शेतकरी कर्जमाफीची प्रकरणं 15 दिवसांत निकाली काढा - उद्धव ठाकरे

शेतकऱ्यांना पीकविम्याचे पैसे मिळावेत, यासाठी शिवसेनेने आज मुंबईत पीक विमा कंपन्यांसमोर मोर्चा काढला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वत: रस्त्यावर उतरत या मोर्चात सहभाग नोंदवला. पंतप्रधान पीक विमा योजनेचे पैसे शेतकऱ्यांना त्वरित मिळावे, अशी मागणी त्यांनी यावेळी त्यांनी केली.
 
"सर्व विमा कंपन्यांना इशारा देण्यासाठी 17जुलै रोजी वांद्रे कुर्ला संकुलात शिवसेनेचा इशारा मोर्चा !" असं ट्वीट उद्धव ठाकरे यांनी 11 जुलैला केलं होतं.
 
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
 
1. आम्ही जनतेशी, मातीशी इमान राखणारे आहोत. कंपन्या आणि बँकांनी शेतकऱ्यांना त्रास देऊ नये.
 
2. मुंबईसाठी रक्त सांडणाऱ्या शेतकऱ्यांशी आम्ही बांधील आहोत.
 
3. पुढच्या 15 दिवसांत शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही तर हा शांत मोर्चा आक्रमक रूप धारण करेल.
 
4. 15 दिवसांत कर्जमाफीची प्रकरणं पूर्ण करा.
 
5. बँकांनी शेतकऱ्यांची फसवणूक करू नये. ज्यांचं अन्न खातोय, त्यांच्यासाठी आम्ही डोळे उघडे ठेवून जागे आहोत.
 
दरम्यान, कर्जमाफी योजनेअंतर्गत आतापर्यंत जवळपास 50 लाख खातेदारांना 24 हजार 310 कोटी रुपये सरकारनं मंजूर केले आहेत. त्यापैकी 44 लाख खातेदारांच्या बँक खात्यात 18 हजार 500 कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत, अशी माहिती सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी माध्यमांना दिली आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती