वनिता खरात न्यूड फोटोशूट : जाड आहोत हे स्वीकारणं एवढं का अवघड वाटतं?

मंगळवार, 19 जानेवारी 2021 (18:08 IST)
अमृता कदम
बीबीसी मराठी
"तुम्ही स्वतःला आरशात पाहा आणि मी जगातील सर्वांत सुंदर मुलगी आहे, असं सांगा. हे जेव्हा स्वतःला सांगाल, तेव्हा लोकही तुम्हाला स्वीकारतील. मुळात लोकांनी स्वीकारण्याचीही गरज नाही. तुम्ही स्वतःला स्वीकारलं तरी खूप आहे. जगणं सोपं होऊन जातं. इतरां सारखं बनण्याची काय गरज आहे? मी जशी आहे, तशी आहे."
 
अभिनेत्री वनिता खरात बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीत सांगत होत्या.
 
काही जणींमध्ये खरंच खूप कलागुण असतात, पण तरीही एक न्यूनगंड असतो. कारण त्या इतरां सारख्या दिसत नाहीत. वनिता यांच्याशी बोलताना जेव्हा हा मुद्दा मांडला तेव्हा त्यांनी स्वतःला स्वीकारणं महत्त्वाचं आहे, हे सांगितलं.
 
अभिनेत्री वनिता खरात या त्यांनी केलेल्या न्यूड फोटोशूटमुळे गेल्याकाही दिवसांपासून चर्चेत आहेत.
 
नवीन वर्षाच्या सुरूवातीलाच वनिता यांनी आपल्या सोशल मीडियावर हा फोटो शेअर केला आणि त्यावर उलटसुलट प्रतिक्रिया उमटू लागल्या.
 
काही जणांनी वनितांच्या या धाडसाचं कौतुक केलं, तर काही जणांकडून नकारात्मक प्रतिक्रियाही आल्या. वनितांच्या या फोटोशूटमागे एक विचार होता... कोणताही न्यूनगंड न बाळगता स्वतःला स्वीकारण्याचा. म्हणूनच त्यांनी या फोटोसोबत कॅप्शन लिहिलं होतं की, मला माझ्या प्रतिभेचा, माझ्या आवडीचा, आत्मविश्वासाचा अभिमान आहे. मला माझ्या शरीराचा अभिमान आहे...कारण मी 'मी' आहे.
 
पण स्वतःला इतक्या सहजतेनं स्वीकारणं सगळ्यांना शक्य असतं का? स्वतःला स्वीकारत, शरीराच्या पलिकडे जात पाहण्याचा वनिता खरात यांनी केलेला प्रयोग निश्चितच स्तुत्य आहे. पण ज्या समाजात सौंदर्याचे काटेकोर निकष असतात, तिथे स्वतःच्या शरीराकडे इतकं सकारात्मकतेनं पाहणं शक्य आहे का? त्यातही जर तुम्ही मनोरंजन क्षेत्रात असाल तर???
 
अभिनेत्री...सॉरी, हिरोईन...कशी असायला हवी? तर नाजूक, उंच-सडपातळ बांध्याची. फिगरची जी काही परिमाणं आहेत, त्यात अगदी अचूक बसणारी. ती तशी नसेल, तर मग ती हिरोईन नसते... चित्रपटाची किंवा मालिकेची नायिका नसते. वजनामापात न बसणारी मुलगी मग नायिकेची मैत्रीण असेल, महागड्या घरातली मोलकरीण असेल किंवा मग स्वतःच्याच वजनावर विनोद करणारी व्यक्तिरेखा (जुन्या जमान्यातल्या काही विनोदी अभिनेत्री आठवून पाहा)... पण ती नायिका नक्कीच नसेल...
 
नायिकेची प्रतिमा ही डोक्यात इतकी घट्ट बसलेली असते की, कोणत्याही कारणानं त्यांची बिघडलेली 'फिगर' पचनीच पडत नाही. बाळंतपणानंतर बाईचं वजन वाढणं स्वाभाविक असतं, पण मिस वर्ल्ड ऐश्वर्या राय जाड कशी होऊ शकते? तिला तिच्या वजनावरून ट्रोल केलं जातं.
 
वयाच्या काही टप्प्यावर स्त्रीच्या शरीरात बदल होतात. पण मॉडेल, अभिनेत्री असणाऱ्या स्त्रियांच्या आयुष्यातही असे टप्पे येतात, हे गृहीतच धरलं जात नाही.
 
अभिनेत्री विद्या बालन यांनी एका मुलाखतीत वजनावरून सतत मारल्या जाणाऱ्या टोमण्यांबद्दल, बॉडी शेमिंग बद्दल मोकळेपणानं आपली मतं व्यक्त केली होती. स्वतःला या सगळ्याचा त्रास कसा झाला होता, हे पण त्यांनी सांगितलं होतं.
 
दिसण्याचं हे सामाजिक प्रेशर सेलिब्रिटींना इतकं सतावत असेल, तर इतर मुलींबद्दल काय बोलायचं? 'बॉडी पॉझिटिव्हिटी'चा मेसेज देण्यासाठी केलेलं न्यूड फोटोशूट निश्चितच सकारात्मक पाऊल आहे.
 
पण त्यामुळे बॉडी शेमिंगचं वास्तव बदलेल का? समाजाची आणि बऱ्याचदा सौंदर्य हाच कलागुण मानणाऱ्या एन्टरटेन्मेंट इंडस्ट्रीतली शारीरिक निकषांवरून 'टाइपकास्ट' करण्याची मानसिकता बदलेल का? हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला.
 
"आपण एकमेकांना भेटलो की, कसे आहात असं विचारण्याऐवजी अनेकदा किती बारीक झालीयेस किंवा किती जाड झालीयेस असं निरीक्षण नोंदवतो. दिसण्याबद्दलचा विचार आपल्या मनात किती खोलवर रुतलेला असतो, हे आपल्या या 'सोशल एटिकेट्स'मधूनही जाणवतं," अभिनेत्री सखी गोखले सांगत होती.
 
बायकांच्या बाबतीत तर वजनाबद्दल लगेचच कमेंट्स केल्या जातात, हे सांगताना सखीनं तिचा वैयक्तिक अनुभवही सांगितला.
 
"मध्यंतरी मी सोशल मीडिया अकाउंटवर एक फोटो टाकला होता. मी आधी बारीक होते. या फोटोत माझं वजन वाढलेलं दिसत होतं. त्यावरून प्रतिक्रिया येऊ लागल्या. मी प्रेग्नंट आहे असं समजून अनेकांनी कमेंट्स करायला, माझं अभिनंदन करायला सुरूवात केली.
 
यातल्या दोन-तीन गोष्टी मला फार धोकादायक वाटल्या. एक म्हणजे मी दोन वर्षांपूर्वी जशी दिसत होते तसंच दिसायला हवं ही मानसिकता आणि लग्नानंतर माझं वजन वाढलं म्हणजे मी प्रेग्नंटच आहे हे गृहीत धरणं. एखाद्याच्या शारीरिक बदलांबद्दल अशापद्धतीनं व्यक्त होणं हे चुकीचं आहे हे समजून घ्यायला हवं," असं सखीनं म्हटलं.
 
"स्त्रीची विशिष्ट इमेजची कल्पना ही बहुधा गेल्या काही काळातच विकसित होत गेली असावी. पूर्वीच्या नट्या कुठे 'झीरो साइज' होत्या?" असा सखीचा प्रश्न आहे.
 
या विचारांचं प्रतिबिंब इंडस्ट्रीतही दिसतं. त्यामुळे क्षमतेनुसार काम न मिळता दिसण्यावरून काम दिलं जातं. म्हणून मग आपल्याला खऱ्याखुऱ्या लोकांच्या गोष्टीच पाहायला मिळत नाहीत, असंही सखी गोखलेनं म्हटलं.
 
'कॅरेक्टरनुसार भूमिका मिळणं म्हणजे टाइपकास्ट नाही'
तुम्ही कसे दिसता यावरून तुम्हाला टाइपकास्ट केलं जातं, या मुद्द्यावर बोलताना अभिनेत्री विशाखा सुभेदार यांनी म्हटलं, की तुम्ही जसे दिसता, तसे रोल दिले जातात. यात टाइपकास्ट होण्याचा संबंध नाही येत.
 
याबद्दल अधिक विस्तारानं बोलताना विशाखा यांनी म्हटलं की, एखादी व्यक्तिरेखा कशी दिसते हे दिग्दर्शकाच्या डोक्यात असतं. मी तशी दिसते म्हणून मला तो रोल दिला जातो. अॅड मेकर्सही त्या-त्या कॅरेक्टरसाठी एखाद्या इमेजचा विचार करतात आणि मग त्या अनुषंगाने अभिनेत्याला किंवा अभिनेत्रीला रोल दिला जातो. ही प्रक्रिया उलटी होऊ शकत नाही.
 
"एखाद्या कॅरेक्टरच्या अनुसार बॉडी स्ट्रक्चर असेल तर तसेच रोल मिळतील. पण याचा अर्थ टाइपकास्ट होणं असं नाही. टाइपकास्ट होणं म्हणजे एखादी भूमिका सतत करणं.
 
माझ्याबाबतीत बोलायचं तर मी स्वतः केवळ विनोदी भूमिका केल्या नाहीयेत. का रे दुरावा, आंबटगोड सारख्या भूमिकाही मी केल्या आहेत. त्यामुळे केवळ अभिनयाचा विचार करणं हे मला अधिक महत्त्वाचं वाटतं."
 
अर्थात, काही प्रतिमा आपल्या मनात घट्ट असतात असं मत विशाखा यांनी व्यक्त केलं. त्याबद्दल उदाहरण देताना त्यांनी म्हटलं, "मला वाटतं बहुतेक वेळा आईला 'टाइपकास्ट' केलं जातं. म्हणजे बहुतांश आया या शेलाट्या दाखवल्या जातात आणि जाड स्त्रिया या डोमिनेटिंग, कजाग दाखवल्या जातात. जाडी स्त्री सोशिक, मायाळू असू शकत नाही का?"
 
तुमच्या 'असण्या'पेक्षाही 'दिसण्याला' महत्त्व

अभिनेत्री चिन्मयी सुमीत यांनी याबद्दल बोलताना म्हटलं की, बॉडी शेमिंगचा प्रकार आपल्याकडे आहे. पण तो केवळ मनोरंजन क्षेत्रापुरता मर्यादित नाहीये. आपण बऱ्याचदा म्हणतो की, चित्रपट- मालिकांमधल्या गोष्टींचं अनुकरण केलं जातं. पण मला उलटं वाटतं. समाजात जे आजूबाजूला दिसतं, त्याचं प्रतिबिंब हे चित्रपटांमध्ये, मालिकांमध्ये पडतं.
 
"आजही तुम्ही मॅट्रिमोनिअल साइटवरच्या जाहिराती पाहा- मुलगी गोरी आणि सडपातळ हवी अशीच बहुतांश जणांची अपेक्षा असते. पण मुलांबद्दल असं काही लिहिलेलं नसतं. बायकांचं असणं हे जास्त ऑब्जेक्टिफाय केलं जातं. त्यामुळे 'बॉडी शेमिंग' ला बायकांनाच अधिक सामोरं जावं लागतं."
 
"मध्यंतरी अभिनेत्री भूमी पेडणेकरची प्रमुख भूमिका असलेला एक चित्रपट आला होता, ज्यात नायिका जाड असते. त्यानंतर हाही एक हातखंडा प्रयोग झाला. जाड मुलींची मध्यवर्ती भूमिका असलेल्या काही मालिका सुरू झाल्या. पण त्यातही वजन हीच या मुलींची मुख्य समस्या असते," असं चिन्मयी सुमीत यांनी म्हटलं.
 
अनेकदा तुमच्या अचिव्हमेंट किंवा कामापेक्षा, तुमच्या 'असण्या'पेक्षाही 'दिसण्याला' महत्त्व दिलं जातं, असं मत चिन्मयी सुमीत यांनी व्यक्त केलं. ही मानसिकता मनोरंजन क्षेत्रापुरतीच मर्यादित नसून ती सगळीकडेच दिसत असल्याचंही त्यांनी म्हटलं.
 
चिन्मयी यांनी त्यांचे पती आणि अभिनेते सुमीत राघवन यांचं उदाहरण दिलं. त्यांचा अभिनय, चित्रपट-रंगभूमीवरील भूमिका करताना त्यांनी घेतलेली मेहनत याबद्दल फारसं न बोलता अनेकदा केवळ सुमीत किती देखणा आहे किंवा 'या' वयातही तो किती फिट आहे, हेच सारखं सारखं बोललं जातं.
 
त्यामुळे एकूणच दिसण्यापलिकडे जात एखाद्याकडे व्यक्ती म्हणून पाहणं, त्याचे विचार, भावना जाणून घेणं हे अधिक महत्त्वाचं आहे, असं चिन्मयी यांनी म्हटलं.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती