'हम आपके है कौन'ची मोहिनी 25 वर्षानंतरही कायम

मंगळवार, 6 ऑगस्ट 2019 (08:57 IST)
रोहन नामजोशी
हम आपके है कौन? हा चित्रपट म्हणजे भारतीय चित्रपटसृष्टीतला पडलेलं एक गुलाबी स्वप्न आहे. गुलाबी यासाठी की हा चित्रपट प्रेमाने ओतप्रोत भरला आहे. या चित्रपटातल्या पात्राचं प्रत्येकावर निरातिशय प्रेम आहे. ते दाखवण्याची संधी ते सोडत नाही. अशा या प्रेमळ चित्रपटाला  25 वर्ष पूर्ण होत आहे.
 
हा चित्रपट म्हणजे एक स्वप्ननगरी आहे. तिथे कैलाशनाथ (आलोकनाथ) प्रा. चौधरी (अनुपम खेर) सौ. चौधरी (रिमा लागू) ही लोकं, त्यांची मुलं, त्यांचे नातेवाईक ही मुख्य पात्रं आहेत. ही लोकं पोटापाण्यासाठी काय करतात, कधी पैसा कमावतात, वगैरे प्रश्न आपल्याला पडत असतात. पण असे चित्रपट पाहताना हे प्रश्न पडू द्यायचे नसतात.
राजेश (मोहनीश बहल) आणि पूजा (रेणुका शहाणे) यांचं लग्न जमवण्याच्या निमित्ताने ही दोन कुटुंब भेटतात. त्यांचं लग्न ठरतं आणि पुढे एक 'लग्नाची कॅसेट' बघायला मिळते. साखरपुडा ते बाळंतपण असे सगळे कार्यक्रम आपल्याला या चित्रपटात पहायला मिळतात. या लग्नाच्या कॅसेटने त्या काळात तिकीटबारीवर मजबूत पैसा कमावला. 'नदिया के पार' या चित्रपटालाच फोडणी घालून तयार केलेल्या या चित्रपटाने पण पैशाच्या पलीकडे जाऊन या चित्रपटाने भारतीय प्रेक्षकांच्या मनात एक अढळ स्थान मिळवलं आहे.
 
प्रेम आणि निशा
कोणत्याही लग्नात नवरा आणि नवरी हे अत्यंत दुर्लक्षित असतात. त्यांना असं वाटत असतं की हे सगळं आपल्यासाठी होतंय. मात्र प्रत्यक्षात इतर लोक आपला भलताच स्वार्थ साधून घेतात. प्रेम (सलमान खान) आणि निशा (माधुरी दीक्षित) यांना या लग्नाचा सगळ्यात मोठा फायदा होतो. पहिल्या भेटीपासून त्यांचा खट्याळपणा सुरू होतो. निशाला भेटल्यावर प्रेम तिला इम्प्रेस करण्याची एकही संधी तो सोडत नाही. 'चॉकलेट, लाईम ज्यूस, आईसक्रीम टॉफी'च्या जगात वावरणारी निशासुद्धा त्याच्या प्रेमाला वेळोवेळी प्रतिसाद देत असते.
 
'लटका खोकला' ही या प्रेमाची भाषा आहे. (आठवलं नं?) सारखं आपलं येता जाता डोळ्यांनी इशारे करत ही दोघं एकमेकांना काहीतरी सांगत असतात. त्यांच्या प्रेमाचे काही सीन्स फारच जमले आहेत. विशेषत: "चुबता है तो ऐसाही लगता है" वाला सीन तर खासच आहे. चॉकलेट तोंडात धरून सलमानच्या कोटाला ब्रोच लावणारी माधुरी सुंदर दिसली आहे.
तसंच एका प्रसंगात निशाची बहीण पूजाच्या डोहाळेजेवणाचा कार्यक्रम सुरू असतो. घरी सगळे जमले असतात. तेवढ्यात जिन्यावरून गडद निळ्या रंगाच्या वेशात माधुरी येते. त्याचक्षणी सतीश शाह एक अफलातून शेर सादर करतो,
 
"काटे नही कटते है लम्हे इंतजार के, नजरे जमाके बैठे हे रस्ते पे यार के..
 
दिलने कहा है देखे जो जल्वे हुस्न यार के, लाया है कौन इन्हे फलक से उतारके.."
 
तेव्हा जो माधुरी कटाक्ष टाकते त्याने भल्याभल्यांची विकेट गेली नाही तरच नवल. या चित्रपटातील गाण्यांनीही प्रेम आणि निशाची कहाणी अधिकच सुंदर केली आहे.
जुते दो पैसे लो
लग्नात नवरदेवाचे जोडे पळवण्याच्या प्रथेला या चित्रपटाने एक अधिष्ठान प्राप्त करून दिलंय.
 
नवरदेवाचे जोडे पळवणं म्हणजे जणू जीवनमरणाचा प्रश्न आहे अशा थाटात ही प्रथा या चित्रपटात दाखवली आहे. पण त्यानंतर गेल्या 25 वर्षांत ज्यांची लग्न झाली त्यांना या प्रथेबद्दल विचारा. काही उत्साही कार्यकर्त्यांनी तर नवरदेवाच्या पायातून जोडे हिसकावल्याची उदाहरणं अनेकांनी पाहिली असतील.
 
या प्रथेला घरची ज्येष्ठ मंडळी नाकं मुरडतात. त्यात एक प्रकारची मजा असली तरी लग्नाच्या खर्चात या प्रथेचाही विचार करण्यास सुरज बडजात्यांनी भारतीय समाजास भाग पाडलं. हल्लीच्या लग्नात अनेक पद्धती नव्याने सुरू झाल्या तरी जोडे लपवण्याच्या प्रथेला प्रतिष्ठा मिळवून दिली ती हम आपके है कौन नेच.
ढीगभर गाणी
या चित्रपटात प्रत्येक प्रसंगाला साजेसं एक गाणं आहे. अगदी 'वाह वाह रामजी' म्हणत राजेश आणि पूजाच्या लग्नाची सुपारी फोडणाऱ्या गाण्यापासून ते 'लो चली मै' म्हणत आपल्या दिराची वरात काढणारी अनेक गाणी या चित्रपटात आहे.
 
लता मंगेशकर आणि एस.पी. बालसुब्रमण्यमच्या आवाजाने या लग्नमय चित्रपटात चांगलेच रंग भरलेत. या चित्रपटात 14 गाणी आहेत. प्रत्येक गाण्यात कुणालातरी प्रतिनिधित्व मिळालं आहे. अगदी कैलाशनाथांना सुद्धा रिमा लागू ला 'कुछ सुनाईये ना' म्हणण्याचा मोह आवरत नाही. त्यानंतर रिमा लागू अतिशय गोड लाजल्या आहेत.
 
महत्त्वाची 'पात्रं'
प्रेम निशा वगैरे सोडले तर दखल घेण्याजोगी अनेक पात्रं या चित्रपटात आहे. सगळ्यात लक्षवेधी आहे तो म्हणजे सगळ्यांचा लाडका कुत्रा टफी. हा टफी प्रचंड माणसाळलेला आहे. त्याला सगळं जमतं. क्रिकेट खेळताना अंपायरची भूमिका निभावणं, जोडे लपवण्यात मदत करणं अगदी सगळं. चित्रपटातील प्रसंगाचा तो अविभाज्य घटक आहे. त्याची लूडबूड सगळीकडे असते. रेणुका शहाणे गेल्यानंतर तो अन्नपाण्याचा त्याग करतो, मलूल होतो.
 
दुसरं पात्र म्हणजे लल्लू म्हणजेच लक्ष्मीकांत बेर्डे. मराठी चित्रपटसृष्टी गाजवणाऱ्या कलाकारांनी हिंदी चित्रपटात दुय्यम भूमिका साकारण्याचं आणखी एक उदाहरण. त्याच्या साथीला प्रिया बेर्डे असते. या दोघांना काहीही कामं नाहीत. फक्त सलमानच्या मागे मागे फिरणं, हमाली करणं, मधूनच काय इंग्रजी बोलण्याचा सराव करणं आणि राहिलेल्या वेळात प्रिया बेर्डेवर प्रभाव पाडणं एवढंच काम लल्लूला असतं.
 
याबरोबरच डॉक्टर, प्रेम आणि निशा पासून प्रेरणा घेऊन आपली प्रेमकहाणी फुलवू पाहणारे काही लोक या लोकांनी या चित्रपटाला साज चढवला आहे. मोहनीश बहल अर्थात राजेशवर मात्र सगळ्यात जास्त अन्याय झाला आहे. खरंतर चित्रपट त्याच्या लग्नापासून सुरू होतो. त्यालाच बिझनेसही सांभाळावा लागतो. प्रेम फक्त निशाच्या हातचं जेवण्यासाठी एक दिवस ऑफिसला जातो. शेवटी राजेशची पत्नी पूजा मरण पावते. निशाशीही त्याचं लग्न होत नाही आणि चित्रपटाच्या शेवटी तो खराखुरा त्यागमूर्ती राहतो. चेहराभर हसणाऱ्या रेणुका शहाणेचा वावरही उल्लेखनीय आहे. मात्र ती घरातली मोठी सून असल्यामुळे तिच्यावर मोठी जबाबदारी असते. शेवटी बिचारी तीही जाते.
 
भारतीय समाज मुळातच फार उत्सवप्रिय आहे. त्यात लग्नसोहळा म्हटलं की लोकांच्या उत्साहाला उधाण येतं. भारतीय समाजाची हीच नस सूरज बडजात्यांनी ओळखली आणि सोहळे नव्याने साजरे करण्याच्या पद्धतींची ओळख करून दिली. कोणताही खलनायक नसलेल्या, मारामारी, हिंसाचारापासून दुर असलेल्या या चित्रपटाने या चित्रपटाने अनेक पुरस्कार मिळवले, अनेक विक्रम मोडले. फॅमिली ड्रामाच्या पलीकडे या चित्रपटात फारसं काहीच नव्हतं. पण भारतीय चित्रपटाचा इतिहास जेव्हा लिहिला जाईल तेव्हा हम आपके है कौनच्या उल्लेखाशिवाय तो अपूर्ण असेल.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती