विधानसभा निवडणूक: शिवसेना उमेदवार प्रदीप शर्मा यांना नालासोपाऱ्यातलं आव्हान किती सोपं किती कठीण?

शुक्रवार, 18 ऑक्टोबर 2019 (14:45 IST)
"आठ महिन्यांनी पोलीस सेवेतून निवृत्त होणारच होतो. त्यामुळं स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि लोकांची सेवा करण्यासाठी राजकारणात आलोय," असं म्हणत प्रदीप शर्मा यांनी पोलीस सेवेतून स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि शर्मांनी मनगटावर 'शिवबंधन' बांधलं.
 
पालघर जिल्ह्यातल्या नालासोपारा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार म्हणून प्रदीप शर्मा विधानसभेच्या रिंगणात आहेत.
 
एनकाउंटर स्पेशालिस्ट म्हटलेलं मला आवडत नाही, असं प्रदीप शर्मा कायम सांगत असले, तरी त्याच विशेषणानं ते सर्वपरिचित झाले. प्रदीप शर्मा यांच्या कामाची आणि त्यानिमित्तानं आलेल्या चढ-उताराची पोलीस विभागासह सर्वत्रच आजही चर्चा होत असते.
 
आता राजकीय पदार्पण करत प्रदीप शर्मांनी सार्वजनिक जीवनात सक्रिय होण्याचा निर्णय घेतलाय.
प्रदीप शर्मा यांचा आजवरचा प्रवास आणि ते लढत असलेल्या नालासोपारा मतदारसंघातील त्यांना असलेलं आव्हान बीबीसी मराठीनं जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय.
 
'लहानपणापासूनच पोलीस सेवेचं आकर्षण'
शर्मा कुटुंबीय मूळचे उत्तर प्रदेशातील आग्र्याचे. मात्र, प्रदीप शर्माचे वडील महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यात स्थलांतरित झाले. तिथेच ते स्थायिकही झाले. ते पेशानं शिक्षक होते.
 
प्रदीप शर्मा यांचा जन्म जरी उत्तर प्रदेशातील असला, तरी ते लहानपणापासूनच महाराष्ट्रात राहिले आहेत. लहानपणीच वडिलांसोबत ते धुळ्यात राहिले आणि प्राथमिक शिक्षणापासून ते एमएस्सीपर्यंत ते धुळ्यातच वाढले. शिक्षण घेतल्यानंतर एमपीएससी करून ते पोलीस सेवेत दाखल झाले.
 
पोलीस सेवेच्या आकर्षणाबद्दल सांगताना ते म्हणतात, "धुळ्यात असताना आमच्या शेजारी पगार नावाचे इन्स्पेक्टर राहायचे. लहान असताना त्यांना पाहायचो. ते यूनिफॉर्मवर बाईकवर जात असत. पोलीस सेवेच्या आकर्षणासाठी ते एक कारणीभूत ठरलं म्हणता येईल."
 
पोलीस सेवेत नसतो, तर लष्करी सेवेत गेलो असतो. काही नातेवाईक लष्करी सेवेत आहेत, असंही प्रदीप शर्मा सांगतात.
 
'1983 ची ग्रेट फायटर्सची बॅच'
 
महाराष्ट्रातली 1983 ची पोलिसांची बॅच सर्वांत प्रसिद्ध ठरली. या बॅचमध्ये प्रफुल्ल भोसले, विजय साळसकर, रविंद्र आंग्रे, अस्लम मोमीन असे 'एनकाउंटर स्पेशालिस्ट' म्हणून सर्वत्र परिचित असलेले पोलीस अधिकारी होते. याच बॅचमध्येच प्रदीप शर्मा हे सुद्धा आहेत.
नाशिक पोलीस ट्रेनिंग स्कूलमध्ये प्रशिक्षण घेतल्यानंतर ही बॅच 1984 साली पोलीस सेवेत कार्यरत झाली. प्रदीप शर्मा यांची पहिली नियुक्ती मुंबईतल्या माहिम पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षकपदावर झाली. त्यानंतर ते स्पेशल ब्रांचमध्ये गेले. नंतर मुंबई उपनगरातील पोलीस ठाण्यांचे प्रमुख, क्राईम इंटेलिजियन्समध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशा विविध पदांवर त्यांनी काम केले.
 
1983 ची बॅच ही महाराष्ट्र पोलीसमधील 'किलर बॅच' म्हणून ओळखली जात असे, असं वरिष्ठ पत्रकार हुसैन झैदी हिंदुस्तान टाईम्समधील त्यांच्या एका लेखात म्हटलंय.
 
'1983 च्या बॅचच्या पोलीस अधिकाऱ्यांनी दाऊद इब्राहिम, छोटा राजन, अरूण गवळी आणि अमर नाईक यांच्यासारख्या अंडरवर्ल्डमधील गुंडांशी दोन हात केलेत,' असं झैदी सांगतात.
 
निवृत्त पोलीस महासंचालक अरविंद इनामदार यांनी बीबीसी मराठीशी बोलताना प्रदीप शर्मा आणि 1983 च्या बॅचबद्दल गौरवोद्गार काढले.
 
अरविंद इनामदार म्हणाले, "1990 च्या दशकात मुंबईतील गँगवॉर खूप वाढलं होतं. त्यावेळी खास पथकं तयार केली. दाऊद इब्राहिमवर पहिल्यांदा रेड टाकून, तीन-साडेतीन कोटींचं सोनं जप्त केलं. नंतर अरूण गवळी, छोटा शकीलला अटक केली. त्यावेळी हे सर्व अधिकारी उत्तम काम करत होते."
 
"हे सर्व ग्रेट फायटर्स होते. त्यांना प्रशिक्षणच तसं दिलं होतं. दंगल, स्फोट, दहशतवादी हल्ला इत्यादी वेळी काय करावं, याचं नीट प्रशिक्षण दिलं होतं, तयारी करून घेतली होती." असंही इनामदार सांगतात.
 
'विजय साळकरांशी खबऱ्यांवरून वाद?'
 
26/11 च्या मुंबई हल्ल्यात शहीद झालेल्या विजय साळसकरांशी प्रदीप शर्मा यांचा वाद होता, अशी बरीच चर्चा माध्यमांमधून झाली.
 
काही दिवसांपूर्वी प्रदीप शर्मा यांनी टीव्ही 9 मराठी या वृत्तवाहिनीशी बोलताना याबाबत आपली बाजू मांडली होती.
 
शर्मा म्हणतात, "शहीद विजय साळसकर हे माझे जिवलग मित्र होते. 1983 मध्ये पोलीस प्रशिक्षणासाठी आम्ही एकाच स्कॉडला होतो. प्रशिक्षणात आडनावाच्या पहिल्या अक्षरापासून स्कॉड तयार केले जातात. त्यांचं साळसकर आणि माझं शर्मा आडनाव, त्यामुळं आम्ही एकाच स्कॉडला होतो. वर्षभर आम्ही एकत्र राहिलो. मुंबईत आल्यानंतरही बरीच वर्षे एकत्र होत. क्राईम ब्रांचलाही आम्ही एकत्र काम केलंय. काही मोठमोठे ऑपरेशनही आम्ही एकत्र केलेत."
 
"विजय साळसकरांसोबत केलेली कामं आजही आठवतात. सगळ्यांत जास्त इन्फर्मेशन नेटवर्क असणारा अधिकारी म्हणून आजही विजय साळसकरांना मी मानतो. माझ्यापेक्षा शंभर पटीनं जास्त नेटवर्क त्यांचं होतं," असं शर्मा सांगतात.
 
"साळसकर आणि माझ्यात जमत नाही, हे माध्यमांनी जे पसरवलं होतं, तसं खरंतर काहीच नव्हतं. आमची भांडणं फक्त खबऱ्यांवरून व्हायची. त्याचा खबरी असेल, तर मी त्याला ट्रॅप करायचो, माझ्या बाजूला वळवायचा प्रयत्न करायचो. माझे खबरी तो वळवायचा. अबोला असं काही नव्हतं," असंही प्रदीप शर्मा म्हणाले.
 
2009 साली रामनारायण गुप्ता उर्फ लखन भैय्या यांच्या हत्येप्रकरणी प्रदीप शर्मा यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्यासह एकूण 13 पोलीस अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली होती. मात्र, चार वर्षे ठाणे मध्यवर्ती कारागृहात काढल्यानंतर 2013 साली प्रदीप शर्मांची सुटका झाली.
 
प्रदीप शर्मा नालासोपऱ्यातून शिवसेनेकडून रिंगणात
आधी ठाणे आता पालघर जिल्ह्यात येणाऱ्या नालासोपारा विधानसभा मतदारसंघात गेल्या दोनवेळा बहुजन विकास आघाडीचाच उमेदवार विजयी होत आला आहे. बविआचे प्रमुख हितेंद्र ठाकूर यांचे पुत्र क्षितिज ठाकूर हे 2009 आणि 2014 अशा दोन्ही वेळा नालासोपाऱ्यातून आमदार म्हणून निवडून आले.
 
2009 साली क्षितिज ठाकूर हे 40,782 मतांनी, तर 2014 साली 54,499 मतांनी विजयी झाले. यंदाही क्षितिज ठाकूर विरूद्ध प्रदीप शर्मा अशीच मुख्य लढत नालासोपाऱ्यात पाहायला मिळेल.
 
प्रदीप शर्मा हे मुंबईतील अंधेरी भागात राहतात. मात्र, त्यांच्या मित्रमंडळींनं सुरू केलेल्या 'प्रदीप शर्मा फाऊंडेशन'च्या माध्यमातून नालासोपरा भागात छोटे-मोठे उपक्रम आधीपासूनच केले जात होते. त्यामुळं एका अर्थानं प्रदीप शर्मा यांनी नालासोपाऱ्यातून रिंगणात उतरण्याची तयारी केली होती.
 
शिवसेनेच्या माध्यमातून ते आता बहुजन विकास आघाडीच्या क्षितिज ठाकूर यांना टक्कर देतील.
 
प्रदीप शर्मा विरूद्ध क्षितिज ठाकूर : कुणाचं पारडं जड?
 
"प्रदीप शर्मा आता नालासोपाऱ्यातूनच का, असा प्रश्न सहाजिक आहे. मात्र, त्याचं कारण सरळ आहे की, नालासोपाऱ्यातील आमदार क्षितिज ठाकूर यांचे वडील हितेंद्र ठाकूर यांची लोकांमध्ये असलेली प्रतिमा पाहून प्रदीप शर्मांना शिवसेनेनं उतरवल्याचं दिसून येतं." असं वरिष्ठ पत्रकार जितेंद्र दिक्षित सांगतात.
 
किंबहुना, स्वत: प्रदीप शर्मांनीही माध्यमांशी बोलताना आपण इथली गुन्हेगारी संपवण्यासाठी आल्याचं सांगितलं आहे.
मात्र, वरिष्ठ पत्रकार सुहास बिऱ्हाडे म्हणतात, "हितेंद्र ठाकूर यांना आव्हान द्यायचं असतं, तर ते वसईतून उभे राहणं अपेक्षित होतं. कारण हितेंद्र ठाकूर वसईतून उभे आहेत. नालासोपाऱ्यात त्यांचे पुत्र क्षितिज ठाकूर हे उभे आहेत. क्षितिज ठाकूर हे परदेशात शिकलेले असून, त्यांच्यावर एकही गुन्हा दाखल नाहीये. ही त्यांची जमेची बाजू आहे."
 
प्रदीप शर्मा यांनी नालासोपारा मतदारसंघ निवडण्यामागचा अंदाज सांगताना बिऱ्हाडे म्हणतात, "लोकसभा निवडणुकीत नालासोपारा हा भाजपचा बालेकिल्ला म्हणून समोर आला. कारण इथं भाजपला 25 हजार मतांची आघाडी मिळाली."
 
तसेच, "नालासोपऱ्यात परप्रांतीय मतं प्रभावी आहेत. त्यामुळं त्यांची भिस्त त्यांच्यावरच दिसून येते. प्रदीप शर्मांच्या प्रचारासाठी भोजपुरी गायक, अभिनेते यांना आणत आहेत. शिवाय, प्रदीप शर्मांची पोलीस म्हणून एक प्रतिमा आहे. लोकांना ग्लॅमरचं आकर्षण असतं. त्याचा फायदा प्रदीप शर्मांना फायदा होऊ शकतो," असं सुहास बिऱ्हाडे सांगतात.
 
'शर्मांच्या आधीही अनेक पोलीस अधिकारी राजकारणात'
गेल्या काही वर्षांमध्ये पोलीस सेवेतून निवृत्त झाल्यानंतर किंवा स्वेच्छानिवृत्ती स्वीकारून राजकारणात येणाऱ्या अधिकाऱ्यांची संख्या लक्षणीयरीत्या वाढलीय. त्यामुळं आता हा पायंडाच पडत चाललाय का, अशीही चर्चा सुरू झालीय.
 
यावर बोलताना वरिष्ठ पत्रकार जितेंद्र दीक्षित म्हणतात, "पोलीस असताना एक प्रकारची सत्ता तुमच्यासोबत असते. त्या सत्तेतून लोकांवर प्रभाव टाकता येतो. निवृत्तीनंतर ती सत्ता हातून निघून जाते. अशावेळी निवडणूक लढून जिंकल्यास, राजकारण हे तीच सत्ता हातात ठेवण्याचं माध्यम बनतं."
 
कुणीही पोलीस अधिकारी निवृत्तीनंतरही राजकारणात येत असेल, तर सत्ता कायम ठेवण्याचा प्रयत्न करत असतात आणि हा मानवी स्वभाव आहे, असं जितेंद्र दीक्षित सांगतात.
 
याआधीही पोलीस अधिकारी राजकारणात आल्याचं सांगताना जितेंद्र दीक्षित म्हणतात, "आर. डी. त्यागी मुंबईचे पोलीस आयुक्त असताना महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युतीचं सरकार होतं. निवृत्त झाल्यानंतर त्यागी बाळासाहेब ठाकरेंच्या पाया पडले होते. त्यानंतर शिवसेनेतही त्यांनी प्रवेश केला होता. शिवाय, आयपीएस अधिकारी पी. के. जैन, सुरेश खोपडे असे अनेक पोलीस अधिकारी राजकारणात गेल्याचे आधीही उदाहरणं आहेत."
 
याबाबत निवृत्त पोलीस महासंचालक अरविंद इनामदार म्हणतात, "पोलिसांनी का राजकारणात जाऊ नये? वरिष्ठ आयएएस अधिकारी, लष्करी अधिकारी, गृहसचिव असे अनेकजण निवडणुकीत उभे राहतात. एकदा तुम्ही सेवेतून बाहेर पडलात की, तुम्ही मोकळे असता."
 
आता पोलीस सेवेतून स्वेच्छानिवृत्ती घेऊन राजकीय आखाड्यात उतरलेले प्रदीप शर्मा नालासोपाऱ्याचा गड सर करतायत की उच्चशिक्षित असलेले विद्यमान आमदार क्षितिज ठाकूर आपला गड राखतायत, हे 24 ऑक्टोबरला स्पष्ट होईल.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती