शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस खरोखरच एकत्र येतील का?

मंगळवार, 5 नोव्हेंबर 2019 (16:35 IST)
राज्यात सत्तास्थापनेचा तिढा सुटत नसताना आता शिवसेनेच्या नेतृत्वाखाली आणि काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पाठिंब्यानं सरकार स्थापनेची चर्चा सुरू झाली आहे. पण हे खरोखरच शक्य आहे का?
 
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत सोनिया गांधींच्या भेटीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत शिवसेनेकडून सत्तास्थापनेसाठी प्रस्ताव आलेला नाही असं सांगतानाच शिवसेनेला पाठिंबा देण्याची शक्यता पूर्णपणे फेटाळलेली नाही.
 
एवढंच नाही तर मुंबईत जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा करून पुन्हा सोनिया गांधींशी चर्चा करणार हे सुद्धा पवारांनी आवर्जून सांगितलं आहे. पर्याय खुले असल्याचा संकेत शरद पवारांनी दिल्याचंच यातून मानलं जात आहे.
 
एकीकडे शरद पवारांनी आघाडीची शक्यता फेटाळली नसताना शिवसेना नेते संजय राऊत यांनीही पवारांच्या संपर्कात असल्याचं स्पष्ट केलंय.
 
संजय राऊत म्हणालेत की, "शरद पवारांचं आणि माझं बोलणं झालं, मी लपवत नाही. शरद पवारांशी बोलणं किंवा संपर्क करणं हा काय अपराध आहे काय? ते महाराष्ट्राचे, देशाचे नेते आहेत. या महाराष्ट्रात त्यांचे 55च्या आसपास आमदार निवडून आले आहेत. त्यांच्याशी का बोलू नये? आम्ही शरद पवारांशी बोलल्याचा ज्यांना पोटशूळ उठला आहे. ते सुद्धा कुठे आणि कधी पवारांशी बोलण्याचा प्रयत्न करतायेत हे काय आम्हाला माहिती नाही?"
 
भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस अशी आघाडी निर्माण करण्याबाबत राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
 
राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेला अनुकूल असल्याचं दिसत असलं तरी काँग्रेसमध्ये मात्र याबाबत दोन मतप्रवाह आहेत. काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई यांनी शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत जाहीर भूमिका घेतली आहे.
 
तर सुशीलकुमार शिंदे, संजय निरूपम या नेत्यांनी मात्र शिवसेनेसोबत जाण्यास विरोध दर्शवला आहे. काँग्रेस नेतृत्वानं अजून याबाबत भूमिका स्पष्ट केलेली नाही.
 
नव्या समीकरणांची शक्यता नाकारता येणार नाही?
काही राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे की शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशी आघाडी प्रत्यक्षात येण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
 
लोकसत्ताचे सहायक संपादक मधु कांबळे यांचं म्हणणं आहे की भाजपविरोधी अशी चाचपणी सध्या सुरू आहे.
 
"शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशा आघाडीच्या दृष्टीनं विचार सुरू आहे असं दिसतंय. जर सत्तास्थापनेच्या तिढ्यामध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसला काहीच रस घ्यायचा नसता तर त्यांनी स्पष्टपणे तसं सांगितलं असतं. आम्ही कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेसोबत युती करणार नाही किंवा पाठिंबा देणार नाही असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं असतं. यावरून असं वाटतंय की शक्यतांची चाचपणी काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून सुरू आहे," असं मधु कांबळेंनी म्हटलंय.
 
पुढे त्यांनी सांगितलं की, "काँग्रेसची अडचण आहे हे खरं आहे, पण बदललेल्या परिस्थितीत भाजपविरोधी पाऊल या दृष्टिकोनातून काँग्रेस सेनेला पाठिंबा देण्याबाबत विचार करू शकते. पूर्वी काँग्रेसविरुद्ध इतर सर्व असे जे प्रयोग झाले तशी परिस्थिती आज महाराष्ट्रात भाजपविरूद्ध इतर सर्व अशी निर्माण होऊ शकते. त्यामुळे शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या आघाडीची शक्यता फेटाळता येणार नाही."
 
महाराष्ट्र टाइम्सचे वरिष्ठ सहायक संपादक विजय चोरमारे यांचंही म्हणणं आहे की शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
 
"असं एक समीकरण आकाराला येऊ शकतं याचा अंदाज निवडणुकीच्या आधीपासून होता. शिवसेनेशिवाय राज्यात कोणाचीच सत्ता स्थापन होऊ शकत नाही. मग शिवसेना-भाजप जर एकत्र येऊ शकत नसतील तर शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र येऊन काँग्रेस बाहेरून पाठिंबा देऊ शकते. काँग्रेसची द्विधा मनस्थिती असली तरी शरद पवार काँग्रेस नेतृत्वाला पटवून देऊ शकतात," असं चोरमारे सांगतात.
काँग्रेससमोर मात्र अडचण?
दैनिक लोकमतचे वरिष्ठ सहायक संपादक संदीप प्रधान यांचं मात्र म्हणणं आहे की काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा देण्याची अजिबात शक्यता नाही.
 
"शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी असं समीकरण राज्यात आकारास येऊ शकतं असं मला वाटत नाही. राष्ट्रवादी आणि शिवसेना वेळप्रसंगी एकत्र येऊ शकतात. अर्थात त्यात सुद्धा काही घटक दुरावण्याची राष्ट्रवादीसाठी रिस्क असणारच. तरी महाराष्ट्राच्या अभिमानाचा मुद्दा, दिल्लीपुढे झुकणार नाही ही जी लाईन आहे, त्या भूमिकेवर हे दोन्ही पक्ष एकमेकांशी मैत्री करू शकतात. पण काँग्रेसला शिवसेनेच्या नेतृत्वाखालील सरकारला बाहेरून पाठिंबा देणं सुद्धा अडचणीचं ठरू शकतं," असं प्रधान सांगतात.
 
शिवसेनेला पाठिंबा देणं राष्ट्रीय पातळीवर काँग्रेसला अडचणीचं ठरू शकतं असं विश्लेषण संदीप प्रधान यांनी केले आहे.
 
"15 नोव्हेंबरच्या नंतर अयोध्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल अपेक्षित आहे. जर राममंदिराच्या अनुकूल असा निकाल लागला तर सत्ताधारी शिवसेना जल्लोष करतेय आणि त्याच वेळी काँग्रेस कदाचित हा निकाल स्वीकारताना वेगळी भूमिका घेत आहे, असं जेव्हा चित्र निर्माण होईल, तेव्हा देशभरात काँग्रेस काय उत्तर देणार? महाराष्ट्रात शिवसेनेला कुठल्या गोष्टीसाठी पाठिंबा दिला हे सांगणार?"
 
"पश्चिम बंगाल आणि इतर राज्यांमध्ये ज्या ठिकाणी आगामी काळात निवडणुका होणार आहेत तिथे काँग्रेसला याची किंमत मोजावी लागू शकते. अगोदरच तोळामासा झालेली काँग्रेस, शिवसेनेसारख्या 1992-93 च्या दंगलीचा इतिहास मागे असलेल्या पक्षाला जर पाठिंबा देईल तर त्यांना त्याची देशभर उत्तरं द्यावी लागतील."
महापालिकेत काय होणार?
राज्याची सत्ता मिळवण्यासाठी राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत जात असताना शिवसेनेला मुंबई महापालिकेसारखं अत्यंत महत्त्वाचं सत्ताकेंद्रही हातातून जाऊ द्यायचं नाही.
 
सध्या मुंबई महापालिकेत भाजपच्या पाठिंब्यावर शिवसेनेची सत्ता आहे. राज्याच्या पातळीवर युती तुटल्यास त्याचा मुंबई महापालिकेतही परिणाम होऊ शकतो.
 
पण अर्थातच राज्याच्या पातळीवर जर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशी आघाडी झाल्यास महापालिकेतही शिवसेनेला या दोघांचा पाठिंबा मिळू शकतो.
 
सध्या महापालिकेचे संख्याबळ पाहिल्यास शिवसेनेचे 94 नगरसेवक, भाजपचे 83 नगरसेवक, काँग्रेसचे 28 नगरसेवक तर राष्ट्रवादीचे 8 नगरसेवक आहेत.
 
227 सदस्यीय महापालिकेत सध्या 222 नगरसेवक असून 5 जागा रिक्त आहेत. बहुमतासाठी 112 नगरसेवकांची गरज लागेल. अशा परिस्थितीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर शिवसेना आपले बहुमत कायम ठेऊ शकते.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती