हृदय प्रत्यारोपणासाठी पुण्यात ग्रीन कॉरिडॉर, मुख्यमंत्र्यांचा ताफाही थांबला

मंगळवार, 10 सप्टेंबर 2019 (11:52 IST)
पुण्यात हृदय प्रत्यारोपणासाठी ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आलं. विशेष म्हणजे, हृदय एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यात आपल्या गाड्यांची कुठलीही अडचण होऊ नये म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ताफा विमानतळावरच थांबून राहिला.
   
पुण्यातल्या रूबी हॉल क्लिनिक या हॉस्पिटलमध्ये हृदय प्रत्यारोपण केलं जाणार होतं. यासाठी सोलापुरातील एका हॉस्पिटलमधून धडधडणारं हृदय चार्टर्ड प्लेननं पुणे विमानतळावर आणण्यात आलं. त्यानंतर तिथून हे हृदय रूबी हॉल क्लिनिकला न्यायचं होतं.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा याच दिवशी नियोजित पुणे दौरा होता. मुख्यमंत्री गणपती दर्शनासाठी आले होते. मात्र, हृदय नेण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ग्रीन कॉरिडॉरला कुठलाही त्रास होऊ नये म्हणून काही वेळ विमानतळावर थांबून राहण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला.
 
रूबी हॉल क्लिनिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी बोमी भोटे यांनी मुख्यमंत्री फडणवीस आणि डीसीपी देशमुख यांचे आभार मानले.
 
पुण्यात या वर्षीचं हे 10 वं हृदय प्रत्यारोपण होतं, तर 100 वं ग्रीन कॉरिडॉर होतं.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती