प्रियंका गांधी उत्तर प्रदेश पोलिसांच्या ताब्यात, सोनभद्र प्रकरणावरून राजकारण पेटलं

उत्तर प्रदेशच्या सोनभद्रमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर पीडित कुटुंबीयांना भेटण्यासाठी जात असलेल्या काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी-वाड्रा यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.
 
प्रियंका यांना घटनास्थळी जाण्यापासून रोखण्यात आलं. त्यामुळे रस्त्यावरच धरणे आंदोलनाला बसलेल्या प्रियंका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांना ताब्यात घेतलं आहे.
 
बुधवारी एका जमिनीच्या वादातून सोनभद्रमध्ये हिंसाचार झाला होता. या ठिकाणी झालेल्या गोळीबारात 10 जणांचा मृत्यू तर 24 हून जण जखमी झाले आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.
 
प्रियंका यांनी सर्वप्रथम लखनऊमध्ये उपचारासाठी दाखल असलेल्या जखमींची विचारपूस केली. त्यानंतर पीडितांची भेट घेण्यासाठी त्या सोनभद्रकडे जात होत्या.
 
परिसरात कलम 144 लागू करण्यात आल्याचे सांगत पोलिसांनी त्यांचा ताफा नारायणपूरजवळ अडवला. त्यांनी या कारवाईचा विरोध करत त्याठिकाणीच ठाण मांडले. त्यानंतर प्रियंका यांना ताब्यात घेण्यात आलं आहे.
 
याबाबत एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना प्रियंका गांधी म्हणाल्या, "मला फक्त पीडित कुटुंबीयांची भेट घ्यायची आहे. मी माझ्यासोबत फक्त 4 व्यक्ती घेऊन जाईन असं सांगितलं. पण प्रशासन मला त्याचीसुद्धा परवानगी देत नाही. आम्हाला का रोखण्यात आलं, हे त्यांनी सांगावं. तोपर्यंत आम्ही इथेच शांतपणे ठाण मांडून बसणार आहोत."
 
प्रियंका गांधी यांना ताब्यात घेऊन हलवण्यात आलं. मात्र त्यांना कुठे नेण्यात येणार आहे, याची कल्पना नसल्याचं प्रियंका गांधी म्हणाल्या.
 
"आम्ही आता झुकणार नाही. आम्ही शांतपणे पीडित कुटुंबीयांना भेटायला जात होतो. आता मला कुठे नेण्यात येत आहे, हे मला माहीत नाही. ते आम्हाला कुठेही नेणार असले तरी आम्ही जायला तयार आहोत," असं त्यांनी एएनआयसोबत बोलताना सांगितलं.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती