'महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर गर्दी करू नये'- उद्धव ठाकरे

मंगळवार, 24 नोव्हेंबर 2020 (16:47 IST)
'कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा महापरिनिर्वाण दिनाला अनुयायांनी अभिवादनासाठी मुंबईतील चैत्यभूमीवर गर्दी करू नये,' असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. यासंदर्भातील आढावा बैठक नुकतीच पार पडली. लोकमतने हे वृत्त दिले आहे.
 
6 डिसेंबरला भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा 64 वा महापरिनिर्वाण दिन आहे. यानिमित्त दादर येथील चैत्यभूमीवर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने अनुयायी एकत्र येतात.
 
'महापरिनिर्वाण दिनाच्या अनुषंगाने दरवर्षीप्रमाणे यंदाही सर्व तयारी केली जाईल. पण परिस्थितीचे गांभीर्य ओळखून अनुयायांनी आपल्या कृतीतून विचारांची प्रगल्भता दाखवावी,' असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
 
महापरिनिर्वाण समन्वय समितीनेही 6 डिसेंबरला अनुयायांनी अभिवादनासाठी मुंबईत येऊ नये असे आवाहन केले आहे.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती