कोरोना लस : Co-WIN अॅप डाऊनलोड करून लसीकरणासाठी नोंदणी कशी करायची?

गुरूवार, 18 मार्च 2021 (17:13 IST)
16 जानेवारीपासून भारतात कोव्हिड 19साठीच्या लसीकरणाला सुरुवात झाली आणि 1 मार्चपासून 60 वर्षांवरील नागरिक आणि सहव्याधी असणारे 45 वर्षांवरील नागरिकांना लस देण्यात येतेय.
पहिल्या टप्प्यामध्ये आरोग्यसेवा कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्सना लस देण्यात आली.
या लसीकरण मोहीमेसाठी को-विन नावाचा डिजीटल प्लॅटफॉर्म विकसित करण्यात आलाय. हा प्लॅटफॉर्म लसीकरण मोहीम राबवणारी यंत्रणा, लस देणारी आरोग्य सेवा आणि लस घेणाऱ्या व्यक्ती या सगळ्यांना वापरता येतो.
 
कोविन (Co-WIN) अॅप काय आहे?
कोव्हिड 19च्या लसीकरण कार्यक्रमावर लक्ष ठेवण्यासाठी यंत्रणेला मदत करणं हे या अॅपचं प्राथमिक उद्दिष्ट असल्याचं भारत सरकारने म्हटलंय. यासोबतच लस घेण्यासाठी या अॅपच्या किंवा को-विन वेबसाईटच्या माध्यमातून नोंदणी करता येते.
कोविन (Co-WIN) हे अॅप म्हणजे कोव्हिड 19साठीची लसीकरण मोहीम राबवण्यासाठीचा डिजीटल प्लॅटफॉर्म आहे. हे मोबाईल अॅप लसीकरणाविषयीची आकडेवारीही नोंदवेल. यासोबतच सगळ्या राज्यातील आणि केंद्रशासित प्रदेशातील आरोग्य कर्मचाऱ्यांचा एक डेटाबेसही हे अॅप तयार करेल.
पण या Co-WIN अॅपच्या नावावरून काहीसा गोंधळ आहे. अधिकृत वेबसाईटवर कोविनचं पूर्ण नाव लिहीण्यात आलंय Co-WIN : Winning over COVID 19. पण भारतीय माध्यमांनी याला कोव्हिड व्हॅक्सन इंटेलिजन्स नेटवर्क असंही म्हटलंय.
 
कोविन (Co-WIN) अॅप कसं डाऊनलोड करता येईल?
कोविन (Co-WIN) अॅप डाऊनलोडसाठी अॅप स्टोअरमध्ये उपलब्ध आहे. आपण डाऊनलोड करत असलेलं अॅप हे भारत सरकारने आणलेलं अॅपच आहे ना, याची खात्री करून मगच ते डाऊनलोड करा. याच नावाची इतर काही फसवी अॅप यापूर्वी आली होती.
 
कोविन (Co-WIN) अॅपवर कोण नोंदणी करू शकतं?
लसीकरणाच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये हे अॅप फक्त सरकारी अधिकाऱ्यांना आणि आरोग्य यंत्रणेला वापरता येत होतं. पण आता मात्र सगळेजण या प्लॅटफॉर्मवर नोंदणी करू शकतात.
यासाठी आधी तुम्हाला https://www.cowin.gov.in/home या वेबसाईटवर जाऊन स्वतःचा मोबाईल नंबर नोंदवावा लागेल. यासाठी तुम्हाला आधार क्रमांक, पॅन क्रमांक वा इतर नोंदणीकृत ओळखपत्राची नोंद करावी लागेल.
यानंतर इथे तुम्हाला एकूण 4 जणांची या एका लॉगिनवर नोंदणी करता येईल.
 
एखाद्या व्यक्तीची नोंदणी करताना त्याचं नाव, जन्म तारीख आणि आधार क्रमांक वा इतर ओळखपत्र ही माहिती भरावी लागेल.
यानंतर तुम्ही लस घेण्यासाठीचा स्लॉट बुक करू शकता.
 
कोविन (Co-WIN) अॅपवर नोंदणी करण्यासाठी कोणती कागदपत्रं लागतील?
नोंदणी करण्यासाठी फोटो असणारं ओळखपत्रं असणं आवश्यक असेल. स्वतःची नोंदणी करताना इलेक्ट्रॉनिक KYC साठी ओळखपत्रं स्कॅन करून जोडावं लागेल. यासाठी 12 ओळखपत्रांचा पर्याय देण्यात आलेला आहे.
 
ही कागदपत्रं वापरता येतील
 
मतदार ओळखपत्र
आधार कार्ड
ड्रायव्हिंग लायसन्स
पॅन कार्ड
मनरेगा रोजगार कार्ड
बँक किंवा पोस्ट ऑफिसचं पासबुक
पासबुक
पेन्शनची कागदपत्रं
नोंदणी करताना जे ओळखपत्रं वापरण्यात आलेलं आहे, तेच ओळखपत्र लस घेण्यासाठी जाताना दाखवावं लागेल. त्यावेळी इतर ओळखपत्रं वापरता येणार नाहीत.
 
लस घेण्यासाठी स्लॉट कसा बुक करायचा?
तुम्ही पोर्टलवर रजिस्टर केलेला मोबाईल नंबर वापरून लॉगिन करा. तुम्हाला या नंबरवर एक OTP - वन टाईम पासवर्ड येईल. तो नंबर घातल्यानंतर तुम्हाला तुम्ही नोंदवलेल्या लोकांची नावं दिसायला लागतील.
या नावांसमोर असणाऱ्या कॅलेंडरच्या खुणेवर क्लिक करून तुम्ही अपॉईंटमेंट घ्यायची आहे.
या खुणेवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला राज्य निवडायचं आहे. त्यानंतर तुमचा जिल्हा, त्यातलं शहर, वॉर्ड वा पिन कोड हे निवडा. यानंतर तुम्हाला तुमच्या जवळच्या लसीकरण केंद्रांची यादी दिसू लागेल.
यामध्ये सरकारी आणि खासगी अशा दोन्ही केंद्रांचा समावेश असेल.
जिथे पैसे भरून लस घ्यावी लागणार आहे, तिथे Paid असं लिहीलेलं असेल.
यातल्या एकेका केंद्रावर क्लिक करून तुम्ही तिथे कोणत्या तारखेचे स्लॉट उपलब्ध आहेत, हे तपासू शकता. त्यातला तुमच्या सोयीचा स्लॉट निवडा आणि नक्की करा.
या अपॉइंटमेंटच्या दिवशी लस घ्यायला जाताना तुम्ही ज्या ओळखपत्राच्या आधारे नोंद केलेली आहे, ते सोबत न्यायला विसरू नका.
लशीचा पहिला डोस घेतल्यानंतर कधी येऊन दुसरा डोस घ्यायचा आहे, ते सांगणारा sms तुम्हाला येईल.
 
कोविन (Co-WIN) अॅप कसं काम करेल?
कोव्हिड 19साठीच्या लसीकरण मोहीमेचं नियोजन, अंमलबजावणी आणि देखरेख या सगळ्यासाठी तयार करण्यात आलेलं हे एक क्लाऊड बेस्ड अॅप आहे. या अॅपच्या माध्यमातून लशीच्या डोसेसचं रिअर टाईम ट्रॅकिंग करता येईल. या अॅपमध्ये असणाऱ्या मॉड्यूल्सच्या मदतीने स्थानिक अधिकाऱ्यांना मोठी आकडेवारी अपलोड करता येईल.
लस घेण्यासाठी या अॅपवरून नोंदणी केल्यानंतर ही नोंदणी करणाऱ्याला SMS मार्फत तारीख, वेळ आणि लसीकरण केंद्राचा तपशील पुरवला जाईल.
प्रत्येक व्यक्तीला लशीचे दोन डोस घ्यावे लागणार असल्याने पहिला डोस घेतल्यानंतर परत कधी येऊन तुम्हाला दुसरा डोस घ्यायचा आहे, याची माहितीही हे अॅप देईल.
लशीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर त्या व्यक्तीला QR कोडच्या स्वरूपातलं सर्टिफिकेट दिलं जाईल.
 
कोविन (Co-WIN) अॅपवरची पाच मॉड्यूल्स काय आहेत आणि कशासाठी आहेत?
कोविन (Co-WIN) अॅपवर - व्यवस्थापन, नोंदणी, लसीकरण, पोचपावती आणि माहिती अशी पाच मॉड्यूल्स असतील. आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सांगितलं, "या मॉड्यूलच्या मदतीने अधिकाऱ्यांना नवीन सेशन तयार करता येईल आणि त्या त्या लसीकरण अधिकारी आणि मॅनेजर्सना याची माहिती मिळेल."
रजिस्ट्रेशन मॉड्यूलद्वारे लोकांना लसीकरणासाठी नोंदणी करता येईल. शिवाय स्थानिक अधिकाऱ्यांनी गोळा केलेला सहव्याधी (Co morbidities) असलेल्या लोकांची माहितीही यावर अपलोड होईल.
हे लसीकरण करणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी 'अॅडमिनिस्ट्रेटर' मॉड्यूल असेल. यामध्ये नागरिकांनी भरलेली माहिती अधिकाऱ्यांना पाहता येईल. त्यानंतर हे अधिकारी लसीकरणासाठीची 'सेशन्स' तयार करतील आणि त्यानुसार ती सेशन्स राबवणारे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आवश्यकत ती माहिती मिळेल.
नोंदणी करणाऱ्या व्यक्तीने पुरवलेल्या माहितीची खातरजमा या अॅपमधल्या वॅक्सिनेशन मॉड्यूलद्वारे अधिकाऱ्यांना करता येईल आणि त्यांना लस दिल्यानंतर या व्यक्तीचा स्टेटसही अपडेट करता येईल.
पोचपावतीसाठीच्या 'बेनिफिशियरी अॅक्नॉलेजमेंट मॉड्यूल' द्वारे QR कोड सर्टिफिकेट जनरेट होतील आणि लस दिल्यानंतर त्याव्यक्तीला तसा SMSही पाठवला जाईल.
तर 'रिपोर्ट' मॉड्यूलच्या मदतीने लसीकरणाच्या सेशन्सची माहिती - किती सेशन्स झाली, किती लोकांना लस दिली आणि कोण आलं नाही ही माहिती अधिकाऱ्यांना नोंदवता येईल.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती