'ताजमहाल'पेक्षा धारावीची झोपडपट्टी का लोकप्रिय?

शुक्रवार, 27 सप्टेंबर 2019 (10:11 IST)
पुजा छाब्रिया
"एक उत्तम दिवस" मुंबई शहरातल्या धारावी झोपडपट्टीच्या पर्यटन दौऱ्यावर आलेल्या एका पर्यटकाची ही प्रतिक्रिया. "प्रत्येकजण मित्रासारखा वागत होता. कुणीच भीक मागत नव्हतं." असंही तो म्हणतो. अशा पर्यटकांना धारावीची झोपडपट्टी का पाहावीशी वाटत असेल? याचं उत्तर शोधायला गेलं की मानवी जीवनाचे अनेक कंगोरे समोर येतात.
 
आशिया खंडातली सर्वात मोठी झोपडपट्टी असणाऱ्या धारावीच्या चिंचोळ्या गल्ल्यांना हल्ली जगभरातून हजारो पर्यटक भेट देतात. यातूनच 'slum Tourism' म्हणजेच 'झोपडपट्टी पर्यटना'ला चालना मिळाली आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचं तर 'poverty Tourism' म्हणजेच 'गरिबी दर्शना'चा ट्रेंड सुरू झाला आहे.
 
शेजारील गरीब ठिकाणांना भेटी देण्याचा हा ट्रेंड तसा वादग्रस्त असला तरी पर्यटक हल्ली पर्यटनाला गेल्यावर निसर्गरम्य आणि जगप्रसिद्ध ठिकाणांप्रमाणेच दारिद्र्याने पिचलेल्या लोकांचं खरं आयुष्य कसं असतं, हे बघण्यालाही प्राधान्य देऊ लागले आहेत.
 
धारावी झोपडपट्टी सहल नुकताच भारतातला आवडता पर्यटन अनुभव ठरला आहे. धारावी पर्यटनाला ट्रिप अॅडव्हायजर्स या ट्रॅव्हल साईटचा ट्रॅव्हलर्स चॉईस पुरस्कारही मिळाला आहे. या ट्रॅव्हल साईटनुसार परदेशी पर्यटक ताजमहाल पाहण्यापेक्षा धारावी दर्शनाला पसंती देऊ लागले आहेत.
 
2005 साली स्थापन झालेल्या रिअॅलिटी टूर्स अँड ट्रॅव्हल या कंपनीचे सहसंस्थापक कृष्णा पुजारी सांगतात, "धारावी पर्यटनासाठी येणारे बहुतांश पर्यटक हे अमेरिका, युरोप आणि ऑस्ट्रेलियातून येतात."
 
धारावी झोपडपट्टी सहलींवर लक्ष केंद्रीत करणारी ही सर्वात जुनी पर्यटन कंपनी आहे.
 
पुजारी सांगतात, "कंपनीचे सहसंस्थापक आणि माझे ब्रिटिश मित्र क्रिस्ट वे यांनी मला पहिल्यांदा झोपडपट्टी पर्यटनाविषयी सुचवलं तेव्हा मी गोंधळलो होतो. एखाद्याला झोपडपट्टी बघायला का आवडेल? मात्र, नंतर माझ्या लक्षात आलं की तिथे बघण्यासारखं आणि शिकण्यासारखं बरंच काही असतं."
 
धारावीचं भौगोलिक स्थान मोक्याचं आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या महानगरी मुंबईच्या अगदी मध्यभागी धारावी झोपडपट्टी आहे.
 
धारावीच्या लांबच-लांब चिंचोळ्या गल्ल्या, तिथले छोटे-छोटे कारखाने आणि पडक्या घरांमध्ये जवळपास दहा लाख लोक राहतात. या गल्ल्यांमध्ये सार्वजनिक स्वच्छतागृह आणि पिण्याच्या पाण्याचे सार्वजनिक नळ आहे. मात्र, या गल्ल्यांमध्ये खुली गटारं आहेत. स्वच्छेतेची मोठी समस्या इथे भेडसावते.
 
इथे शेकडो छोटे-छोटे कारखाने आहेत. या कारखान्यांमध्ये एम्ब्रॉयडरी केलेले कापड, निर्यातयोग्य चामडीच्या वस्तू, प्लॅस्टिक आणि मातीची भांडी तयार केली जातात आणि या सर्व कारखान्यांमध्ये मिळून तब्बल जवळपास 46 अब्ज रुपयांची उलाढाल होत असते. (650 मिलियन डॉलर्स)
 
शिवाय कधीही न झोपणाऱ्या या शहराजा रोजचा भार वाहणारे हजारो कचरा वेचक, टॅक्सी चालक, रोजंदारीवर काम करणारे मजूरही या झोपडपट्टीत राहतात.
 
अनुभवाच्या शोधात
या अशा घाणेरड्या, कचरा आणि अस्वच्छेतेने बरबटलेल्या झोपडपट्टीला भेट देण्यासाठी पर्यटक का येतात?
 
2016 साली या झोपडपट्टीचा सहा तासांचा दौरा करणाऱ्या पर्यटक मेलिसा निसबेट सांगतात, "आम्ही व्हिक्टोरियाच्या काळापासूनच्या झोपडपट्ट्यांना भेटी दिल्या. आधी मनोरंजन म्हणून आणि नंतर सामाजिक सुधारणेच्या हेतूने."
 
तुमची खर्च करण्याची किती तयारी आहे त्यानुसार ट्रिप प्लॅन केल्या जातात. जास्त पैसे असेल तर अगदी एसीमध्ये झोपडपट्टीचा दौरा करता येतो.
 
शिवाय 'इनसाईड मुंबई'सारख्या काही टूर कंपन्या "सांस्कृतिक देवाण-घेवाणी"च्या उद्देशाने या झोपडपट्टीतल्या एखाद्या घरातच भोजनाची व्यवस्थाही करतात.
 
मेलिसा यांना वाटतं की या सहलींमध्ये जगभरातल्या लोकांना गरीब आणि पिचलेल्या समाजाचं वास्तव बघता येतं, अनुभवता येतं.
 
तसं पाहिलं तर झोपडपट्टी पर्यटनात भारत तसा नवखा आहे. ब्राझिल आणि दक्षिण आफ्रिकेत पूर्वीपासून अशा प्रकारचं पर्यटन अस्तित्वात आहे.
 
मेलिसा सांगतात, "धारावीच्या दौऱ्यात माझ्या असं लक्षात आलं की इतर पर्यटकही मी ज्या कारणांमुळे गेले त्याच कारणांमुळे जात होते. झोपडपट्टीतल्या आयुष्याचं वास्तव जाणून घेण्यासाठी."
 
मात्र, तिथे त्यांनी जे पाहिलं आणि ऐकलं त्यामुळे त्या व्यथित झाल्या होत्या.
 
दारिद्र्याचं 'उदात्तीकरण'?
त्या म्हणतात, "झोपडपट्टीविषयी असं भासवलं जातं जणू इथे काहीच समस्या नाहीत. गरिबीकडे दुर्लक्ष केलं जातं. किंवा त्याकडे ही अतिशय सामान्य आणि नैसर्गिक आहे असं बघितलं जातं. कधी कधी तर त्याचं उदात्तीकरणही करतात."
 
"स्थानिकांशी म्हणावा तसा संवाद साधू दिला जात नाही. त्यामुळे त्यांचा भावना जाणून घेता येत नाही. ते त्यांची रोजची कामं करत असतात. आमच्याकडे लक्षही देत नाही."
 
परत गेल्यानंतर त्यांनी इतर पर्यटकांचे अनुभव जाणून घेण्यासाठी ट्रीप अॅडवायझरच्या साईटवर इतर पर्यटकांनी लिहिलेल्या प्रतिक्रियांचा अभ्यास केला.
 
तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की बहुतांश पर्यटकांनी गरिबीविषयीच्या काळजीने आपल्या दौऱ्याची सुरुवात केली. मात्र, दौरा संपता संपता त्यांचं असं मत बनलं की इथे कुठलीही समस्या नाही.
 
त्या म्हणतात, "झोपडपट्टीतून बाहेर पडताना जर पर्यटकांचं असं मत बनत असेल तर काहीतरी मोठी गडबड आहे."
 
"या सहली हेतूपुरस्सर आखलेल्या असतात आणि या झोपडपट्ट्या म्हणजे आर्थिक पावरहाउस असल्याचं चित्र रंगवलं जातं. मात्र, एका गोष्टीकडे सोयीस्कर दुर्लक्ष केलं जातं की इथल्या अनेकांना जातीय उतरंडीमुळे भेदभावाचा सामना करावा लागतो. किंवा त्यांना वीज, स्वच्छ पाणी यासारख्या मूलभूत सोयीही मिळत नाहीत."
 
काही टूर कंपन्या स्थानिकांसोबत फोटोही काढू देतात. मात्र, यामुळे त्यांना त्रास होत असेल किंवा त्यांना ओशाळल्यासारखं होत असावं, असं मेलिसा यांना वाटतं.
 
याविषयी ऑबजर्वर रिसर्च फाउंडेशनमध्ये या विषयात शिष्यवृत्ती मिळवणाऱ्या अदिती राथो सांगतात, "यामुळे रहिवाशांना एकाकी पडल्यासारखं वाटत नाही. शिवाय, इतक्या परदेशी पर्यटकांना आपल्या आयुष्यात रस आहे, हे बघून अनेकांना आनंद होतो."
 
"मात्र, त्याचवेळी काही रहिवाशी थेट आर्थिक फायदा किंवा रोजगाराचा उल्लेख या टूरचे फायदे म्हणून करतात आणि म्हणूनच जे काही सकारात्मक परिणाम मिळतात ते अनिश्चित आणि अल्पकालीन असतात."
 
मात्र, कृष्णा पुजारी यांना हे मान्य नाही.
 
उद्यमशीलता
त्यांचं म्हणणं आहे की झोपडपट्टीचं उत्कृष्ट दर्शन घडवण्यासोबतच इथली उद्यमशीलता दाखवून झोपडपट्टीविषयी असलेलं मत बदलण्यावर आमच्या कंपनीचा विश्वास आहे.
 
ते म्हणतात, "आम्ही आमच्या टूरमध्ये वास्तव परिस्थिती सांगतो. वास्तवात काय आहे ते दाखवतो. विजेच्या लोंबकळणाऱ्या तारांपासून ते जोमाने वाढणाऱ्या रिसायकलिंग उद्योगांपर्यंत. मात्र, झोपडपट्टी म्हणजे केवळ गरिबी, धोकादायक किंवा भीक मागणे, असा विचार करणारी मानसिकता आम्हाला बदलायची आहे आणि आमचे पाहुणे हे प्रत्यक्षात अनुभवू शकतात."
 
फोटो काढण्याविषयीही त्यांच्या कंपनीचे नियम कडक आहेत. ते सांगतात, "आम्ही No-Camera धोरणाचं काटेकोरपणे पालन करतो."
 
कृष्णा पुजारी सांगतात त्यांची कंपनी म्हणजे एक सामाजिक भान बाळगणारा उद्योग आहे. त्यांच्या कंपनीच्या 'Reality Gives' या चॅरिटी विभागातर्फे झोपडपट्टीतल्या लोकांसाठी अनेक शैक्षणिक कार्यक्रम राबवले जातात. टूरमधून जो नफा मिळतो त्यातलाच काही भाग या कामासाठी वापरला जातो.
 
2011च्या जनगणनेनुसार 6 कोटी 50 लाख लोक झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या या देशातला हा एक उपक्रम आहे. जी झोपडपट्टीला 'मानवी अधिवासासाठी अयोग्य अशी घरं असणारं निवासी ठिकाण' सांगते.
 
इनसाईड मुंबई नावाने मुंबईतल्या झोपडपट्टीचे टूर आयोजित करणाऱ्या मोहम्मद यांना वाटतं की पर्यटकांना इथल्या लोकांच्या कष्टाचा आणि लवचिकतेचा अनुभव घेता आला पाहिजे. ते म्हणतात, "मी असं म्हणेन की या समाजाकडे दुर्लक्ष करणं, ते अस्तित्वातच नाही, असं भासवणं हाच मानवतेविरोधातला खरा गुन्हा आहे."
 
मात्र, अशा सहली वैयक्तिक समृद्धीच्या पलिकडे जाऊन रचनात्मक बदलांवर जोर देतात का?
 
लेस्टर विद्यापीठात प्राध्यापक असलेले फॅबियन फ्रेंझेल यांच्या मते, "हे प्रयत्न गरिबी संदर्भातल्या गुंतागुंतीच्या आणि व्यापक प्रश्नांकडे पुरेशा प्रमाणात लक्ष देत नसावेत."
 
"मात्र, अशा सहलींचा सकारात्मक परिणाम म्हणजे एकतर त्या झोपडपट्टीचं दर्शन घडवतात आणि रहिवाशांना संसाधनांच्या जास्तीत जास्त वितरणासाठी किंवा घरातून बेदखल करण्यासारख्या धमक्यांविरुद्ध आवाज उठवण्याचं बळ देते."
 
राजकीय क्षमता
वर्तमान सहलींच्या रचनेत एकाच पद्धतीचं चित्र दाखवलं जाण्याचा धोका आहे. मात्र, फॅबियन याकडे राजकीय आणि सामाजिक जाणिव निर्माण करण्याची संधी म्हणून बघतात.
 
ते म्हणतात, "एकीकडे भारत चंद्रावर पोचला आहे. मात्र, दुसरीकडे देशातल्या मोठ्या लोकसंख्येला अजून घरं आणि स्वच्छता यासारख्या मूलभूत सोयीही मिळत नाहीत."
 
"झोपडपट्टी पर्यटन भारतातल्या उच्चभ्रू वर्गासाठी शरमेची बाब असेल. मात्र, यात राजकीय निवड आणि अन्याय अधोरेखित करणारी राजकीय क्षमता नक्कीच आहे"

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती