उत्तर आणि पूर्व मुंबई कोरोनाचा नवा 'हॉटस्पॉट' बनत चाललीये का?

मंगळवार, 2 जून 2020 (14:35 IST)
मयांक भागवत

मुंबईत सुरुवातीला कोरोना व्हायरस वाऱ्यासारखा पसरला तो दक्षिण आणि मध्य मुंबईत. वरळी-कोळीवाडा, धारावीत पाहता पाहता कोरोनाबाधितांची संख्या हजारावर पोहोचली. दाटवस्ती आणि झोपडपट्टीचा भाग असल्याने मुंबई महापालिकेने या भागावर आपलं संपूर्ण लक्ष केंद्रित केलं. पण त्यामुळे उत्तर आणि पूर्व मुंबईकडे दुर्लक्ष झालं का?
 
कारण मुंबईच्या उत्तर आणि पूर्व उपनगरातील काही भागात गेल्या सात दिवसात कोव्हिड-19 रुग्णांची संख्या सहा ते सात टक्क्यांपर्यंत वाढली आहे. त्यामुळे एक मोठा प्रश्न उपस्थित होतो - उत्तर आणि पूर्व मुंबई कोरोनाचा नवा हॉटस्पॉट बनत चाललीये का?
 
उपनगरातील कोरोनाबाधितांच्या वाढत्या आकड्यांकडे पाहता लक्षात येईल...
 
उत्तर मुंबईतील रुग्णसंख्येत झालेली वाढ
 
RN (आर नॉर्थ) वॉर्डमध्ये कोव्हिड-19 रुग्णांच्या संख्येत 7.5 टक्के वाढ
PN (पी नॉर्थ) मध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या 7 टक्क्यांनी वाढली
RC (आर सेंट्रल) 6.1 टक्क्यांनी रुग्ण वाढले
पूर्व कोव्हिड-19 रुग्णांच्या संख्येत झालेली वाढ
 
S (एस) वॉर्डमध्ये 6.8 टक्क्यांनी कोव्हिड रुग्णांमध्ये वाढ
N (एन) वॉर्डमध्ये कोरोनाबाधितांची संख्या 6.1 टक्क्यांनी वाढली
(स्रोत- मुंबई महापालिका)
 
मुंबई उपनगरात अचानक कोव्हिड रुग्णांची संख्या वाढण्याची कारणं काय, याचा आढावा घेण्याचा आम्ही प्रयत्न केला.
 
विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर उत्तर मुंबईतील दहिसर परिसरात राहतात. दहिसर पूर्व भागात कोरोनाग्रस्तांच्या वाढत्या संख्येबाबत बोलताना दरेकरांनी म्हटलं, "गेल्या काही दिवसांपासून उत्तर मुंबईत कोव्हिड रुग्णांची संख्या अचानक वाढलीये. याचं कारण महापालिकेने या भागाकडे केलेलं दुर्लक्ष. कोव्हिड रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती आणि कुटुंबीयांची तपासणी झाली नाही. या भागात मोठ्या संख्येने झोपडपट्या आहेत. याकडे पालिकेने हवं तसं लक्ष दिलं नाही. क्वारंटाईन सेंटरमध्ये कोव्हिड-19 रुग्णांसोबत संशयित रुग्णांनाही ठेवलं जातंय. त्यामुळे लोकांमध्ये संसर्ग वाढतोय. या कोरोनाग्रस्तांची संख्या वाढण्याचं प्रमुख कारण आहे."
 
मुंबई महापालिकेच्या माहितीनुसार, RN (आर नॉर्थ) वॉर्डमध्ये सध्या 438 कोरोनाग्रस्त असून 112 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे. RC (आर सेंट्रल) मध्ये 864 कोरोनाबाधित रुग्ण असून 196 रुग्णांना डिस्चार्ज मिळालाय. PN (पी नॉर्थ) मध्ये 1426 व्यक्ती कोरोनाग्रस्त असून 438 रुग्णांना घरी सोडण्यात आलं आहे.
 
आर नॉर्थ आणि आर सेंट्रल या परिसरात कोव्हिड रुग्णांची संख्या कमी दिसत असली तरी, मागील सात दिवसात दक्षिण आणि मध्य मुंबईच्या तूलनेत या भागात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय.
 
दहिसर भागातील शिवसेना 
 
दहिसर भागातील शिवसेना नगरसेविका शीतल म्हात्रेंनी बीबीसीशी बोलताना सांगितलं, "बोरीवली, दहिसर भागात मागील काही दिवसांपासून कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झालीये. याचं प्रमुख कारण म्हणजे लोकांमध्ये लॉकडाऊनबाबत फारसं गांभीर्य नाही. लोक मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर फिरतायत, पोलिसांकडून लॉकडाऊनची प्रभावी अंमलबजावणी झाली नाही.
 
"उत्तर मुंबईच्या भागात मोठ्या झोपडपट्ट्या आहेत. यात मोठ्या संख्येने मजूर वर्ग राहतो. लॉकडाऊनमुळे मजूर अस्थिर झाले, मोठ्या संख्येने रस्त्यांवर आले. योग्य पद्धतीने सोशल डिस्टन्सिंग पाळलं गेलं नाही, त्यामुळे झोपडपट्टीत व्हायरसचा शिरकाव झाला आणि मोठ्या संख्येने व्हायरस पसरला," असं म्हात्रेंनी म्हटलं.
 
वॉर्डनिहाय मोठ्या झोपडपट्ट्या
 
RN (आर नॉर्थ) - काजूपाडा, गणपत पाटील नगर, केतकीपाडा
RC (आर सेंट्रल) - देवीपाडा
PN (पी नॉर्थ) - मालवणी
'उत्तर, पूर्व मुंबईकडे दुर्लक्ष झालं'
धारावी, दादर आणि माहिम या परिसरात कोरोनाबाधितांच्या संख्येने 3 हजारचा टप्पा पार केलाय. मात्र, या भागात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढण्याचा दर 3 टक्के आहे. तर, युवासेना अध्यक्ष आणि मंत्री आदित्य ठाकरेंच्या वरळी आणि प्रभादेवी भागात 2210 कोरोनाबाधित असून, वाढीचा दर 2.6 टक्के इतका आहे.
 
पण राष्ट्रीय प्रसारमाध्यमांमध्ये धारावीमध्ये कोरोना घुसणं, हा कायमच चर्चेचा मुद्दा राहिला आहे. 'आशियातला सर्वांत मोठ्या झोपडपट्टी' अशी ओळख मिरवणाऱ्या या भागात कोरोनाविरोधातील लढाईत मुंबईत प्रशासनाने पूर्ण लक्ष केंद्रित केलं होतं, महापालिकेची संपूर्ण मशिनरी या भागात उतरवण्यात आली होती.
 
पण खरंच त्यामुळे उत्तर मुंबईकडे दुर्लक्ष झालं का? याबाबत नाव न घेण्याच्या अटीवर शिवसेनेच्या स्थानिक कार्यकर्त्याने सांगितलं, "मुंबईत कोरोनाची साथ पसरल्यापासून मुंबई महापालिकेचं संपूर्ण लक्ष धारावी, वरळी कोळवाडा या परिसराकडे होतं. महापालिकेने उत्तर मुंबईकडे फारसं लक्ष दिलं नाही. नेते वा अधिकारी, कुणीच या परिसराकडे पाहिलं नाही. लक्ष फक्त मुंबई शहर आणि मध्य मुंबईकडे देण्यात आलं."
 
हा स्थानिक कार्यकर्ता पुढे म्हणतो, "दहिसर, मागाठाणे, बोरीवली या परिसरात मोठ्या झोपडपट्या आहेत. लाखोंच्या संख्येने लोकं इथे राहतात. तरीही तपासणीसाठी मोबाईल व्हॅन्स आल्या नाहीत. आम्ही वारंवार मागणी केली, अधिकाऱ्यांशी चर्चा केली. मात्र आमच्या भागात वेळेवर उपाययोजना झाल्या नाहीत."
 
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे स्थानिक नेते नयन कदम यांनीही हाच आरोप केलाय. बीबीसीशी बोलताना नयन यांनी म्हटलं, "दक्षिण मुंबई ऑर्गनाइज्ड आहे. मात्र उत्तर मुंबईत तशी परिस्थिती नाही. प्रशासनाचं दुर्लक्ष, लोकांसमोर हतबल झालेलं पोलीस प्रशासन, ही देखील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढण्याची प्रमुख कारणं आहेत."
 
तर सामाजिक कार्यकर्ते अनिल गलगली म्हणतात, "धारावी, वरळी या भागात प्रशासनाने संपूर्ण टीम उतरवली. मात्र, पूर्व मुंबईच्या झोपडपट्टीत असं काहीच झालं नाही. वरळी, धारावीला स्पेशल अटेन्शन देण्यात आलं. प्रशासनाने उपाययोजना केल्या, चांगली गोष्ट. पण झोपडपट्यातील भागात असं का झालं नाही? भांडुप, कांजूरमार्ग या भागात 50 टक्के झोपडपट्या आहेत. गावठाणाचा भाग आहे. असं असूनही पालिकेने का लक्ष दिलं नाही?"
 
RN (आर नॉर्थ) वॉर्डचा परिसर- दहिसर, अशोकवन, कांडापाडा
 
RC (आर सेंट्रल)- गोराई, एमएचबी, बोरीवली पश्चिम, कस्तुरबा पोलीस स्टेशनची हद्द
PN (पी नॉर्थ)- मालवणी, मालाड, कुरार, दिंडोशी
नयन पुढे म्हणतात, "पण फक्त प्रशासनावर दोष टाकून फायदा नाही. रस्त्यावर सुट्टी मिळाल्यासारखे सुसाट फिरणारी 15 ते 30 वर्षं वयोगटातील तरुणदेखील याला जबाबदार आहेत. बाईक घेवून बाहेर फिरणं, पोलिसांचं न ऐकणं, यामुळेही केसेस वाढल्या आहेत."
 
गेल्या अनेक वर्षांपासून दहिसरमध्ये आरोग्यसेवा देणारे डॉ. संजय वाणी सांगतात, "लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या काळात लोकांनी काळजी घेतली. मात्र गेल्या 15 दिवसांपासून लोकं मोठ्या संख्यने रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. आपल्या भागात जास्त रुग्ण नाहीत, आपल्याला काहीच होणार नाही असा लोकांचा गैरसमज आहे. त्यामुळे लोकांनी आता दुर्लक्ष करणं सुरू केलंय. या निष्काळजीपणामुळे या भागातील कोरोनाग्रस्तांची संख्या अचानक वाढलीये.
 
"आधी कोव्हिडग्रस्त रुग्णांची संख्या कमी होती. मात्र आता रोज एक-दोन रुग्ण तपासणीसाठी येत आहेत. झोपडपट्टीत जास्त रुग्ण आढळून येत आहेत. पालिका प्रशासनाने या झोपडपट्यांकडे वेळीच लक्ष द्यावं. योग्य उपाययोजना केल्यानाहीत तर, परिस्थिती आटोक्यात येणार नाही," असं डॉ. वाणी म्हणाले.
 
उत्तर मुंबई प्रमाणेच, पूर्व उपनगरातील एन आणि एस वॉर्डमध्येदेखील मागिल सात दिवसात कोव्हिड रुग्णांची संख्या सहा टक्क्यांपेक्षा अधिकने वाढली आहे.
 
एन वॉर्ड- रुग्ण 1892, डिस्चार्ज 625
एस वॉर्ड- रुग्ण 1619, डिस्चार्ज 343
 
याबाबत बोलताना मुंबई महापालिकेचे उपायुक्त विजय बालमवार यांनी म्हटलं, "पूर्व उपनगरातील या दोन वॉर्डमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढतेय. येत्या काही दिवसात ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. याचं कारण, 'चेसिंग द व्हायरस'. आम्ही व्हायरसला चेस करतोय. आधी दिवसाला 125 टेस्ट होत होत्या. आता दुप्पटपेक्षा चाचण्या केल्या जात आहेत. तपासण्यांची क्षमता ३५० पर्यंत पोहोचलीये. हाय-रिस्क कॉन्टॅक्टच्या तपासणीतून कोरोनाग्रस्त रुग्ण सापडून येत आहेत."
 
एन वॉर्डमधील परिसर - विक्रोळी, घाटकोपर, पंतनगर, पार्कसाईट, रमाबाई नगर
एस वॉर्डमधील भाग - पवई, कन्नमवार नगर, कांजूरमार्ग, भांडूप
"मागील काही दिवसात कोव्हिड-19च्या प्रकरणांमध्ये स्पाईक दिसून येत आहेत. याचं कारण, कोव्हिड रुग्णांचे हाय-रिस्क कॉन्टॅक्ट, गेल्या दोन वर्षात सिव्हिअर अक्युट रेस्पिरेटोरी इलनेस, इन्फ्लुएन्झा सारखी लक्षणं असणारे, 60 वर्षांवरील व्यक्ती आणि कंटॅमिनेशन झोनधील प्रत्येक व्यक्तीकडे दररोज महापालिका कर्मचारी चौकशी करतायत. आत्तापर्यंत 1 लाख लोकांचं सर्व्हेक्षण करण्यात आलंय," असं बालमवार पुढे म्हणाले.
 
कांजूर, भांडूप, घाटकोपर, विक्रोळी या भागात झोपडपट्यांची संख्या जास्त आहे. डोंगराळ भागातही झोपड्या वसलेल्या आहेत. ज्यात अत्यंत दाटिवाटीने लोकं राहतात.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती