रावळपिंडीचं ते मैदान जेव्हा राहुल द्रविडने गाजवलं होतं...

बुधवार, 11 डिसेंबर 2019 (11:26 IST)
तब्बल दशकभराच्या कालावधीनंतर पाकिस्तानमध्ये टेस्ट मॅच होते आहे. आणि श्रीलंकाच पुन्हा रावळपिंडीमध्ये दाखल झाली आहे. 2009 मध्ये पाकिस्तानच्या दौऱ्यावर असलेल्या याच श्रीलंकेच्या संघावर काही सशस्त्र गटांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात आठ जणांचा मृत्यू झाला होता, मात्र दोन्ही संघाचे खेळाडू आणि मॅच अधिकारी थोडक्यात बचावले होता. अनेक खेळाडू जखमी झाले. ती मॅच आणि तो दौरा त्या हल्ल्यानंतर रद्द करण्यात आला.
 
जीवघेण्या अशा या हल्ल्यामुळे पाकिस्तानमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांचं नियोजन थांबलं. सहा वर्षांनंतर 2015 मध्ये पाकिस्तानमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटचं पुनरागमन झालं. झिम्बाब्वेच्या संघाने पाकिस्तानमध्ये तीन वनडे आणि दोन ट्वेन्टी-20 अशा दोन सीरिज खेळल्या.
 
दहशतवादी हलल्याच्या कटू आठवणी बाजूला सारत श्रीलंकेच्या संघाने सप्टेंबर महिन्यात तीन वनडे आणि तीन ट्वेन्टी-20 सीरिजसाठी पाकिस्तानचा दौरा केला. एखाद्या देशाच्या राष्ट्राध्यक्षाला ज्या दर्जाची सुरक्षा पुरवण्यात येते, तशी सुरक्षाव्यवस्था श्रीलंकेच्या संघाला पुरवण्यात आली. तो दौरा यशस्वीपणे पार पडल्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने श्रीलंकेच्या संघाला टेस्ट सीरिज खेळण्यासाठी यावं, असं आमंत्रण दिलं. त्याचा स्वीकार करत श्रीलंकेचा संघ दोन टेस्ट मॅचच्या सीरिजकरता पाकिस्तानात दाखल झाला आहे.
 
पाकिस्तान क्रिकेट बोर्ड या सीरिजसंदर्भात सोशल मीडियावर सातत्याने अपडेट पुरवत आहेत. "टचडाऊन इस्लामाबाद. श्रीलंकेच्या संघाचं टेस्ट सीरिजसाठी पाकिस्तानमध्ये आगमन. दोन दिवसात सीरिजला सुरुवात होणार. तुमची तिकिटं बुक करा. रावळपिंडी क्रिकेट स्टेडियममध्ये भेटूया," असं या ट्वीटमध्ये सांगण्यात आलंय. दरम्यान सध्याच्या पाकिस्तानच्या संघातील प्रत्येक खेळाडू पहिल्यांदाच मायभूमीत टेस्ट मॅच खेळत आहेत.
 
श्रीलंकेच्या संघाचं टेस्ट सीरिजसाठी पाकिस्तानात आगमन हा ऐतिहासिक क्षण आहे, असं पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी वासिम खान यांनी सांगितलं. ते पुढे म्हणाले, "2009च्या घटनेनंतर इतर संघ पाकिस्तानात येण्यासाठी तयार नव्हते. परंतु गेल्या काही वर्षात श्रीलंका तसंच झिम्बाब्वे संघांनी पाकिस्तानचा दौरा केला. घरच्या मैदानावर खेळण्याची संधी नसल्यामुळे पाकिस्तानचं मोठं नुकसान झालं. पाकिस्तानच्या चाहत्यांना त्यांच्या लाडक्या खेळाडूंना घरच्या मैदानावर पाहता आलं नाही."
 
जेव्हा रावळपिंडीत राहुलने उभारली धावांची भिंत
रावळपिंडी क्रिकेट स्टेडियममध्ये तब्बल 15 वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय टेस्ट मॅच होते आहे. म्हणजेच यापूर्वी इथे शेवटची आंतरराष्ट्रीय टेस्ट मॅच 2004 मध्ये झाली होती. आणि तीसुद्धा भारताविरुद्ध. हो, या मैदानात शेवटची टेस्ट मॅच भारत आणि पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये रंगली होती.
 
भारताने टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला. भारतीय बॉलर्सनी हा निर्णय सार्थ ठरवत पाकिस्तानचा डाव 224 धावांतच गुंडाळला. लक्ष्मीपती बालाजीने 4 तर इरफान पठाण आणि आशिष नेहरा यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.
 
प्रत्युत्तरादाखल खेळताना भारतीय संघाने 600 धावांचा डोंगर उभारला. राहुल द्रविडने 34 चौकार आणि एका षटकारासह 270 धावांची मॅरेथॉन खेळी साकारली. पार्थिव पटेल (69), व्हीव्हीएस लक्ष्मण (71), सौरव गांगुली (77) यांनी अर्धशतकी खेळी करत द्रविडला चांगली साथ दिली.
 
भारतीय बॉलर्सनी पाकिस्तानचा डाव 245 धावांतच गुंडाळला. अनिल कुंबळेने 4 तर लक्ष्मीपती बालाजीने 3 विकेट्स घेतल्या. भारतीय संघाने ही टेस्ट एक डाव आणि 131 धावांनी जिंकली.
 
या विजयासह भारतीय संघाने तीन टेस्ट मॅचेसची सीरिज 2-1 अशी जिंकली. राहुल द्रविडला मॅन ऑफ द मॅच तर वीरेंद्र सेहवागला मॅन ऑफ द सीरिज पुरस्काराने गौरवण्यात आलं. याच सीरिजमध्ये सेहवागने 309 धावांची मॅरथॉन खेळी केली करून पहिला भारतीय त्रिशतकवीर होण्याचा मान मिळविला होता. यानंतर पाच वर्षांनी झालेल्या त्या हल्ल्यानंतर रावळपिंडीत आंतरराष्ट्रीय टेस्ट मॅचचं आयोजन थंडावलं. आणि अखेर आज पुन्हा इथे एक टेस्ट होते आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती