किम जोंग उन: पवित्र डोंगरावर उत्तर कोरियाच्या अध्यक्षांची घोड्यावरून रपेट

गुरूवार, 17 ऑक्टोबर 2019 (16:38 IST)
उत्तर कोरियातील सर्वात उंच आणि पवित्र समजल्या जाणाऱ्या पॅकटू पर्वताला नेते किम जोंग उन यांनी भेट दिली आहे.
 
किम यांनी एका पांढऱ्याशुभ्र घोड्यावर स्वार होऊन बर्फाच्छादित पर्वतावर चढाई केल्याचे फोटो कोरियाच्या केंद्रीय वृत्त संस्थेनं (केसीएनए) प्रसिद्ध केले आहेत.
 
यापूर्वीही किम यांनी 2,750 मीटर उंचीच्या या शिखरावर चढाई केलेली आहे. परंतु मोठ्या घोषणा करण्यापूर्वीची त्यांची ही नेहमीची खेळी असल्याचं विश्लेषकांचं मत आहे.
 
पॅकटू पर्वत दक्षिण कोरियाचं वैशिष्ट्यं आहे, शिवाय किम जोंग उन यांच्या वडिलांचे हे जन्मस्थानही आहे.
 
"घोड्यावर स्वार होऊन पॅकटू पर्वतावर जाणं ही कृती कोरियाच्या क्रांतीच्या इतिहासात अत्यंत महत्त्वाची आहे," असं केसीएनएनं बुधवारी सादर केलेल्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.
 
"घोड्यावर स्वार होऊन पॅकटू पर्वत चढल्यामुळं त्यांच्या संघर्षमय काळाच्या आठवणींना उजाळा मिळतो. सामर्थ्यशील देश उभारणीच्या कार्यात त्यांनी फार मोठा संघर्ष केलेला आहे. या सर्व काळात ते अत्यंत विश्वासानं पॅकटू पर्वतासारखेच अचल राहिले होते."
 
2017मध्ये नव्या वर्षाच्या भाषणात दक्षिण कोरियाबरोबरच्या मुत्सद्दी धोरणांचा उच्चार करण्याआधी काही आठवडे किम या पर्वतावर गेले होते.
 
लोकांचं लक्ष वेधून घेण्यासाठीचं नाट्य?
सर्वात आधी आपण त्या महत्त्वाच्या फोटोंबद्दल बोलू या.
 
कोरिया द्वीपकल्पाच्या सर्वात पवित्र ठिकाणी बर्फावरून दौडत जाणाऱ्या पांढऱ्या घोड्यावर स्वार झालेल्या नेत्याच्या छायाचित्रांप्रमाणे शक्तीप्रदर्शन करणारं दुसरं काहीच असू शकत नाही.किम कुटुंबाचा "पॅकटूच्या वारशा"तून आलेला अधिकार आणि प्राबल्य दाखवून देण्यासाठी हा प्रयत्न करण्यात आला असू शकतो.
 
किम यांचा उत्तर कोरियातल्या नागरिकांना त्यांच्या नेत्याची ताकद दाखवण्याचा आणि घोड्यावरील पराक्रम दर्शवण्याचा हा फारसा चांगला प्रयत्न नाही.
 
सरकारी माध्यमातून सातत्यानं मोठ्या प्रमाणावर वक्तव्य केली जात आहेत, त्यावर आपण नक्की विचार करू शकतो.
 
या प्रकरणातलं आणखी एक वक्तव्य लक्षवेधक आहे. "जगावर हल्ला करण्यासाठी एक धक्कादायक प्रक्रिया राबवली जाईल," असं आम्हाला किम यांच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.
 
यापूर्वी पॅकटूला दिलेल्या भेटीनंतर किम जोंग उन यांनी काही महत्त्वाचे निर्णय जाहीर केले आहेत.
 
मोठी क्षेपणास्त्रं आणि आण्विक शस्त्रांच्या चाचण्या थांबवण्याचं वचन किम यांनी दिलं होतं. यावेळेस त्यांच्या वचनाबद्दल ते कदाचित पुनर्विचार करणार असतील. अमेरिकेबरोबर चालू असलेली बोलणी सध्या थांबली आहेत आणि डोनाल्ड ट्रंप अन्य देशांतर्गत तसंच परराष्ट्रीय व्यवहारांमध्ये व्यस्त आहेत.
 
ट्रंप प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न?
ट्रंप प्रशासनाचं लक्ष वेधून घेण्यासाठी किम यांच्या पर्वत भेटीचा वापर उत्तर कोरियाचे नेते करत असावेत.
 
प्योंगयांग (उत्तर कोरियाची राजधानी)तर्फे या वर्षाच्या शेवटी अण्वस्त्र नष्ट करण्यासंबंधीचा करार केला जाईल, असं सांगण्यात आलं आहे.
 
सध्याचा आण्विक कार्यक्रम मोडीत काढण्यापूर्वी किम यांना सातत्यानं मंजुरी मिळवण्यासाठी बोलावण्यात आलं आहे, परंतु ते या प्रकरणी अमेरिकेची खात्री पटवण्यात अयशस्वी ठरलेले आहेत.
 
कदाचित आणखी काही लाँच करून दबाव वाढवावा असे त्यांना वाटत असावं का? की उत्तर कोरियाच्या नेत्याला पहिल्या बर्फाचा आनंद घ्यायचा होता? या प्रश्नाचं उत्तर येत्या काही महिन्यातच जरुर मिळेल.
 
किम आतापर्यंत तीनवेळा पॅकटूवर गेले आहेत. 2018मध्ये दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून जे-इन यांच्याबरोबरही ते पॅकटू पर्वतावर गेले होते.
 
यापूर्वी किम काळे लेदरचे बूट घालून पेकटूच्या सर्वात वरच्या टोकावर गेले होते. त्याचे फोटो केसीएनएने प्रकाशित केले होते.
 
पॅकटू पर्वत म्हणजे एक जिवंत ज्वालामुखी आहे, तसंच साधारण 4000 वर्षांपूर्वीच्या काळात कोरिया साम्राज्याचे संस्थापक डेंगन यांचे ते जन्मस्थळ असल्याचंही म्हटलं जातं.
 
राजधानी प्योंगयांगपासून हा पर्वत शेकडो किलोमीटर दूर अंतरावर असून, तो उत्तर कोरिया आणि चीन या दोन्ही देशांच्या सीमारेषांवर आहे.
 
जून महिन्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रम्प आणि किम यांची दोन्ही कोरियाच्या सिमेवर प्रदीर्घ भेट झाली होती. यानंतर या महिन्याच्या सुरुवातीस उत्तर कोरियाच्या अधिकाऱ्यांनी स्वीडनमध्ये अमेरिकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
 
उत्तर कोरियाचे आण्विक दूत किम मायोंग जिल यांनी सांगितलं की, आमच्या अपेक्षा पूर्ण न झाल्यानं आम्ही अखेरीस करार मोडला.
 
परंतु अमेरिकेकडून अद्याप 'अपेक्षेप्रमाणे' चर्चा झाली नसल्याचं सांगितलं जात आहे.
 
ही चर्चा होण्यापूर्वी उत्तर कोरियानं नव्या घडणीचं बॅलिस्टिक क्षेपणास्त्र सोडलं. या वर्षातली ही अकरावी चाचणी होती.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती