नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रंप यांच्यात फोनवरून चर्चा, नाव न घेता पाकिस्तानवर निशाणा

मंगळवार, 20 ऑगस्ट 2019 (11:45 IST)
जम्मू -काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्यात चर्चा झाली आहे.
 
यावेळी नरेंद्र मोदींनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचं नाव न घेता त्यांच्यावर तणाव वाढवत असल्याचा आरोप केला आहे.
काही नेते भारताविरोधात चिथावणीखोर विधानं करत आहेत, जे उपखंडातल्या शांततेसाठी योग्य नाही, असं मोदींनी म्हटलंय.
 
डोनाल्ड ट्रंप यांनी इम्रान खान यांच्यात चर्चा झाल्याचं व्हाईट हाऊसनं जाहीर केल्यानंतर मोदी आणि ट्रंप यांच्यात ही चर्चा झाली आहे. ट्रंप यांनी इम्रान यांना आपसात चर्चा करण्याचा सल्ला दिला आहे.
 
शुक्रवारी व्हाईट हाऊसनं निवेदन केल्यानंतर पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शहा मेहमूद कुरेशी यांनी सांगितलं की, इम्रान खान यांनी डोनाल्ड ट्रंप यांच्याकडे काश्मीरच्या मुद्द्वर चिंता व्यक्त केली आहे.
 
पंतप्रधान कार्यालयानं ट्वीट करून सोमवारी मोदी आणि ट्रंप यांच्या फोनवरून 30 मिनिटं चर्चा झाल्याचं स्पष्ट केलं आहे. यावेळी द्विपक्षीय संबंध आणि भारतीय उपखंडातल्या मुद्द्यांवर चर्चा झाली.
या चर्चेबाबत पंतप्रधान कार्यालयानं काही ट्वीट्स केले, त्यापैकी एका ट्वीटनुसार मोदींनी या चर्चेवेळी ट्रंप यांना जूनमध्ये ओसाकात झालेल्या जी-20 देशांच्या परिषदेची आठवण करून दिली. तसंच दोन्ही देशांचे अर्थमंत्री लवकरच चर्चा करतील असं सांगितलं.
 
दहशतवादाच्या मुद्द्यावर देखील दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. कुठल्याही अपवादाशिवाय सीमाभागात दहशतवाद थांबणं गरजेचं आहे असंही मोदींनी म्हटलंय.
 
गरिबी, रोगराई आणि शिक्षणासारख्या मुद्द्यांवरही यावेळी चर्चा झाली. तसंच नियमित संपर्कात राहाण्यावरही दोन्ही नेत्यांमध्ये एकमत झालं.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती