इराणमध्ये सापडले नवीन तेलसाठे, 53 अब्ज बॅरल पुरवठ्याची क्षमता

सोमवार, 11 नोव्हेंबर 2019 (12:07 IST)
इराणमध्ये तेलाच्या नवीन साठ्याचा शोध लागला आहे. या तेलसाठ्यामुळं इराणच्या सध्याच्या तेलसाठ्यामध्ये जवळपास तीन पटीनं वाढ होईल, अशी माहिती इराणचे राष्ट्रपती हसन रुहानी यांनी दिली आहे.
 
हा तेलसाठा खुझेस्तान प्रांताच्या नैऋत्य भागात असून तब्बल 2,400 स्क्वेअर किलोमीटरच्या परिसरात पसरला आहे. इथून साधारणतः कच्च्या तेलाचे 53 अब्ज बॅरल इतका पुरवठा होऊ शकतो.
 
अमेरिकनं लादलेल्या निर्बंधांमुळे इराणला सध्या अन्य देशांना तेलविक्री करण्यात अडचणी येत आहेत.
 
"आम्हाला या ठिकाणी 53 अब्ज बॅरल कच्चं तेल निघेल असा साठा आढळून आला आहे. हा अत्यंत मोठा असा तेलसाठा आहे. तेलाच्या या थराची खोली 80 मीटर इतकी आहे," यझाद या शहरात बोलताना हसन रुहानींनी म्हटलं.
 
तेल उत्खननाचा वेग जर 1 टक्क्यानं वाढला तर इराणचा तेलामधून मिळणारा महसूल 32 अब्ज डॉलर्सनं वाढेल, असंही रुहानींनी सांगितलं.
"मला व्हाईट हाऊसला सांगायचं आहे, की तुम्ही इराणच्या तेलविक्रीवर निर्बंध लादले. मात्र या देशातील इंजीनिअर्स आणि अन्य कर्मचाऱ्यांनी 53 अब्ज बॅरल्स इतका तेलसाठा शोधण्यात यश मिळवलं आहे," निम-सरकारी फार्स न्यूज एजन्सीनं रुहानी यांचं हे वक्तव्य प्रसिद्ध केलं आहे.
 
हा नवीन तेलसाठा इराणमधील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वांत मोठा साठा असल्याचं AP या वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे. ऐहवाज हा इराणमधील सर्वांत मोठा साठा असून याची क्षमता 65 अब्ज डॉलर इतकी आहे.
 
इराण जगातील सर्वांत मोठ्या तेलउत्पादक देशांपैकी एक आहे. दरवर्षी इराणकडून अब्जावधी डॉलर्सच्या तेलाची विक्री होते. इराणमधील सध्याच्या तेलसाठ्यांची क्षमता ही 150 अब्ज बॅरल्स इतकी असल्याचंही रुहानी यांनी सांगितलं.
 
इराणमध्ये जगातील चौथ्या क्रमांकाचे तेलसाठे आहेत, तर नैसर्गिक वायू उत्पादनाचा विचार करता इराणचा क्रमांक जगात दुसरा आहे. पर्शियन आखातात कतारच्या बरोबरीनं इराणचे नैसर्गिक वायूचे तेलसाठे आहेत.
 
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी गेल्यावर्षी इराणवर आर्थिक निर्बंध लादले होते. इराण आणि सहा अन्य देशांमध्ये 2015 मध्ये झालेला आण्विक करार फेटाळून लावल्यानंतर अमेरिकेनं ही कारवाई केली होती.
 
या करारान्वये इराणनं त्यांच्या अण्वस्त्र निर्मितीवर मर्यादा आणण्याचं कबूल केलं होतं आणि आंतरराष्ट्रीय निरीक्षकांना पाहणीसाठी देशात येऊ देण्याचंही मान्य केलं होतं.
 
आर्थिक निर्बंधांमुळे इराणच्या अर्थव्यवस्थेला प्रचंड मोठा फटका सहन करावा लागला होता. त्यांच्या चलनाचं मूल्यही घसरलं होतं. चलनवाढीचा वेग वाढला होता. परदेशी गुंतवणूकदारांनीही इराणकडे पाठ फिरवली होती आणि देशांतर्गत असंतोष उफाळला होता.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती