नरेंद्र मोदी: शाहीन बाग, जामिया आंदोलन कट आहेत

मंगळवार, 4 फेब्रुवारी 2020 (10:35 IST)
नागरिकत्व दुरुस्ती विधेयक (CAA) विरोधात शाहीन बाग, जामिया मिलिया किंवा इतर ठिकाणी सुरू असलेल्या आंदोलनांमधून देशातील एकोपा उद्ध्वस्त करण्याचा कट आहे, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. 
 
दिल्ली निवडणुकीच्या प्रचारासाठी घेतलेल्या सभेत नरेंद्र मोदी यांनी CAA विरोधात आंदोलन करणाऱ्यांवर टीका केली.
 
अराजकवाद रोखण्यासाठी दिल्लीत भाजपला पाठिंबा द्या, असं आवाहनही यावेळी नरेंद्र मोदींनी केलं.
 
मोदी म्हणाले, "जामिया असो किंवा शाहीन बाग, गेल्या काही दिवसांपासून इथं CAA विरोधात आंदोलनं झाली. मात्र ही आंदोलनं योगायोग आहेत का? नाही. भारतातला एकोपा बिघडवण्याचा प्रयत्न करणारा हा एक राजकीय प्रयोग आहे."
 
दुसरीकडे, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनीही दिल्ली निवडणुकांच्या प्रचारात अरविंद केजरीवालांवर निशाणा साधलाय. अराजकवादी आणि दहशतवादी यात फरक नाही, असं जावडेकर म्हणाले. तसंच, केजरीवाल दहशतवादी असल्याचे अनेक पुरावे आहेत, असंही ते म्हणाले. एशियन एजनं ही बातमी दिलीय.
 
काही दिवसांपूर्वीच दिल्ली भाजपचे नेते पर्वेश वर्मा यांनी केजरीवालांना 'दहशतवादी' संबोधल्यानं निवडणूक आयोगानं त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती