ईश्वरचंद्र विद्यासागर कोण आहेत, ज्यांच्या नावावरून सध्या राजकारण सुरू आहे

बुधवार, 15 मे 2019 (17:26 IST)
- प्रभाकर एम.
प्रसिद्ध शिक्षणततज्ज्ञ आणि समाजसुधारक ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी कधी कल्पनाही केली नसेल की त्यांच्या मृत्यूनंतर 128 वर्षांनंतर त्यांच्याच राज्यात ते निवडणुकीचा मुद्दा होतील.
 
पश्चिम बंगालची राजधानी कोलकात्यात सातव्या आणि अंतिम टप्प्यातील मतदानाच्या आधी भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या रोडशोदरम्यान झालेल्या गोंधळात आणि तोडफोडी दरम्यान ईश्वरचंद्र विद्यासागर एका रात्रीत राजकीय मुद्दा झाला आहे.
 
या गोंधळादरम्यान अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कथित समर्थकांनी कॉलेज स्ट्रीट भागात असलेल्या विद्यासागर कॉलेजमध्ये घुसून तोडफोड केलीच मात्र तिथे असलेल्या ईश्वरचंद्र विद्यासागर यांचा पुतळाही फोडला.
 
मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांनी लगोलग या मुद्द्याला बंगालच्या लोकांच्या भावनेशी जोडलं आणि त्याचा मुद्दा केला.
 
त्यांनी भाजपवर बंगालच्या महापुरुषांचा अपमान केल्याचा आरोप लावला आणि पुतळा फोडणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असं सांगितलं.
 
ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी रात्री शिक्षणमंत्री पार्थ चॅटर्जी यांच्याबरोबर घटनास्थळाची पाहणी केली. त्या म्हणतात, "भाजप बंगालच्या महापुरुषांचा अपमान करत आहे. लोक निवडणुकीच्या माध्यमातून या अपमानाचं योग्य ते उत्तर देतील. ही अतिशय लाजिरवाणी घटना आहे. आता पाणी डोक्यावरून गेलं आहे."
 
ममता बॅनर्जी यांच्या मते जो लोक महापुरुषांचा अशा प्रकारे अपमान करतात त्यांना राजकारणात राहण्याचा अजिबात अधिकार नाही. या घटनेचा निषेध म्हणून ममता बॅनर्जी यांनी फेसबुकवर ईश्वरचंद्र विद्यासागर यांचा फोटो लावला आहे.
 
हा मुद्दा तापू लागताच भाजपने याबाबतीत लगेच स्पष्टीकरण दिलं आहे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष म्हणतात, "पुतळा फोडण्यात भाजपचा हात नाही. कॉलेजमध्ये असलेल्या समाजकंटकांचं हे काम आहे."
 
त्यांनी ममता बॅनर्जींवर विनाकारण राजकारण करण्याचा आरोप लावला आहे.
 
या तोडफोडीत सहभाग असल्याच्या आरोपाचा भाजपने इन्कार केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी 26 लोकांना अटक केली आहे. पुतळा फोडणाऱ्या लोकांचा शोध घेतला जात आहे.
 
दुसऱ्या बाजूला विद्यासागर कॉलेजचे मुख्याध्यापक गौतम कुंडू म्हणतात, "ही अतिशय लाजिरवाणी घटना आहे. कॉलेजच्या आवारात येऊन असं नुकसान कुणी कसं करू शकतं? भाजपच्या लोकांनी फर्निचर आणि विद्यासागरांचा पुतळाही फोडला आहे.
 
मुख्याध्यापकांनीही पोलिसात या प्रकरणी तक्रार दिली आहे, कुंडू यांचा आरोप आहे की, हल्लेखोर एक लॅपटॉप आणि एका महिलेची पर्स घेऊन पळाले.
 
ईश्वरचंद्र विद्यासागर कोण होते?
ईश्वरचंद्र विद्यासागर यांचा जन्म पश्चिम बंगालमधील मेदिनीपूरमध्ये एका ब्राह्मण कुटुंबात झाला. पुढे जाऊन ते एक महान समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ आणि स्वातंत्र्यसैनिक म्हणून नावारुपाला आले.
 
त्यांनी स्त्री शिक्षणाला चालना दिली आणि विधवा विवाहाच्या विरोधात आवाज उठवला. इंग्रजी आणि संस्कृत भाषेच्या समन्वयामुळेच भारतीय आणि पाश्चिमात्य परंपरांचं ज्ञान मिळू शकतं असं त्यांचं मत होतं.
 
गावात प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर ते आपल्या वडिलांबरोबर कोलकात्याला गेले. त्यांची आकलनक्षमता उत्तम होती. हुशार असल्यामुळे त्यांना अनेक शिष्यवृत्त्या मिळाल्या. म्हणून त्यांना विद्यासागर ही पदवी मिळाली.
 
1839 मध्ये त्यांनी कायद्याचा अभ्यास केला. 1841 मध्ये वयाच्या 21व्या वर्षाी ते फोर्ट विलियम कॉलेजमध्ये संस्कृत विभाग प्रमुख म्हणून रुजू झाले.
 
1849 मध्ये साहित्याचे प्राध्यापक म्हणून पुन्हा त्यांचा संस्कृतशी संबंध आला. आपल्या समाज सुधारणेच्या अभियानाअंतर्गत ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी स्थानिक भाषा आणि मुलींच्या शिक्षणासाठी शाळांची एक साखळी उघडली आणि कोलकात्यात मेट्रोपॉलिटन कॉलेजची स्थापना केली.
 
संस्कृत कॉलेजचे मुख्याध्यापक झाल्यावर त्यांनी सर्व जातीधर्माच्या विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयाचे दरवाजे उघडले. त्या काळात ही एक मोठी गोष्ट होती.
 
त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे विधवा पुर्नविवाहाचा कायदा 1856 मध्ये संमत झाला. प्रत्यक्ष कृतीवर त्यांचा विश्वास होता. म्हणूनच त्यांनी आपल्या मुलाचा विवाह एका विधवेशी लावून दिला होता. त्यांनी बहुपत्नीत्व आणि बालविवाहाच्या विरोधात आवाज उठवला होता.
 
1891 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. मात्र आता त्यांच्या पुतळ्यावरून वाद केला झाला आहे.
 
राजकीय विश्लेषक गोपेश्वर मंडल म्हणतात, "ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्याबाबत लोक भावनिक आहेत. म्हणूनच त्यांच्या पुतळ्याच्या प्रकरणाला राजकीय वळण देण्याचा प्रयत्न केला आहे."

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती