काश्मीरमध्ये वेगळा PM या विधानावरून मोदींचा ओमर अब्दुलांवर हल्ला

मंगळवार, 2 एप्रिल 2019 (11:46 IST)
जम्मू आणि काश्मीरचा वेगळा पंतप्रधान आणि राष्ट्रपती असेल अशी व्यवस्था आम्हाला पुन्हा एकदा प्रस्थापित करायची आहे, असे जाहीर वक्तव्य करणारे नॅशनल कॉन्फरन्सचे नेते उमर अब्दुल्ला यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जोरदार शब्दांत हल्ला चढवला.
 
'नॅशनल कॉन्फरन्स' हा महागठबंधनच्या सूत्रधारांपैकी एक प्रमुख पक्ष आहे. फारूख अब्दुल्ला आणि उमर अब्दुल्ला यांची खासगी कंपनी असलेल्या या पक्षाला जम्मू-काश्मीरमध्ये वेगळा पंतप्रधान हवा आहे, असं मोदी यांनी नमूद करताना "काँग्रेसच्या मित्रपक्षाची ही मागणी तुम्हाला मान्य आहे का?" असा सवाल मोदींनी सभेत लोकांपुढे मांडला.
 
दुसरीकडे, पंतप्रधांनांचं माझ्या भाषणाकडे एवढं लक्ष असतं, हे पाहून मी भारावून गेलो आहे, असा टोमणा ओमर अब्दुल्ला यांनी मारला.
 
दुसरीकडे मोदी माझ्यासमोर पाच मिनिटेही टिकणार नाहीत, असं विधान खासदार असदुद्दिन ओवेसी यांनी केलं आहे. याविषयीची बातमी महाराष्ट्र टाईम्सने दिली आहे.
 
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकांसाठी पुन्हा एकदा हिंदुत्वाचे कार्ड बाहेर काढलं आहे. त्यांनी आपल्या भाषणात हिंदू-मुस्लीम भाषा वापरणं योग्य नाही," अशी टीका ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे (MIM) अध्यक्ष असदुद्दिन ओवेसी यांनी केली.
 
"संविधान कमजोर करण्याचे सर्वाधिक काम हे गेल्या पाच वर्षांतच झाले आहे. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांना पत्रपरिषद घेऊन देशाचे संविधान आणि लोकशाही वाचविण्याचं आवाहन करावं लागतं, हे देशाचं दुर्भाग्य आहे. अशा परिस्थितीत मोदी द्वेष पसवित आहेत. मोदी दहशतवाद संपविण्याची भाषा करतात. मात्र, नथुराम गोडसे दहशतवादी होता, हे कधीच मान्य करीत नाहीत. सावरकर हेसुद्धा गांधी हत्येत सहभागी होते, असे कपूर आयोगाद्वारे नमूद करण्यात आले आहे. मात्र याबाबत मोदी भाष्य करीत नाहीत. मोदींनी माझ्याशी चर्चा करावी, ते पाच मिनिटेसुद्धा टिकाव धरणार नाहीत," असंही ते पुढे म्हणाले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती