प्रिन्स हॅरी आणि मेगन यांनी शाही सन्मानाचा त्याग करण्याचा निर्णय का घेतला?

शनिवार, 11 जानेवारी 2020 (16:08 IST)
आपण राजघराण्याच्या 'वरिष्ठ रॉयल'पदाचा त्याग करत असल्याची घोषणा महाराणी एलिझाबेथ यांचे नातू प्रिन्स हॅरी आणि त्यांच्या पत्नी मेगन मर्केल यांनी केली आहे. ड्युक आणि डचेस ऑफ ससेक्स ही मानाची उपाधी मिळालेलं हे जोडपं वर्षातला काही काळ ब्रिटनमध्ये तर काही काळ उत्तर अमेरिकेत राहणार असल्याचंही म्हटलं आहे.
 
या जोडप्याला आर्ची नावाचा मुलगा आहे. आपण राजघराण्यात एक 'पुरोगामी आणि नवीन भूमिका' बजावू इच्छितो आणि 'आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी' होऊ इच्छितो, असं त्याचं म्हणणं आहे.
 
या निर्णयामागचं कारण काय?
प्रिन्स हॅरी आणि मेगन सांगतात की अनेक महिने खल आणि चर्चा केल्यानंतर आम्ही या निर्णयाप्रत पोचलो आहोत.
 
त्यांच्या या निर्णयाची एक झलक लोकांना गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यातच बघायला मिळाली होती. त्यावेळी ते दोघे आफ्रिकेच्या दौऱ्यावर होते आणि त्यांच्यावर एक डॉक्युमेंट्रीही बनवण्यात आली होती.
 
शाही आयुष्य आपल्यासाठी 'अवघड' आहे आणि कायम मीडियाच्या कायम नजरेत राहाण्याची आपण तयारी केलेली नव्हती, अशी कबुली मेगन यांनी या डॉक्युमेंट्रीत दिली होती.
 
वृत्तपत्र तुझं आयुष्य खराब करू शकतात, असा इशारा आपल्या ब्रिटीश मित्रांनी दिला होता, असंही मेगन यांनी म्हटलं आहे.
 
यापूर्वीच दिले होते संकेत
मेगन नवीन-नवीन आई झाल्या त्याचवेळी ही डॉक्युमेंट्री तयार करण्यात आली होती. राजघराण्यातली नवीन सदस्य बनण्याने येणाऱ्या ताणाचा तुम्ही कसा सामना करत आहात, हे विचारल्यावर त्या म्हणाल्या होत्या, "मी खूप आधीच एचला (हॅरीला) सांगितलं होतं की केवळ जगणं पुरेसं नाही. आयुष्याचं उद्दीष्ट केवळ जगणं नसतं तर आयुष्यात तुम्हाला पुढे जायचं असतं"
या डॉक्युमेंट्रीमध्ये प्रिन्स हॅरी त्यांच्या मानसिक आरोग्य आणि ताणाविषयीही बोलले. मला आपल्या मानसिक आरोग्याची कायम काळजी घ्यावी लागते, असं त्यांनी म्हटलं होतं.
 
प्रिन्स हॅरी आणि मेगन यांच्या या निर्णयाविषयी बीबीसीचे राजघराणेविषयक प्रतिनिधी जॉनी डायमंड यांचं म्हणणं आहे की शाही जोडपं म्हणून अनेक अशी कामं होती जी हॅरी आणि मेगन यांना सहन झाली नाही. तसंच "प्रिन्स हॅरी यांना 'मीडिया अटेंशन' अजिबात आवडत नाही आणि शाही कार्यक्रमांमध्ये त्यांना फार कंटाळा यायचा."
 
आपण एका वृत्तपत्राविरोधात कायदेशीर कारवाई करणार असल्याचं गेल्या वर्षी प्रिन्स हॅरी आणि मेगन यांनी म्हटलं होतं. संबंधित वृत्तपत्राने मेगन यांचं एक पत्र बेकायदेशीरपणे प्रकाशित केल्याचा प्रिन्स हॅरी यांचा आरोप होता. मात्र, वृत्तपत्र आपल्या बातमीवर ठाम होतं.
 
त्यावेळी प्रिन्स हॅरी संतापून म्हणाले होते, "मी माझ्या आईला गमावलं आहे आणि आता मी माझ्या पत्नीलाही त्याच त्रासाला सामोरे जाताना बघतोय."
आई प्रिन्सेस डायना यांच्या 1997 साली एका कार अपघातात झालेल्या मृत्यूचा उल्लेख करत प्रिन्स हॅरी म्हणाले होते, "मी बघितलं आहे की माझ्या प्रिय व्यक्तीला कशापद्धतीने एखाद्या वस्तूसारखं दाखवण्यात आलं. लोकांनी तिच्याशी जिवंत व्यक्ती म्हणून व्यवहार करणंच बंद केलं होतं."
 
या निर्णयावर राजघराण्याची प्रतिक्रिया
बीबीसीला मिळालेल्या माहितीनुसार प्रिन्स हॅरी आणि मेगन मर्केल यांनी बुधवारी संध्याकाळी अचानक हा निर्णय जाहीर केला त्यापूर्वी त्यांनी राजघराण्यातल्या कुठल्याच व्यक्तीशी याविषयावर चर्चा केलेली नव्हती. महाराणी एलिझाबेथ आणि प्रिन्स ऑफ वेल्सशीहदेखील सल्लामसलत केलेली नव्हती.
 
बंकिंगहॅम पॅलेसच्या एका प्रवक्त्याने बीबीसीला सांगितलं की राजघराण्याला या निर्णयामुळे 'निराशा' झाली आहे. प्रवक्त्यांनी सांगितलं, "हॅरी आणि मेगन यांच्याशी याविषयावरची चर्चा सुरुवातीच्या टप्प्यातली होती. वेगळा मार्ग पत्करण्याची त्यांची इच्छा आम्ही समजू शकतो. मात्र, हा मुद्दा खूप गुंतागुंतीचा आहे आणि सर्व काही सुरळीत व्हायला वेळ लागेल"
 
बीबीसीचे राजघराण्याविषयक प्रतिनिधी जॉनी डायमंड यांचं म्हणणं आहे की घराण्यातल्या इतर सदस्यांशी सल्लामसलत न केल्याने वाद वाढू शकतात.
 
हा निर्णय म्हणजे हॅरी-मेगन आणि राजघराण यांच्यात असलेली स्पष्ट फूट असल्याचं डायमंड सांगतात.
इतर प्रतिक्रिया
बंकिंगहॅम पॅलेसचे माजी प्रेस अधिकारी डिक्की ऑर्बिटर यांनी प्रिन्स हॅरी यांच्या या निर्णयाची तुलना 1936 साली एडवर्ड आठवे यांनी घेतलेल्या निर्णयाशी केली आहे. एडवर्ड यांनी दोनदा घटस्फोटीत वॅलिस सिंपसन यांच्याशी लग्न करण्यासाठी राजगादीचा त्याग केला होता.
 
ते म्हणाले, "असं यापूर्वी एकदाच घडलं आहे आणि अलिकडच्या काळात कुणीही असं पाऊल उचललेलं नाही."
 
मेगन यांनी बुधवारी संध्याकाळी आपल्या निर्णयाबद्दल स्वतःच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केली. या पोस्टला आतापर्यंत 1,427,266 लाईक्स मिळाले आहेत.
 
या पोस्टवर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया आल्या आहेत. यापैकी बहुतांश प्रतिक्रिया नकारात्मक आहेत.
 
एका इन्स्टाग्राम यूजरने लिहिलं, "हा निर्णय तुम्हा दोघांसाठीही चांगला आहे."
 
आणखी एक यूजर लिहितो, "अमेरिकेच्या लोकांमध्ये राजघराण्याचं सदस्य होण्याचं धाडसच नसतं, हे या निर्णयावरुन कळतं."
 
टीव्ही ब्रॉडकास्टर पियर्स मॉर्गन यांनी प्रिन्स हॅरी यांना राजघराणं आणि त्यांचे थोरले बंधू प्रिन्स विलियम्स यांच्यापासून तोडण्यासाठी मेगन यांना दोष दिला आहे.
 
पत्रकार आणि लेखिका कॅटिलिन मोरेन यांनी ट्वीट केलं, "हॅरी आणि मेगन आता अर्थार्जन करु शकतात आणि शाही कामातून मुक्त होऊ शकतात. गेल्या वर्षीनंतर याहून अधिक समंजस निर्णय दुसरा कुठला असेल?"
 
अमेरिकी लेखिका आणि संस्कृती समिक्षक मिकी केंडलने ट्वीट केलं, "आपल्याला सिंहासन नको किंवा कुठली उपाधीही नको, याविषयी प्रिन्स हॅरी सुरुवातीपासून खूप स्पष्ट होते. मेगन त्यांच्या आयुष्यात आली त्यापूर्वीच त्यांची ही भूमिका होती." सिंहासनाच्या रांगेत प्रिन्स हॅरी यांचा क्रमांक सहावा आहे. त्यांच्या आधी प्रिन्स चार्ल्स, प्रिन्स विलियम्स आणि त्यांची तीन मुलं आहेत.
 
आणखी एका अमेरिकी लेखिकेने मेगन मर्केल यांच्या अमेरिकेत येण्याचं स्वागत केलं आहे.
 
दोघांना सध्या पैसा कुठून मिळतो?
आपल्याला मिळणाऱ्या पैशातला 95% भाग प्रिन्स ऑफ वेल्समधून येत असल्याचं जोडप्याने सांगितलं आहे. 2018-19 मध्ये या जोडप्याला 5 मिलीयन युरो मिळाले होते. प्रिन्स चार्ल्स यांची मालमत्ता आणि आर्थिक गुंतवणुकीतून मिळणाऱ्या वेतनातून प्रिन्स हॅरी आणि मेगन यांना निधी मिळतो.
 
उर्वरित 5% निधी हा स्वायत्त अनुदाच्या माध्यमातून मिळत असल्याची माहिती त्यांच्या वेबसाईटवर देण्यात आली आहे. हे अनुदान ब्रिटन सरकार राजघण्याला त्यांची कर्तव्य आणि राजमहालाच्या देखभालीसाठी देतं.
 
यात सुरक्षेचा खर्च गृहित धरलेला नाही. त्यासाठी वेगळी तरतूद करण्यात येत असते.
 
याव्यतिरिक्त या जोडप्याकडे स्वतःची अशी मालमत्ताही खूप आहे. हॅरीची आई प्रिन्सेस डायनाकडून दोन्ही मुलांना तब्बल 13 मिलीयन युरोची मालमत्ता मिळाली आहे.बीबीसीच्या प्रतिनिधीने दिलेल्या माहितीनुसार प्रिन्स हॅरी यांना त्यांच्या पणजीने म्हणजे महाराणी एलिझाबेथ यांच्या आईनेही बरीच मालमत्ता दिलेली आहे.
 
आपल्या अॅक्टिंग करियरमध्ये मेगन यांना प्रत्येक एपिसोडसाठी जवळपास 50,000 डॉलर्स मिळायचे, असा अंदाज आहे.
 
त्या लाईफस्टाईल ब्लॉग चालवतात आणि कॅनडाच्या एका गारमेंट ब्रँडसाठी त्या डिझायनिंगदेखील करतात.
 
या जोडप्याला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हायचं आहे म्हणजे काय?
 
आपल्याला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हायचं आहे, असं या जोडप्याने म्हटलं आहे. मात्र, स्वावलंबी म्हणजे त्यांना मिळणारं अनुदान ते घेणार नाहीत का, यावर त्यांनी अजून खुलासा केलेला नाही. या जोडप्याच्या सुरक्षेसाठीचा खर्च यापुढेही सरकारचं देणार आहे.
 
हे जोडपं यापुढे उत्तर अमेरिका आणि ब्रिटन इथे ये-जा करणार असल्याने सुरक्षेच्या खर्चात वाढच होणार आहे. मात्र, आपला प्रवास खर्च यापूर्वी आपणच देत होतो आणि यानंतर आपणच तो खर्च करणार, असं प्रिन्स हॅरी आणि मेगन यांनी स्पष्ट केलं आहे.
 
मात्र, प्रश्न असा आहे की स्वतः पैसे कमवण्याची परवानगी शाही जोडप्याला आहे का? वरिष्ठ रॉयल्स या नात्याने त्यांना कुठल्याही स्वरुपात वेतन कमावण्याचा अधिकार नाही. मात्र, राजघराण्यातले इतरही सदस्य स्वतः फुल-टाईम नोकरी करत असल्याचं या जोडप्याचं म्हणणं आहे.
 
राजघराण्यातल्या खर्चाविषयी पुस्तक लिहिणारे डेव्हिड मॅकक्लर यांच्या मते हे जोडपं आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी कसे होणार, हा वादाचा विषय आहे.
 
राजघराण्याची मालमत्ता
स्वतंत्र व्यावसायिक प्रॉपर्टी बिझनेस आणि यूकेमध्ये सर्वाधिक स्थावर मालमत्ता
बहुतांश मालमत्ता लंडनमध्ये आहे. मात्र, याशिवाय स्कॉटलँड, वेल्स आणि नॉर्थ आयलंडमध्येही मालमत्ता.
विंडसर ग्रेट पार्क आणि अॅस्कॉट रेसकोर्स यांचाही मालमत्तेत समावेश आहे. मात्र, बहुतांश प्रॉपर्टी ही रहिवासी आणि व्यावसायिक आहे.
राजघराण्याला मिळणारं स्वायत्त अनुदान
पुढे काय?
यापुढे आपण काही काळ ब्रिटनमध्ये आणि काही काळ उत्तर अमेरिकेत घालवू आणि एक चॅरिटेबल ट्र्स्ट स्थापन करू, असं प्रिन्स हॅरी आणि मेगन यांनी म्हटलं आहे.
 
मात्री ही चॅरीटेबल ट्रस्ट कुठे असेल आणि तिचं लॉन्चिंग कुठे करणार, याबद्दल त्यांनी काहीही सांगितलेलं नाही.
 
गेल्यावर्षी क्रिसमसनंतर प्रिन्स हॅरी आणि मेगन यांनी शाही कामकाजातून दिर्घ रजा घेतली होती. त्यानंतर सुट्टी घालवण्यासाठी ते कॅनडातल्या ब्रिटीश कोलंबियात गेले होते.
 
प्रिन्स हॅरी आणि मेगन यांचा पहिला शाही दौऱ्यामध्ये लंडनस्थित कॅनडाच्या दुतावासाला भेट दिली होती.
 
टोरंटो लाईफ मॅगेझिननुसार, "अमेरिकेत काम करताना टोरंटो हे मेगन यांच्यासाठी दुसरं घरच बनलं होतं. टोरंटोमध्ये त्यांच्या जेसिका, बेन मलरोनी यांच्यासारख्या जवळच्या मित्रांची घरही आहेत."
 
प्रिन्स हॅरी आणि मेगन कॅलिफोर्नियामध्ये मेगन यांच्या आईकडे काही काळ राहतील, असा अंदाज आहे.
 
मेगन यांचे वडील टॉमस मर्केल मेक्सिकोमध्ये राहतात आणि मेगन यांचा त्यांच्याशी फारसा संपर्कही नाही.
 
अलिकडच्या काळात प्रिन्स हॅरी आफ्रिकेत संरक्षणविषयक कामकाज बघत आहेत. तसंच सुरक्षा दलातील जखमी सदस्यांसाठी ते खेळांचं आयोजनही करतात. मेगन यांचं कामकाजही वाढलं आहे. त्या नॅशनल थिएटर आणि चॅरिटी स्मार्ट वर्क्समध्ये सहभागी झाल्या आहेत.
 
दोघं आणखी काय म्हणाले?
या जोडप्याने आपल्या वेबसाईटवरचा तो भागही अपडेट केला आहे ज्यात मीडियाशी असलेल्या त्यांच्या संबंधाविषयी चर्चा करण्यात आली आहे.
 
पत्रकारांना आपल्या कामाची सविस्तर माहिती मिळावी, यासाठी 2020मध्ये आपण मीडियासोबत काम करण्याची आपली पद्धत बदलणार आहोत, असं हॅरी आणि मेगन यांनी म्हटलं आहे.
 
येणाऱ्या काळात आपण लहान मीडिया हाउसेस आणि तरुण पत्रकारांशी जास्त बोलू, असंही त्यांनी सांगितलं आहे.
 
पत्रकारांना शाही कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी रोटा व्यवस्थेतून पास वितरित करण्यात येतात. या जोडप्याकडे असलेल्या रोटा व्यवस्थेचा अधिकारही ते सोडणार आहेत.
 
या जोडप्याने आपल्या वेबसाईटवर हेदेखील सांगितलं आहे, "वर्तमान व्यवस्था नव्या डिजिटल जमान्यासोबत ताळमेळ बसवू शकत नाहीय."
 
वेबसाईटवर 'मीडियाविषयी हॅरी आणि मेगन यांचा दृष्टीकोन काय?' या शिर्षकाखाली लिहिलं आहे की ते दोघंही "योग्य माहिती देणाऱ्या आणि सोबतच विविधता आणि सहिष्णुतेला वाव देणाऱ्या स्वतंत्र, मजबूत आणि पारदर्शी मीडियात विश्वास ठेवतात."
 
यात लिहिलं आहे, "राजघराण्याचे सदस्य म्हणून लोकांना आणि मीडियाला त्यांच्यात रस असणं, आम्ही समजू शकतो. त्यामुळेच प्रामाणिक आणि योग्य मीडिया रिपोर्टिंगचं स्वागत करतात. यासोबतच ते इतर लोक आणि कुटुंबातल्या सदस्यांप्रमाणे आपल्या वैयक्तिक बाबींचीही काळजी घेतात."
 
लोकांना आपल्या महत्त्वाच्या खाजगी क्षणांची माहिती मिळावी, यासाठी इन्स्टाग्रामसह इतर सोशल मीडिया व्यासपीठांचा वापर आपण सुरूच ठेवणार असल्याचंही या जोडप्याने सांगितलं आहे.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती