हिंद आणि अटलांटिक महासागराचा संगम अर्थातच केपटाऊन

मंगळवार, 18 जून 2019 (13:36 IST)
दक्षिण आफ्रिकेतल्याच नव्हे, तर जगातल्या काही सुंदर शहरांपैकी एक शहर आहे केपटाऊन. हिंद महासागर आणि अटलांटिक महासागराच्या संगमाच्या ठिकाणी केपटाऊन बसले आहे. 'सुंदर' कशाला म्हणतात, हे तुम्हाला या शहरात आल्यानंतर कळेल.
 
शहराची सौंदर्य बघायला बाहेर पडायला लागत नाही. कुठेही बघितलं तरी जे काही दिसतं ते सुंदरच असतं. एखाद्या मोठ्या भावाप्रमाणे केपटाऊनला जगप्रसिद्ध टेबल माऊंटनचा आधार लाभला आहे. थंड हवेमुळे केपटाऊन हिरवेगार आहे. 1500 मीटर उंचीवर असलेले टेबल माऊंटन जगातील सर्वात मोठे पठार आहे. पाचगणीच्या कमीतकमी 20 पट मोठे हे पठार आहे. 
टेबल माऊंटवर जायचा केबलकारचा प्रवास चित्तथरारक असतो. कारण वर जाताना केपटाऊन शहराच्या सौंदर्यात महासागरांचा संगम भर टाकतो. टेबल माऊंटनवरून नेल्सन मंडेलांना 17 वर्षे डांबून ठेवलेला रोबेन आलंडचा तुरुंग दिसतो. आता या तुरुंगात गेल्यावर मंडेलांसोबत तुरुंगवास भोगलेले क्रांतीवीर माहिती सांगतात.
 
केपटाऊन शहराचं मुख्य आकर्षण आहे 'वॉटरफ्रंट' नावाने ओळखला जाणारा भाग. अटलांटिक महासागराचे अफलातून दर्शन या जागेवरून होते. समुद्राचा अथांगपणा काय असतो हे वॉटरफ्रंटचा सूर्यास्त बघितल्यावर कळते. अथांग समुद्र, उंचच्या उंच पहाड, वाळवंट, सोन्याच्या आणि हिर्‍यांच्या खाणींबरोबबरच वन्य जीवनाचा आस्वाद इतिहासाच्या मोठा वारसा लाभलेला या अनोख्या देशात-दक्षिण आफ्रिकेत घेता येतो.
एकच विनंती आहे - दक्षिण आफ्रिकेत आलात तर चार-पाच दिवसांसाठी येऊ नका. जरा मोकळा वेळ काढून या. तुम्हा पर्यटकांना मोह घालणारे सर्वकाही या देशात अनुभवायला मिळेल.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती