Mi CC9 Pro Premium: शाओमीच्या नवीन स्मार्टफोनमध्ये 108 मेगापिक्सलचा कॅमेरा

बुधवार, 6 नोव्हेंबर 2019 (11:37 IST)
लिओ केलियन
शाओमी या आघाडीच्या चिनी मोबाइल कंपनीनं तब्बल 108 मेगापिक्सल कॅमेरा असलेला नवीन स्मार्टफोन बाजारात आणलाय.
 
या फोनमधला हाय रेझोल्युशनचा सेन्सर सॅमसंगने तयार केलाय, पण तो त्यांनी अद्याप स्वतःच्या उत्पादनांमध्येही वापरलेला नाही.
 
या खास कॅमेऱ्यामुळे लोकांना "अगदी बारीक डिटेलसह अत्यंत सुस्पष्ट फोटो" काढता येतील, असं शाओमीने म्हटलंय.
 
मात्र सुरुवातीला या फोनच्या झालेल्या एका चाचणीत असं लक्षात आलं की यापेक्षा कमी रेझोल्युशन असलेल्या कॅमेऱ्यांपेक्षा या कॅमेऱ्याने काढलेल्या फोटोंमध्ये जास्त गडबड होतेय.
 
सध्या Mi CC9 Pro Premium फोन केवळ चिनी बाजारपेठांमध्ये उपलब्ध असेल, त्याची किंमत 2,799 युआन (28,277 रुपये, 400 डॉलर्स) इतकी आहे.
 
हाच कॅमेरा शाओमी Mi Note 10 या येऊ घातलेल्या नवीन फोनमध्ये वापरणार असल्याचं शाओमीनं सांगितलं. हा फोन बुधवारी लाँच होतोय आणि Mi CC9 Pro Premium पेक्षा जास्त प्रमाणावर त्याची विक्रीही होणार आहे.
 
मार्केत रिसर्च करणाऱ्या 'कॅनलीस'नुसार शाओमी ही आज जगातील चौथी सर्वात जास्त विक्री करणारी स्मार्टफोन कंपनी आहे. एकूण जागतिक स्मार्टफोन बाजारपेठेत आजच्या घडीला 9.1 टक्के फोन्स शाओमीचे आहेत.
 
भारतासह आशियात मोठ्या प्रमाणावर विक्री केल्यानंतर ही चिनी कंपनी युरोपात झपाट्याने वाढते आहे. 2020 साली जपानमध्ये विस्तार करण्याची शाओमीची योजना आहे.
मिसळणारे पिक्सल्स
आतापर्यंत 100 पेक्षा जास्त मेगापिक्सेलचे सेन्सर साधारणपणे मध्यम आकाराच्या डिजिटल कॅमेरांमध्येच वापरले जात होते. असे कॅमेरे लाखो रुपयांना मिळतात. मात्र या लहानशा स्मार्टफोनमध्ये इतके सारे पिक्सल एकत्र ठासण्याचे दुष्परिणाम असू शकतात.
 
अनेकदा हे पिक्सेल्स एकमेकांत मिसळण्याची शक्यता वाढते. त्यामुळे अनेकदा जो अंतिम "हाय रेझोल्युशन" फोटो असतो, तो फारसा समाधानकारक नसतो.
 
तसंच त्याच निर्धारित जागेच्या सेन्सरमध्ये अनेक पिक्सल्स एकत्र बसवण्यासाठी पिक्सलचा आकार कमी करावा लागतो. यामुळे प्रत्येक पिक्सलला पुरेसा प्रकाश मिळत नाही आणि त्यामुळे कमी उजेडातले (Low light) फोटो धड येत नाहीत.
 
या समस्यांचं निराकरण करतो सॅमसंगचा आयएसओसेल प्लस सेन्सर (Isocell Plus), ज्याचा आकार इतर सेन्सर्सपेक्षा मोठा असतो. त्यात आणखी एक भारी प्रयोग म्हणजे दर चार पिक्सल्सचे गट केले जातात. हा प्रत्येक गट मग फोटो काढताना लाल, हिरवा आणि निळा लाईट फिल्टर करण्यासाठी एकच कलर फिल्टर वापरतो.
 
मग मोठ्या पिक्सेलचं काम एकत्रितपणे करण्यासाठी प्रत्येक गटातील डेटा गोळा करून विलीन केला जातो. अशा प्रकारे 27 मेगापिक्सलचा फोटो दिसून येतो.
 
परंतु पुरेसा प्रकाश असेल तर तुम्ही संपूर्ण 108 मेगापिक्सलचा कॅमेर यथोचित वापरू शकता. त्यासाठीचे मॅन्युअल सेटिंग तुम्ही स्वतः करू शकता.
 
पण यातही समस्या असणारच आहेत.
 
"Mi CC9 Pro Premiumच्या कॅमेऱ्याने काढलेल्या फोटोंमध्ये आम्ही तपासलेल्या अन्य कुठल्याही आघाडीच्या फोनपेक्षा जास्त अतिरिक्त गोष्टी दिसून येत होत्या," असं DXOMark या मोबाईल रिव्ह्यू करणाऱ्या साईटने म्हटलंय. या साईटकडे हा नवा हँडसेट अलीकडेच पाठवण्यात आला होता.
याशिवाय, 108 मेगापिक्सेलचे फोटो काढताना फोनमध्ये मेमरी आणि प्रोसेसिंग पॉवरही नेहमीपेक्षा अधिक लागणार.
 
याशिवाय टेलिफोटो पोर्टेट, वाईड-अँगल लँडस्केप आणि मायक्रो क्लोजअप, असे फोनमध्ये मागच्या बाजूला वेगळे असे कमी रेझोल्युशनचे सेन्सर देण्यात आलेले आहेत, ज्यामुळे DXOMarkनं याला जास्तीचे गुण दिले आहेत.
 
शाओमीनं Mi Mix Alphaमध्ये 108 मेगापिक्सेलचं सेन्सर देण्यात येईल अशी घोषणा केली होती, ती सप्टेंबरमध्ये पूर्ण करण्यात आली. मात्र तो लक्झरी फोन असल्याने त्याची किंमतही 19,999 युआन (साधारण 2 लाख रुपये) इतकी असणार आहे. शिवाय हा फोन डिसेंबरपूर्वी बाजारात उपलब्ध होण्याची शक्यताही नाही.
 
त्यामुळे Mi CC9 Pro आणि Mi Note 10 मध्ये असा भारी कॅमेरा दिल्यामुळे हे फोन इतरांपेक्षा जरा हटके नक्की दिसतील, असं तज्ज्ञांचं मत आहे.
 
"मोबाइल फोन उत्पादक लोकांची मनं जिंकण्यासाठी काहीही करत असतात. हा प्रचंड मेगापिक्सलचा कॅमेरा असाच एक प्रकार आहे," असं CCS इनसाईट कन्सल्टन्सीचे बेन वुड म्हणाले.
 
"तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत सर्वोत्तम फोटो मिळतीलच, याची शाश्वती नाही. पण अनेक ग्राहकांना असंच वाटत असतं की 'बड़ा है तो बेहतर है'," असंही ते म्हणाले. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती