जोकर: बॅटमॅनच्या नकारात्मक नायकाची कहाणी का ठरतेय वादग्रस्त?

बुधवार, 16 ऑक्टोबर 2019 (12:34 IST)
'जोकर' या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा होतेय. एरव्ही जोकर म्हटलं की रंगीबेरंगी पोशाख आणि मेकअप केलेला, अतरंगी चित्ताकर्षक हालचाली करणारा माणूस, असं चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. पण हा जोकर वेगळा आहे आणि बॅटमॅन सीरिजमधल्या 'जोकर' सिनेमामुळे त्याच्यावरून वादाला तोंड फुटलं आहे.
 
तिकीटबारीवर जोकरने चांगला गल्ला जमवला आहे. 24 कोटी 80 लाख डॉलरची कमाई जोकर चित्रपटाने आतापर्यंत केली आहे. DC या कॉमिक्स विश्वातल्या बॅटमनचा शत्रू असलेल्या जोकरची कहाणी या चित्रपटात सांगण्यात आलेली आहे.
 
एखाद्या कहाणीच्या व्हिलनला मुख्य पात्रात दाखवण्याच्या या प्रयोगामुळे सुरक्षा यंत्रणेचं धाबं दणाणलं होतं. या चित्रपटाच्या रिलीजच्या वेळी गोळीबार होऊ शकतो, असा अलर्ट लष्कराने दिला होता. म्हणूनच सगळीकडे कडेकोट सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली होती. सुदैवाने रिलीजच्या दिवशी कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही.
 
सात वर्षांपूर्वी दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलन यांच्या 'बॅटमॅन' मालिकेतील शेवटचा भाग 'द डार्क नाईट रायझेस' या चित्रपटाच्या शोदरम्यान कोलारॅडोमधल्या ऑरोरामध्ये एका व्यक्तीने गोळीबार केला होता. त्यात 12 जणांचा मृत्यू झाला होता तर 70जण जखमी झाले होते.
 
त्यामुळे जोकर चित्रपट ऑरोरामधील थिएटर्समध्ये प्रदर्शित करण्यात आलेला नाही. पीडितांच्या कुटुंबीयांच्या इच्छेचा मान ठेवत इथे चित्रपट प्रदर्शित करण्यात आलेला नाही.
 
त्यावेळी गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या तसंच जखमींच्या नातेवाईकांनी वॉर्नर ब्रदर्स या कंपनीला पत्रही लिहिलं होतं. पीडितांसाठी काम करणाऱ्या संस्थांना मदत करण्याचं आवाहन केलं होतं. अमेरिकेतील शस्त्रास्त्र बाळगण्याबद्दलचे कायदे कडक करण्याविरुद्ध मतदान करणाऱ्या राजकीय नेत्यांना तसंच पक्षांना देणगी न देण्याचं आवाहन पीडितांच्या कुटुंबीयांनी केलं होतं.
आम्हाला सुरक्षित जगण्याची हमी देणाऱ्या कॉर्पोरेट नेत्यांना पाठिंबा देण्याचं आवाहन केल्याचं अमेरिकन मॅगझिन 'द हॉलिवुड रिर्पोटर'ने म्हटलं आहे.
 
हा चित्रपट त्यांना जेम्स होम्सची आठवण करून देतो. जेम्स होम्सने निरपराध व्यक्तींवर गोळीबार करून त्यांचा जीव घेतला होता. त्यासाठी त्याला आजीवन कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती.
 
गोळीबारात 24 वर्षांची तरुण मुलगी गमावणाऱ्या सँडी फिलिप्स यांनी 'हॉलिवुड रिर्पोटर'ला सांगितलं की, "मी जोकर चित्रपटाचा प्रोमो पाहताक्षणी मला त्या नरसंहार करणाऱ्या माणसाची आठवण झाली."
 
सुपरहिरो श्रेणीतील चित्रपट पाहण्यासाठी अशा स्वरूपाची उपकरणं परिधान करून चित्रपट पाहणं नित्याचं झालं आहे. मात्र हा चित्रपट बघण्यासाठी मास्क, फेसपेंट किंवा विशिष्ट प्रकारचे कपडे परिधान करून येणाऱ्या व्यक्तींना चित्रपटगृहात प्रवेश दिला जाणार नाही, असं अमेरिकेतील अनेक चित्रपटगृहांनी आधीच स्पष्ट केलं होतं.
 
एकप्रकारची भीती
जोकर सिनेमात मानसिक आजाराने त्रस्त कॉमेडियन ऑर्थर फ्लेकची गोष्ट आहे. व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यातल्या आघातांमुळे ऑर्थर गुन्हेगारीकडे ओढला जातो.
 
चित्रपटातील हिंसक दृश्यं अंगावर काटा आणणारी आहेत. दिग्दर्शक टॉड फिलीप्स यांनी ऑर्थर फ्लेकच्या पात्राचं उदात्तीकरण केल्याचा आरोप सिनेसमीक्षकांनी केला आहे.
 
'व्हॅनिटी फेयर' मॅगझिनचे रिचर्ड लॉसन यांच्यानुसार "हा चित्रपट एखाद्याच्या अतिमहत्त्वाकांक्षी किंवा बेजबाबदार असण्याचा प्रचार वाटू शकते."
 
"जोकरचं आयुष्य सगळ्यांनी साजरं करावं असं आहे की भयावह आहे? या दोघांमध्ये काही फरक आहे की नाही?" असा सवाल लॉसन करतात.
 
हा चित्रपट हिंसाचाराचं उद्दातीकरण करतो, असं दिग्दर्शक टॉड फिलिप्स आणि मुख्य अभिनेता जोक्विन फिनिक्स यांना वाटत नाही. चित्रपटाशी संबंधित वादाने हैराण झाल्याचं फिलिप्स यांनी सांगितलं.
 
"प्रेमाचा अभाव, लहानपणी आलेले वाईट अनुभव, जगात अनुकंपेची कमतरता, या मुद्द्यांवर हा चित्रपट भर देतो. प्रेक्षक हा संदेश समजून घेतील, अशी अपेक्षा आहे. माझ्यासाठी कलेचा अर्थ गुंतागुंत आहे. तुम्हाला सोपी कला हवी असेल तर तुम्ही कॅलिग्राफीकडे वळू शकता," असं ते म्हणाले.
 
फीनिक्स यांचं काय म्हणणं?
एंटरटेनमेंट न्यूज वेबसाईट 'द रॅप'ला दिलेल्या मुलाखतीत फिलिप्स यांनी वादासाठी डाव्या विचारसरणीच्या लोकांना कारणीभूत ठरवलं. हा चित्रपट हिंसेला खतपाणी घालतो का, या प्रश्नावर मुख्य अभिनेता फिनिक्स मुलाखत सोडून निघून गेला होता.
 
"अजेंड्यानुसार डाव्या विचारसरणीच्या लोकांप्रमाणे बोलू लागले आहेत. हे माझ्यासाठी डोळे उघडवणारं होतं. लोक गाण्यांचा अर्थ चुकीचा करून घेतात. योग्य काय चुकीचं काय, हे सांगणं चित्रपट निर्मात्यांची जबाबदारी आहे. या चित्रपटाने जो त्रास होतोय, त्याची मी मजा घेतोय," असं फिनिक्सने सांगितलं.
 
"एखादा चित्रपट तुम्हाला अस्वस्थ करतो, वेगळा विचार करायला भाग पाडतो तेव्हा ती कलाकृती चांगली झाली आहे, असं मला वाटतं. मला याचा आनंद आहे. हा चित्रपट करणं आव्हानात्मक असेल याची मला जाणीव होती," असंही तो पुढे म्हणाला.
 
खलनायकाप्रती आकर्षण
चित्रपटासाठी करण्यात आलेल्या कास्टिंगने वादविवाद सुरू झाला आहे. आपल्या कामाप्रति संवेदनशील अभिनेता, अशी फिनिक्सची ओळख आहे. चित्रपटात लोकप्रिय सुपरव्हिलन म्हणून त्याने चांगलं काम केलंय, असा एकंदरीत सूर आहे.
 
जोकर किंवा 'स्टार वॉर्स'मधला अँटिहिरो डार्थ वेडर प्रमाणे खलनायकांप्रति वाटणाऱ्या आकर्षणाने या वादाला नवा मुद्दा मिळाला आहे.
 
KOA रेडिओस्टेशनशी बोलताना मानसोपचारतज्ज्ञ ट्रॅव्हिस लैँगली यांनी सांगितलं की, "खलनायक आवडणं हा विचार आम्ही समजू शकतो. आपण प्रत्येकजण काही गोष्टींनी बांधलेलो असतो. काही मर्यादा आपल्यावर असतात. त्या नसतील तर आपण काय करू याचा विचार व्हायला हवा."
 
अशा प्रकारच्या गोष्टी खलनायकाभोवती केंद्रित असतात, कारण हिरोची भूमिका खलनायकाला प्रत्युत्तर देणं ही असते. आधीच्या चित्रपटांमध्ये खलनायकाची जी नकारात्मक लोकप्रियता असायची, त्यात जोकरमुळे काही फारसा बदल झालेला दिसत नाही.
 
'द डार्क नाईट' या 2008 मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटात जोकरचं पात्र रंगवणाऱ्या हीथ लेजर या अभिनेत्याचा औषधांच्या ओव्हरडोस मृत्यू झाला होता. लेजर यांनी या चित्रपटात उत्कृष्ट काम केलं होतं, म्हणूनच त्यांना त्या वर्षीचा बेस्ट सर्पोटिंग अॅक्टरचा ऑस्कर मरणोत्तर देण्यात आला होता. सुपरहिरो श्रेणीतील चित्रपटांसाठी हा एक खास गौरव होता. मात्र त्यांच्या मृत्यूनंतर अशा अफवा पसरल्या होत्या की लेजर स्वत:च्या भूमिकेने घाबरले होते, अस्वस्थ झाले होते.
 
1989 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'बॅटमॅन'मध्ये जोकरची भूमिका साकारणारे जॅक निकल्सन यांनी या विषयावर केलेले्या एका टिप्पणीनंतर या अफवांना आणखी ऊत आला होता. लेजर यांच्या मृत्यूनंतर निकल्सन म्हणाले होते की "मी त्याला इशारा दिला होता."
 
त्यानंतर वॉर्नर ब्रदर्स कंपनीला स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं, की "कोणतीही चूक करू नका. काल्पनिक जोकर किंवा हा चित्रपट, कुणीही खऱ्या जगात हिंसेचं समर्थन करत नाही."
मानसिक आरोग्याचं चुकीचं चित्रण?
 
ज्या पद्धधतीने चित्रपटात मानसिक आरोग्यासंदर्भात चित्रण केलं आहे, त्याबाबत मानसोपचार क्षेत्रातील मंडळींनी आवाज उठवला आहे. मानसिक आजारांचं चित्रण हॉलिवुडपटांमध्ये कसं केलं जातं, यावरून अनेकदा चर्चा आणि वाद रंगले आहेत.
 
मानसिक आरोग्याशी संलग्न भेदभावाच्या भावनेविरोधात काम करणाऱ्या ब्रिटिश चॅरिटी 'टाईम टू चेंज'च्या मते मानसिक आरोग्याशी निगडित रुढी, परंपरा, कर्मठ विचारांमुळे दृष्टिकोनात बदल घडत नाही.
 
या चॅरिटीच्या संपर्क प्रमुख जुली इव्हान्स यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं, "मनोरुग्ण वाईट असतात असं चित्रपटात दाखवण्याच्या पद्धतीत बदल झाला आहे. मात्र त्यांना चुकीच्या पद्धतीने दाखवण्याचा इतिहास खूप जुना आहे. त्यांना अतिरंजित पद्धतीने दाखवण्यात येतं. प्रेक्षकांना चुकीची माहिती दिली जाते."
 
ईस्ट एंजिला विद्यापीठात फिल्म स्टडीजचे प्राध्यापक टीम स्नेलसन सिनेमा आणि मानसिक आरोग्य, या दोन विषयांवर एकत्रितपणे काम करत आहेत.
 
हॉलिवुड चित्रपटात मानसिक आरोग्य आणि हिंसा यांना एकत्र सांधून मिथक म्हणून दाखवलं जातं. मनोरुग्ण कटू अनुभवांमुळे या स्थितीत पोहोचला असेल, तरीही चित्रण वेगळं असतं.
 
जोकर चित्रपटाचा ट्रेलर बघून या चित्रपटात काहीतरी वेगळं असेल, असं वाटतं. मानसिक आजारांनी त्रस्त व्यक्तींचं चित्रण कसं होतं, यावर जोकर चित्रपटाच्या निमित्ताने चर्चा सुरू झाली आहे.
 
तिकीटबारीवर जोकर चित्रपटाची कामगिरी चांगली आहे. चित्रपटाचं समीक्षण करणाऱ्या 'रॉटन टोमॅटोज' साईटने चित्रपटाला चांगलं रेटिंग दिलं आहे. 'व्हेनिस फिल्म फेस्टिव्हल'मध्ये जोकरला पुरस्कारांनी गौरवण्यात आलं. जोकर चित्रपटाच्या स्क्रीनिंगला आठ मिनिटांचं स्टँडिंग ओव्हेशन मिळालं होतं.
 
तुम्ही हा सिनेमा पाहिलाय का? जोकरच्या पात्राचा तुमच्यावर कसा परिणाम झाला?

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती