या काही दिवसांतच अंकिता आणि तिच्या पतीमध्ये भांडण-वादविवाद होईल, असं कोणालाच वाटलं नव्हतं.
 
यावेळी बिग बॉस 17 चं वैशिष्ट्य म्हणजे मनोरंजन क्षेत्रातून अनेक जोडपी आली आहेत. ज्यांच्यामध्ये प्रेम आणि मतभेद दोन्ही दिसतात.
 
अंकिता लोखंडेचं आपल्या पतीसोबत भांडण होत आहे, कारण तो तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतो आणि घरातील इतर सदस्यांकडे जास्त लक्ष देतो असं तिला वाटतं.
 
अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांचं डिसेंबर 2021 मध्ये लग्न झालं.
 
बिग बॉसच्या घरात नवरा-बायकोत भांडण
विकी जैन आणि अंकिता लोखंडे हे दोघंही या शोचे प्रबळ स्पर्धक म्हणून समोर आले आहेत.
 
मात्र, शोच्या सुरुवातीपासूनच अंकिता आणि विकी यांच्यात गेम प्लॅनिंगवरून वाद सुरू होता.
 
अशा स्थितीत दोघांमध्ये दुरावाही दिसून येत आहे.
 
अंकिता आणि तिचा पती विकी जैन यांच्यातील भांडण इतकं वाढलं आहे की, आता ते एकमेकांबद्दल बोलू लागले आहेत.
 
शोच्या ताज्या एपिसोडमध्ये जेव्हा विकी जैन पत्नी अंकिता लोखंडेला म्हणाला, "तू मला आयुष्यात काही दिलं नाही, तर किमान मनःशांती तर दे."
 
हे ऐकल्यानंतर सोशल मीडियावर याची चर्चा सुरू झाली आणि अंकिताचे चाहते तिला सपोर्ट करताना दिसले.
 
अंकिता लोखंडे ही 15 वर्षांहून अधिक काळ एंटरटेनमेंट इंडस्ट्रीशी निगडीत आहे.
 
या 15 वर्षांत तिच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले. अंकिता लोखंडेच्या आतापर्यंतच्या आयुष्याबद्दल जाणून घेऊयात.
 
पवित्र रिश्ता मालिकेमुळे आयुष्य बदललं
अंकिता लोखंडेचा जन्म 19 डिसेंबर 1984 रोजी मध्य प्रदेशातील इंदूर येथील एका महाराष्ट्रीयन कुटुंबात झाला.
 
शिक्षण पूर्ण केल्यानंतर अंकिता 2005 मध्ये मुंबईत आली आणि 2007 मध्ये 'इंडियाज बेस्ट सिनेस्टार की खोज' या शोमधून तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात झाली.
 
एकता कपूरच्या 'पवित्र रिश्ता'नं अंकितानं आपलं करिअर सुरु केलं.
 
2009 ते 2014 या काळात तिनं या मालिकेत काम केलं. या मालिकेत तिने अर्चना देशमुखची मुख्य भूमिका साकारली होती.
 
या शोमध्ये अंकितासोबत अभिनेता सुशांत सिंग राजपूत मुख्य भूमिकेत होता.
 
ही मालिका इतकी लोकप्रिय झाली की प्रेक्षकांनी या जोडीला टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील नंबर वन जोडी बनवलं.
 
या शोमधील मानव आणि अर्चना ही व्यक्तिरेखा घराघरात ओळखली जाऊ लागली.
 
ज्येष्ठ पत्रकार आणि समीक्षक डॉ. रामचंद्रन श्रीनिवासन यांनी बीबीसी हिंदीला सांगितलं की, सुशांत सिंग राजपूत आणि अंकिता लोखंडे यांची पहिली भेटही 'पवित्र रिश्ता'च्या सेटवर झाली होती.
 
या शो दरम्यान दोघांमधील जवळीक वाढली.
 
सुशांत-अंकिताचं नातं आणि ब्रेकअप
श्रीनिवासन म्हणतात, "सुशांत आणि अंकिताची जोडी इतकी लोकप्रिय झाली की त्यांना अनेक पुरस्कार मिळाले.
 
'झलक दिखला जा'च्या चौथ्या सीझनमध्येही ही जोडी कपलच्या भूमिकेत दिसली होती.
 
त्यांचं नातं जवळपास सहा वर्षे टिकलं. दोघांनी नेहमी एकमेकांची काळजी घेतली, पण जेव्हा ब्रेकअप झालं तेव्हा ते खूप शांततेत घडलं आणि दोघांमध्ये वाद झाला नाही.
 
ते सांगतात, "सुशांत सिंग राजपूत खूप चांगला माणूस होता. त्याने नेहमी अंकिताचा आदर केला आणि ब्रेकअपनंतरही तिच्याशी एक मैत्रीण म्हणून नातं जपलं.
 
14 जून 2020 रोजी जेव्हा सुशांतचा मृत्यू झाला तेव्हा अंकिता उद्ध्वस्त झाली होती. त्यांच्या मृत्यूनं तिला खूप मोठा धक्का बसला."
 
ते सांगतात की, "सुशांत आणि अंकिता त्या वेळी एकत्र नसतील, पण त्यांच्याकडे एकमेकांच्या अनेक सुंदर आठवणी होत्या.
 
विभक्त झाल्यानंतरही सुशांत आणि अंकिता नेहमीच एकमेकांसाठी काळजी करत असतं. सुशांतच्या मृत्यूच्या बातमीनं तीला कमकुवत केलं होतं."
 
सुशांतच्या मृत्यू झाल्याने अंकिताला मोठा धक्का बसला
 
अंकिताने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, सुशांत सिंह राजपूतपासून वेगळं झाल्यानंतर ती आतून खूप तुटली होती.
 
जेव्हा तिचा सुशांतसोबत ब्रेकअप झाला तेव्हा हा धक्का सहन करणं खूप कठीण होतं. याचं कारण त्यांचं रिलेशनशिप दीर्घकाळ चाललं होतं.
 
तेव्हा ती म्हणाली होती की, "जेव्हा एक मूव्ह ऑन करतो आणि दुसरा करु शकतं नाही, तेव्हा ते अधिक कठीण होतं. दुसरा अजूनही विचार करतो की, कधी ना कधी तो परत त्याच्याकडे येईल.
 
या वेदनेतून बाहेर पडायला मला अडीच वर्षे लागली. मी या वेदनेतून बाहेर पडू शकत नव्हती.
 
अशा परिस्थितीत मी दुसऱ्या कोणाशी डेटिंग करण्याचा विचारही करू शकत नव्हते. हे माझ्यासाठी खूप वेदनादायक होतं. पण मी प्रेमावर विश्वास ठेवणं कधीच सोडलं नाही."
 
तिने सांगितलं होतं की "विकी जैन माझा खूप चांगला मित्र होता, खरं तरं मी त्याला त्या दृष्टीकोनातून कधीच पाहिलं नव्हतं. मी विकीशी बोलायचे आणि त्यावेळी मी त्याला सांगायचे की माझा एक्स एक ना एक दिवस नक्कीच परत येईल. मी त्याची वाट पाहीन.
 
हे कसं झालं ते मला माहित नाही, विकी माझ्या आयुष्यात आला आणि त्यानं मला लग्नासाठी प्रपोज केलं.
 
एका नात्यातून बाहेर पडून दुसऱ्या नात्यात गेल्याची मला त्यावेळी जाणीव झाली. यातून बाहेर पडणं माझ्यासाठी खूप वेदनादायी होतं. पण विकी माझ्या आयुष्यात आल्यानंतर माझं आयुष्य बदललं."
 
'मणिकर्णिका' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये प्रवेश
अंकिताने कंगनाच्या 'मणिकर्णिका' या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत प्रवेश केला.
 
अंकिता लोखंडेच्या अभिनय कारकिर्दीचा संदर्भ देत डॉ.रामचंद्रन श्रीनिवासन सांगतात की, अंकितानं अनेक मोठे चित्रपट करण्यास नकार दिला होता हे खरं आहे.
 
ते सांगतात की, जर तुम्हाला आठवत असेल, तर कंगना रणौतच्या 'मणिकर्णिका' या झाशीच्या राणीवर आधारित चित्रपटातील अंकिताची भूमिका लोकांना आवडली होती.
 
चित्रपटाचे कौतुक झालं पण चित्रपटाचं बजेट खूप जास्त असल्यानं अपेक्षेइतकी कमाई तो चित्रपट करू शकला नाही.
 
त्यानंतर तिने साजिद नाडियाडवाला यांच्या 'बागी 3' चित्रपटातही काम केलं.
 
संजय लीला भन्साळी आणि फरहा खानला 'नाही' का म्हटलं?
डॉ. रामचंद्न श्रीनिवासन पुढे म्हणतात की संजय लीला भन्साळी यांनी अंकिता लोखंडेला 'रामलीला' ऑफर केला होता.
 
परंतु अंकितानं या चित्रपटाला नाही म्हटलं होतं. कारण त्यात अनेक इंटिमेट सीन, चुंबन दृश्यं होती, जी ती करू शकत नव्हती. म्हणूनच ती नाही म्हणाली.
 
त्यांना या चित्रपटात सुशांतला कास्ट करायचं होतं, पण ते होऊ शकलं नाही.
 
फरहा खानच्या 'हॅपी न्यू इयर' या चित्रपटात तिला भूमिका ऑफर करण्यात आली होती, परंतु कथेत ज्या पद्धतीनं हे पात्र साकारलं जाणार होतं ते तिला आवडलं नाही.
 
ते सांगतात की, "अनेक मुली इंडस्ट्रीत येतात आणि त्या भरकटतात.अंकिता ही अनेक लोकांसाठी आदर्श आहे, जी स्वतःच्या अटींवर आयुष्य जगत आहे."

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती