पंकजा मुंडे यांच्या भाषणातील 'हे' 5 मुद्दे पक्षासाठी निर्वाणीचा इशारा आहेत?

गुरूवार, 12 डिसेंबर 2019 (18:22 IST)
"मी पक्षाला सोडणार नाही, पक्षाला मला सोडायचं असेल तर त्यांनी निर्णय घ्यावा," असं म्हणत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आता चेंडू पक्ष श्रेष्ठींच्या कोर्टात टोलावला आहे.
 
गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीदिवशी कार्यकर्त्यांना गोपीनाथगड येथे जमण्याचे आवाहन केले होते. या कार्यक्रमाला जमलेले हजारो कार्यकर्ते आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, एकनाथ खडसे, हरिभाऊ बागडे, प्रकाश मेहता, बबनराव लोणीकर, महादेव जानकर, पाशा पटेल तसंच अन्य नेत्यांच्या उपस्थितीत पंकजा मुंडेंनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली. यावेळी नाव न घेता त्यांनी राज्यातील भाजपच्या नेतृत्वावर टीका केली. त्यांचा बराचसा रोख देवेंद्र फडणवीसांकडे होता.
 
"आम्हाला ढकलत दारापर्यंत आणून सोडलं आहे. आता भाजपने सर्व नाराज लोकांशी संवाद साधून त्यांचे गैरसमज दूर करावेत," असं पंकजा यांनी म्हटलं.
 
आपण पक्ष सोडून जाणार नाही, हे स्पष्ट करतानाच पंकजा यांनी आपल्या पाठीमागे बहुजन समाजाची ताकद उभी आहे हे दाखवत आपल्याबाबत योग्य प्रकारे निर्णय घेतला जावा यासाठी एकप्रकारे पक्षावरच दबाव टाकला आहे. पंकजा यांच्या भाषणातील या 5 मुद्द्यांवरून पंकजा पक्षश्रेष्ठींना निर्वाणीचा इशारा देत असल्याचं चित्र निर्माण होत आहे.
 
1. कोअर कमिटीतून मला मुक्त करा
मी कोणावर नाराज नाही. कारण मला कोणाकडून काही अपेक्षाच नाहीत. आता मी कोणीही नाही. चंद्रकांतदादा इथं आहेत. त्यांना मी सांगते, की मला कोअर कमिटीतून मुक्त करा, असं म्हणत पंकजा यांनी पक्षाला आता आपला स्वतंत्रपणे विचार करावा लागेल, हे स्पष्ट केलं.
 
 
"मी आता मशाल घेऊन महाराष्ट्राचा दौरा करणार आहे. मी घरात बसून राहणार नाही. 26 जानेवारी रोजी गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने संपर्क कार्यालयाचं उद्घाटन करणार आहे. 27 जानेवारी रोजी औरंगाबाद येथे एक दिवसाचं उपोषण करणार आहे. ज्या ठिकाणी महिलांवर अत्याचार झाला असेल त्या ठिकाणी मी जाणार आहे," असं म्हणताना पंकजा यांनी आपण अजूनही माघार घेतली नाही आणि राज्यात नेतृत्व प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करू, हे अधोरेखित केलं.
 
2. पक्षाची मालकी कोणा एकाची नाही
राज्यातील पक्षनेतृत्वाच्या कार्यपद्धतीवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. त्यांनी नाव घेतलं नसलं तरी त्यांचा रोख देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असल्याचं स्पष्ट होत होतं.
 
"पक्ष ही प्रक्रिया असते. त्याची मालकी कुणा एकाकडे नाही. या पक्षाचं नेतृत्व व्यंकय्या नायडू, नितीन गडकरी, राजनाथ सिंह यांनी भूषवलं आहे. आता अमित शहा अध्यक्ष आहे पुढे दुसरं कुणी येईल. स्वत: नरेंद्र मोदीदेखील मी पक्षाचा कार्यकर्ता असल्याचं सांगतात. डॉ. हेडगेवार, गोळवलकर गुरुजी, बाळासाहेब देवरस, सुदर्शनजी आणि मोहन भागवत यांचा वारसा फक्त काही लोकांकडेच आहे का? आमच्याकडे नाही का?" असं पंकजा यांनी म्हटलं.
 
3. 'या' बातम्या कोणी पेरल्या याचा शोध घ्या
"गोपीनाथगडावरील कार्यक्रमात मी कार्यकर्त्यांशी बोलेन अशा आशयाची मी फेसबुक पोस्ट लिहिली होती. त्याच्या बातम्या माध्यमांमधून योग्य प्रकारे आल्या. पण नंतर मात्र मी पक्ष सोडणार असल्याच्या बातम्या येऊ लागल्या. या बातम्या कोणी दिल्या याचा तपास करा? मी आता आमदार नाही, साधी नगरसेविकाही नाही. पण तरीही मी पक्ष सोडून जावा, असं कोणाला का वाटतंय?" असा प्रश्न पंकजा मुंडे यांनी उपस्थित केला. भाजपमधील काही नेते पत्रकारांच्या मदतीने बातम्या पेरत असल्याचा आरोपच त्यांनी अप्रत्यक्षरित्या केला.
 
"मी विरोधी पक्ष नेतेपद किंवा अन्य जबाबदारी मिळावी यासाठी पक्षावर अशापद्धतीनं दबाव टाकत असल्याच्याही बातम्या पेरल्या गेल्या. मला या गोष्टी मिळू नयेत म्हणून हे केलं का? या बातम्या कोणी पेरल्या याचा शोध घ्यावा. गेले १२ दिवस टीव्ही लावला तर रोज संजय राऊत दिसायचे. त्यांनी जे बोललं ते करुन दाखवलं. पण मी काही बोलले नाही तरी माझंच नाव दिसायचं. पंकजाविषयी चांगलं नाही बोललं पाहिजे यासाठी काही लोकांना नेमलं होतं का?" असंही पंकजा मुंडेंनी म्हटलं.
 
4. पक्ष माझ्या बापाचा
पंकजा मुंडेंनी लिहिलेल्या फेसबुक पोस्टनंतर त्या पक्ष सोडणार का की हे त्यांचं दबावतंत्र आहे, अशी चर्चा सुरू झाली होती. त्या चर्चांना त्यांनी पूर्णविराम दिला.
 
पंकजा मुंडेंनी म्हटलं, "गोपीनाथ मुंडेंनी पक्षात अनेक नेत्यांना मोठं केलं. काहींना दूरही केलं असेल. पण कोणाच्या पाठीत खंजीर खुपसला नाही. मी गोपीनाथ मुंडेंची मुलगी आहे. मी बंडखोरी करणार? बेईमानी माझ्या रक्तात नाही. निवडणुकीच्या शेवटच्या दिवसापर्यंत भाजपचा एकेक आमदार निवडून यावा, म्हणून मी माझा मतदारसंघ सोडून सगळीकडे प्रचार करत होते. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत म्हणून एकेक आमदार जोडत होतो आणि माझ्यावरच बंडखोरीचे आरोप? बेईमानी माझ्या रक्तात नाही. हा पक्ष माझ्या बापाचाही आहे. मी पक्ष सोडणार नाही."
 
5. हातातोंडाचा घास गेला
"लक्ष्मी नसेल तर समुद्र मंथन करुन बाहेर काढावं लागतं. लक्ष्मी हरवली आमची. तोंडचा घास आम्हाला घेता आला नाही," असं म्हणत पंकजा यांनी राज्यातील सत्ता स्थापनेच्या घडामोडींवर भाष्य केलं.
 
"अमित शाह, नरेंद्र मोदी यांनी केलेल्या कष्टाचं चीज व्हावं असं वाटत होतं. पण आता मी काम करणार. मी केवळ वंजारी समाजाची नाहीये. मी आता वंजारी, धनगर, मराठा, सोनार, माळी, अल्पसंख्याक सगळ्यांचीच आहे. आता वज्रमूठ बांधायची आहे," असंही त्यांनी म्हटलं.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती