देवेंद्र फडणवीस यांनी उल्लेखलेली 'अखंड भारत' ही संकल्पना भाजपची अधिकृत भूमिका आहे का?

बुधवार, 25 नोव्हेंबर 2020 (15:37 IST)
दीपाली जगताप
"आमचा अखंड भारतावर विश्वास आहे. एक दिवस कराचीसुद्धा भारतात असेल," असे विधान माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. तसेच 'लव्ह-जिहाद'विरोधी कायद्याचेही त्यांनी समर्थन केले आहे.
 
मुंबईत काही स्वीट मार्ट्स दुकानांचे नाव कराची असण्यावरून शिवसेनेचे नेते नितीन नांदगावकर यांनी आक्षेप घेतला. यासंदर्भात प्रश्न विचारला असता देवेंद्र फडणवीस यांनी आपला 'अखंड भारत' संकल्पनेवर पूर्ण विश्वास असल्याचे म्हटले आहे.
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कायम 'अखंड भारत' ही संकल्पना जाहीरपणे मांडली आहे. भारतीय जनता पार्टीकडून मात्र जाहीरपणे याचा उल्लेख केला जात नाही. पण भाजपच्या अनेक नेत्यांनी 'अखंड भारत' संकल्पनेच्या समर्थनार्थ प्रतिक्रिया दिल्या आहेत.
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसरे सरसंघचालक एम.एस गोळवलकर यांनी आपले पुस्तक 'बंच ऑफ थॉट्स'मध्ये विस्तृत भारताचा उल्लेख करताना अखंड भारताची संकल्पना मांडली आहे. त्यानुसार, भारतासह पाकिस्तान, अफगाणिस्तान, इराण, काबूल, बर्मा आणि दक्षिणेकडील श्रीलंकेपर्यंत भागांचा अखंड भारतात समावेश आहे.
 
भाजप नेत्यांची वक्तव्य
भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 'अखंड भारत' संकल्पनेवर विश्वास दर्शवणारे देवेंद्र फडणवीस एकमेव नेते नाहीत.
 
2015 मध्ये भाजपचे महासचिव राम माधव यांनी 'अल जजिरा' या आंतरराष्ट्रीय चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत पुन्हा एकदा 'अखंड भारत' निर्माण होईल असे म्हटले होते.
 
ते म्हणाले, "राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला (आरएसएस) पूर्ण विश्वास आहे की, 60 वर्षांपूर्वी ऐतिहासिक कारणांमुळे वेगळे झालेले हे प्रदेश जनभावनेच्या आधारावर पुन्हा एक होतील आणि अखंड भारताची निर्मिती करतील." क्विंटने 27 डिसेंबर 2015 रोजी ही बातमी प्रसिद्ध केली आहे.
 
हा विचार पक्षाचा नसून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सदस्य म्हणून मांडतो आहे असंही त्यांनी स्पष्ट केले. "याचा अर्थ आम्ही युद्ध करू किंवा जमीन ताब्यात घेऊ असे नाही तर जनभावनेच्या आधारावर लोक एकत्र येतील असे आमचे म्हणणे आहे."
 
17 मार्च 2019 रोजी आरएसएसचे वरिष्ठ प्रचारक इंद्रेश कुमार यांनी पाकिस्तान भारताचा भाग बनेल असे विधान केले होते. मुंबईत एका कार्यक्रमात भाषण देत असताना त्यांनी हे वक्तव्य केले.
 
ते म्हणाले, "पाच ते सात वर्षांनंतर तुम्हाला कराची, लाहोर, रावळपिंडी आणि सियालकोटमध्ये घर खरेदी करण्याची आणि व्यवसाय करण्याची संधी मिळेल. 1947 च्या आधी पाकिस्तान नव्हते. 2025 नंतर तो पुन्हा हिंदुस्थानाचा भाग बनेल."
 
भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितले, "आमच्या दृष्टीकोनातून काही प्रश्न मतदानाचे नसतात. आस्थेचे आणि विश्वासाचे असतात. संघ परिवारातले घटक सांस्कृतिक राष्ट्रवाद मांडतात. हा विषयही आमच्यासाठी आस्थेचा विषय आहे."
 
केंद्रातील भाजप सरकारची वाटचाल 'अखंड भारता'च्या दिशेने?
भाजपच्या अनेक नेत्यांनी 'अखंड भारताच्या' संकल्पनेचे जाहीरपणे समर्थन केले आहे. केंद्रात भाजपचे सरकार आल्यानंतरही नेत्यांकडून अनेकदा 'अखंड भारता'चा नारा देण्यात आला.
 
केंद्र सरकारने जम्मू आणि काश्मिरमधून कलम 370 हटवल्यानंतर भाजपच्या अनेक नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आण गृहमंत्री अमित शहा यांनी अखंड भारताचे स्वप्न पूर्ण केले अशा शब्दात त्यांचे अभिनंदन केले होते.
 
भाजपचे सरचिटणीस राम माधव यांनीही अखंड भारताच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकल्याची प्रतिक्रिया दिली. आता पुढील लक्ष्य पाकव्याप्त काश्मिर असेल असंही ते म्हणाले. विज्ञान भवनातील छात्र संसदेच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
 
चाळीसगावचे खासदार उन्मेश पाटील यांनी, एक देश, एक संविधान हा अखंड भारताचा संकल्प आज पूर्ण झाला असून वीर सावरकर, हेडगेवार, गोलवळकर, शामाप्रसाद मुखर्जी यांचा आत्मा आज सुखावला असेल अशी प्रतिक्रिया दिली होती.
 
तेव्हा भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेली भूमिका भाजपची अधिकृत भूमिका आहे का? केंद्र सरकारचे याबाबत काय मत आहे? हे जाणून घेणेही महत्त्वाचे आहे.
 
यासंदर्भात भाजपचे ज्येष्ठ नेते विनय सहस्रबुद्धे बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले, "देवेंद्र फडणवीस यांनी एखाद्या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. एका छोट्या घटनेवर किती बोलणार, मला यासंदर्भात प्रतिक्रिया द्यायची नाही."असं म्हणत त्यांनी अखंड भारताविषयी भाजपच्या भूमिकेवर बोलण्यास नकार दिला.
 
यासंदर्भात बोलताना ज्येष्ठ पत्रकार राजू परूळेकर यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितले, "भारताच्या जवळील सर्वच प्रांतांनी एकत्र यायला हवे पण ते प्रेमाने होणे अपेक्षित आहे. तुम्ही बळाने किंवा दादागिरी करून कसे एकत्र येणार? आपले शेजारिल राष्ट्र आपल्यापासून दूर जात आहेत."
 
"द्विराष्ट्राची संकल्पना सावरकरांना मान्य होती. मग ती भाजपला मान्य आहे का? तेव्हा एक ठरवा की सावरकरांना मानायचे की कराचीला आपले मानायचे? त्यामुळे इथे भाजपची दुटप्पी विचारसरणी दिसते.
 
"त्यामुळे भाजपची ही विधानं त्यांच्या आक्रमक अहंकाराला सुलभ अशी विधानं आहेत. त्याला प्रेमाचा आधार नाही. प्रेम असेल तर जग आपल्या पायाशी असेल. यासाठी तलवारी काढायची गरज नाही. आपण सैन्य पाठवून काश्मिरला आपलेसे करू शकत नाही," असे मत राजू परूळेकर यांनी व्यक्त केले.
 
'अखंड भारत' हिंदुराष्ट्र असेल का? - सुधींद्र कुलकर्णी
देवेंद्र फडणवीस यांच्या अखंड भारत या वक्तव्यावर राजकीय विश्लेषक सुधींद्र कुलकर्णी यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
 
बीबीसीशी बोलताना सुधींद्र कुलकर्णी म्हणाले, "भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीला आणि स्वतंत्र्याला 73 वर्षं उलटल्यानंतर आता अखंड भारताची कल्पना अव्यावहारिक आहे. दुसरा मुद्दा म्हणजे देवेंद्र फडणवीसांना माझा प्रश्न आहे की, अखंड भारत हिंदुराष्ट्र असेल का? याचे उत्तर त्यांनी दिले पाहिजे."
 
ते पुढे सांगतात, "1947 नंतर भारतात राहणारे मुस्लिम बांधव हिंदुराष्ट्र ही संकल्पना मानत नाही. भारतीय राज्यघटना हिंदुराष्ट्र संकल्पना मानत नाही. बहुसंख्य हिंदूसुद्धा हिंदूराष्ट्र संकल्पनेचे समर्थक नाहीत. मग पाकिस्तान आणि बांग्लादेश दोन्ही देशांत जवळजवळ 40 ते 45 कोटी मुसलमान आहेत. तेव्हा देवेंद्र फडणवीसांनी याचे उत्तर द्यावे की जेव्हा कधी अखंड भारत होईल तेव्हा तो भारत हिंदूराष्ट्र असेल का?" असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
 
"कुठलाही प्रदेश आमचा आहे असे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा तिथल्या लोकांबद्दल आपल्याला प्रेम, काळजी, मातृभाव, बंधुत्व आहे अशी कल्पना असते. पाकिस्तानबद्दल प्रेम आहे अशी प्रतिक्रिया भाजपच्या कोणत्या नेत्याने आतापर्यंत दिली आहे. 'पीओके घेऊ' याचा अर्थ आक्रमण करू आणि ताबा मिळवू असा होतो. तर कराची आणि पाकिस्तानचाही असाच अर्थ होतो ना? म्हणून अव्यवहार्य तर आहेच पण ही एक घातक संकल्पना आहे. त्यांची भाषा आणि वागणूक आक्रमणकारी आहे," असा आरोपही सुधींद्र कुलकर्णी यांनी केला आहे.
 
या विषयाचा उगम मुंबईतील कराची बेकरीपासून झाला. याविषयी बोलताना ते सांगतात, " मी पुष्कळदा कराचीला गेलो आहे. तिथेही मुंबई, बॉम्बेच्या नावाने दुकानं आहेत. मुंबई आणि कराचीचे अगदी जवळचे नाते होते. 1965 पर्यंत फाळणीनंतर कराची आणि मुंबईला येणे जाणे सुलभ होते. संस्कृती, आर्किटेक्चर यातही समानता आहे. आपण जर प्रेमाने दोन्ही देशांनी संबंध ठेवले तर दोन चांगले शेजारील देश म्हणून राहू शकतो. पण त्याला अखंड भारत म्हणता येणार नाही."
 
'अखंड भारताची' संकल्पना
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, अखिल भारतीय महासभा, विश्व हिंदू परिषद अशा हिंदुत्ववादी संघटनांकडून अखंड भारताच्या निर्मितीबाबत वक्तव्य करण्यात येतात.
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून दरवर्षी 14 ऑगस्टला म्हणजेच स्वातंत्र्यादिनाच्या एकदिवस आधी अखंड भारत संकल्प दिवस साजरा केला जातो.
 
देवेंद्र फडणवीस, राम माधव यांच्यासारख्या भाजप नेत्यांकडून येणारी 'अखंड भारता'संदर्भातील विधानं ही आरएसएसच्या विचारसरणीतून येतात अशी टीका केली जाते.
 
1953 साली जनसंघाच्या अखिल भारतीय महासभेनेही अखंड भारताच्या संकल्पनेवर आमचा विश्वास असल्याची घोषणा केली. याची पूर्तता करण्यासाठी प्रयत्न करू असा आम्ही संकल्प करतो असंही महासभेने जाहीर केले होते.
 
1983 मध्ये विश्व हिंदू परिषदेने एकात्मता यात्रा काठमांडूपासून सुरू केली होती.
 
2012 मध्ये झालेल्या लोकसत्ता आयडिया एक्सचेंज या कार्यक्रमात बोलताना सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले, "आम्ही ज्याला अखंड भारत म्हणतो किंवा भौगोलिकदृष्ट्या 'इंडोइरानीयन प्लेट' बोलल्या जाणाऱ्या क्षेत्रातील लोकांचे डीएनए समान आहेत. याला आम्ही हिंदुत्वाचे लक्षण समजतो."
 
तर संघाचे मुखपत्र ऑर्गनायझरमध्ये सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले की, "अखंड भारत किंवा संपूर्ण समाजच खरी स्वतंत्रता आणू शकतात. वर्तमान परिस्थितीमध्ये अखंड भारतासंबंधी बोलताना ही केवळ एक कल्पना असून प्रत्यक्षात हे शक्य आहे असे वाटत नाही असेच म्हणू शकतो."

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती