विधानसभा 2019 : 'गोपीनाथ मुंडे आज असते तर आमच्यावर ही वेळ आली नसती...'

मंगळवार, 3 सप्टेंबर 2019 (17:11 IST)
विनायक गायकवाड
महाराष्ट्रातील बिग फाईट पैकी एक म्हणजे परळी विधानसभा. एकेकाळी गोपीनाथ मुंडेंचा गड असलेली परळी आज गाजतेय ती भावा-बहिणीच्या वादानं.
 
पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे हा संघर्ष परळीसाठी काही नवीन नाही. पण मुंडे विरुद्ध मुंडे या वादात परळीच्या पदरात काय पडलं हे जाणून घेण्यासाठी आम्ही नांदेडहून थेट गाठली परळी.
 
परळीची सकाळ तशी शांत. सकाळ सकाळ बाहेर पडलो तेव्हा नाक्या नाक्यावर मुलांची गर्दी होती. वाटलं गणपतीच्या तयारीत मुलं बाहेर पडलीयेत पण परळीत थोडा वेळ घालवलात तर तुमच्या लक्षात येतं की हे चित्र तसं रोजचंच. परळीच्या मध्यभागी असलेला राणी लक्ष्मीबाई टॉवर हा परळीच्या तरुणाईचा अड्डा. तिथेच नाक्यावर असलेल्या प्रवीणनं या परिस्थितीचं वास्तव सांगितलं.
 
Skip Facebook post by BBC News Marathi End of Facebook post by BBC News Marathi
तो म्हणतो, "भाऊ हे तर रोजचंच. इथे नोकऱ्या नाहीत. धंदे नाहीत. मग करणार काय? मग हे असं नाक्या नाक्यावर जमायचं. आमच्या परळीला खड्ड्यात घातलंय ते राजकीय कार्यकर्तागिरीनं. काही नाही, बाईक काढायची आणि नुसतं नेत्यांमागे फिरायचं. बस! हे इतकच उरलंय. पण याच नेत्यांना, आमच्या आमदारांना नोकऱ्या धंद्याविषयी यातलं एकही जण विचारणार नाही. बेरोजगारीनं परळीला आणि आमच्या तरुणाईला अक्षरश: पोखरलंय. कदाचित आज जर गोपीनाथ मुंडे असते तर आमच्यावर ही वेळ आली नसती."
 
मुंडे विरुद्ध मुंडे संघर्ष आणि विकास
राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडेंचा हा मतदारसंघ. राज्याच्या विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेही परळीचेच. पण इतके हेवीवेट नेते मिळूनही परळीची परिस्थिती काही बदलली नाहीये. नांदेडहून परळीला येताना गंगाखेडच्यापुढे रस्त्यात खड्डे नाही तर खड्ड्यात रस्ते गेल्याचं चित्र दिसतं. रस्त्यांची दुर्दशा हा परळीचा आणखी एक प्रश्न.
 
"बाईक चालवायलाही भीती वाटते. गेल्या महिन्यात मी स्वत: तीनदा पडले" परळीच्या वैद्यनाथ कॉलेजमध्ये शिकणारी शरयू सांगत होती. परळीला जोडणारे आणि तालुक्यातल्या बहुतांश रस्त्यांची हीच अवस्था.
 
परळी-अंबाजोगाई रस्त्यातं काम दोन वर्षं रखडलंय. परळी बस स्थानकाच्या रस्त्याचं साधं डांबरीकरणही तसंच राहिलंय. बाजारात गेलं तर भाजी विक्रेत्यांच्या ठेल्यांच्या बाजूला गटार भरभरून वाहतंय हे परळीचं चित्र.
 
शरयू सांगते, "परळीकरांसाठी हे जरी नॉर्मल असलं तरी आम्हाला हे नको हे बोलून दाखवण्याचं धाडस मात्र कोणातही नाही. कारण एकच, मुंडेंचं परळीवर असणारं वर्चस्व."
 
पण राज्याच्या राजकारणात महत्त्वाचा असणाऱ्या या मतदारसंघाची ही परिस्थिती झाली कशी हाही एक संशोधनाचा विषय आहे. परळी नगरपालिका ही धनंजय मुंडेंच्या म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या हातात आहे तर राज्यात सरकार पंकजा मुंडेंच्या भाजपचं आहे.
 
दैनिक सकाळचे प्रतिननिधी लक्ष्मण वाकडे यांच्यानुसार भावा-बहिणीच्या वादात परळी खड्ड्यात गेलीये. परळीसाठी ना एका नेत्याकडे दूरदृष्टी आहे ना काही बदल घडवण्याची इच्छाशक्ती.
 
ते सांगतात, "परळीचा वेळ विकासकामांपेक्षा राजकारणातच जास्त जातो. आज फक्त आरोप प्रत्यारोपांचं राजकारण रंगलंय. विकास हा फक्त नावापुरता आणि घोषणांपुरता उरलाय."
 
दैनिक मराठवाड्याचे कार्यकारी संपादक प्रशांत जोशींच्यामते गोपीनाथ मुंडेंकडे परळीसाठी, बीडसाठी आणि एकूणच राज्यासाठी एक व्हिजन होती. पण आज पंकजा आणि धनंजय या दोन्ही मुंडेंकडे असं कुठल्याच प्रकारचं व्हिजन दिसत नाही. या दूरदृष्टीच्या अभावामुळेच आज ते ना परळीचा विकास करू शकले ना बीडचा आणि ना जिल्ह्यातल्या राजकारणाचा.
 
'दोन्ही मुंडेंचं राजकारण तर फक्त भावनिक'
पीसीएन न्यूजच्या वैशाली रूईकरांच्यामते पंकजा असतील किंवा धनंजय या दोघांचंही राजकारण विकासाचं नाही तर भावनिक आहे. "गेल्या पाच वर्षांत आपण काय केलं हे कोणीही बोलत नाही फक्त भावनिक मुद्द्यांना हात घालून लोकांची दिशाभूल करण्याचं काम या दोघांनीही केलंय. खरं तर परळीला कॅबिनेट दर्जाचे दोन दोन नेते मिळाले पण परळी मात्र खड्ड्यातच राहिलीये.
 
गेली विधानसभा असो किंवा नुकतीच पार पडलेली लोकसभा निवडणूक असो पंकजा मुंडेचं राजकारण हे गोपीनाथ मुंडेंच्या नावानं मतं मागण्याचं भावनिक राजकारण आहे. तर पंकजा मुंडेंवर आरोपाच्या फैरी झाडत धनंजय मुंडेंनी आपलं राजकारण केलंय."
 
दिव्य मराठीचे प्रतिनिधी धनंजय आढाव यांच्यामते येती निवडणूक दोन्ही भावा बहिणींसाठी अस्तित्वाचा प्रश्न असेल.
 
त्यांच्यानुसार, "गेल्या तीन निवडणुकांमध्ये पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडेंचं मताधिक्य हे कमीच होतंय. गोपीनाथ मुंडेंच्या निधनानंतर २०१४ च्या निवडणुकीत एक भावनेची लाट होती आणि पंकजा मुंडेंचं राजकीय वजनही वाढलं होतं. पण तरीही या निवडणुकीत त्यांचं मताधिक्य कमी झालं होतं. त्यामुळे या निवडणुकीतही पंकजा मुंडेंसाठी धोक्याची घंटा आहे. तर नगरपरिषदेत जरी राष्ट्रवादीची सत्ता असली तरी ती टिकवण्याचं अवघड आव्हान धनंजय मुंडेंसमोर असेल. विधानसभा निवडणुकीनंतर काही महिन्यातच परळी नगरपरिषदेच्या निवडणुका होतायत त्यामुळे विधानसभा निकालांचे यावर पडसाद उमटतील ही शक्यता नाकारून चालणार नाही."
 
'आम्हाला गृहीत धरू नका'
प्रत्येक बॅट्समन हा आपल्या होम ग्राऊंडवर एकदम रिलॅक्स होऊन खेळत असतो कारण तिथल्या सगळ्या परिस्थितीशी तो जाणून असतो. तसंच काहीसं सध्या परळीचं झालंय. तरुणाईच्या अपेक्षा आहेत. आशा आणि स्वप्न आहेत पण त्यांच्या या स्वप्नांना कोणी वाली नाही हीच परिस्थिती आहे.
 
वैद्यनाथ कॉलेजमध्ये शिकणाऱ्या शरयूच्यामते, "जसं घरचे आपल्याला गृहीत धरतात आणि म्हणतात ना की जरा अॅडजस्ट करा, पहिलं पाहुण्यांचं उरकू दे, तसंच काहीसं परळीचं आहे. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या दोघांच्या जबाबदाऱ्या मोठ्या आणि म्हणून त्यांचं लक्षही जास्त बाहेरच. आपल्या स्वत:च्या मतदारसंघात लक्ष घालण्यासाठी साधा त्यांच्याकडे वेळही नाही. परळीत येऊन आपल्या कार्यकर्त्यांच्या आणि समर्थकांचा विश्वात न राहता त्यांनी जरा रस्त्यावर सर्वसामान्यांमध्येही यावं. मग त्यांना कळेल की आम्ही कोणत्या परिस्थितीत जगतोय."
 
पण २०१९ ची ही निवडणूक ओपन निवडणूक आहे. दैनिक मराठवाड्याचे कार्यकारी संपादक प्रशांत जोशींच्यामते राज्यात कोणाची सत्ता येईल हे सांगणं सोपं आहे पण परळीच्या निकालाचे अंदाज बांधणं अवघड आहे.
 
गेल्या पाच वर्षांत अनेक गोष्टी घडल्यात आणि या सगळ्यांचा परिणाम येत्या निवडणुकीत बघायला मिळेल. पण भावा बहिणीच्या आरोपप्रत्यारोपाच्या राजकारणाला जरी परळीची जनता कंटाळली असली तरी त्यांच्यासमोर कोणताही पर्याय उपलब्ध नाहीये, हेच परळीचं वास्तव आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती