IPL 2021 : कोरोना संसर्ग वाढत असताना कसे खेळवले जाणार आयपीएलचे सामने?

बुधवार, 7 एप्रिल 2021 (21:41 IST)
-जान्हवी मुळे
इंडियन प्रीमियर लीगच्या चौदाव्या मोसमाला जेमतेम दोन दिवसांत सुरुवात होणार आहे. पण या स्पर्धेवर कोरोना विषाणूच्या साथीचं सावट आहे.
 
भारतात कोव्हिडच्या रुग्णसंख्येचा उद्रेक, मुंबईतली जवळपास लॉकडाऊनसारखी परिस्थिती, एकामागोमाग एक खेळाडू, सपोर्ट स्टाफपैकी काहीजण कोव्हिड पॉझिटिव्ह असल्याच्या बातम्या यामुळे अनेकांच्या मनात शंका आहेत.
 
पण सगळं काही ठरलेल्या वेळापत्रकानुसारच होईल अशी ग्वाही बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी रविवारीच ANI या वृत्तसंस्थेशी बोलताना दिली आहे.
 
आयपीएलच्या सुरक्षित आयोजनासाठी बीसीसीआयनं काय तयारी केली आहे? खेळाडू आणि टीम्स कशी काळजी घेत आहेत आणि विशेषतः मुंबईत कोणती खबरदारी घेतली जाते आहे, याचा आढावा आम्ही घेतला.
 
'क्लस्टर कॅरव्हॅन' पद्धतीनं आयोजन
आयपीएलच्या तेराव्या मोसमाचे सामने दुबईत नोव्हेंबरमध्ये प्रेक्षकांशिवाय रिकाम्या स्टेडियममध्ये सामने खेळवण्यात आले होते. तेव्हा खेळाडूंना 'बायो बबल'मध्ये ठेवण्यात आलं होतं.
 
म्हणजे एखाद्या खेळाडूला टीम आणि टीमशी संबंधित व्यक्तींशिवाय बाहेरच्या जगातील कुणालाही थेट भेटण्याची परवानगी नव्हती. तेच नियम चौदाव्या मोसमासाठीही बंधनकारक आहेत.
 
खेळाडू हॉटेलमधून ठरलेल्या बसमध्ये चढतात, बसमधून थेट मैदानात जातात. सराव किंवा सामना संपला की बसमधूनच थेट हॉटेलमध्ये जातात. अशा पद्धतीची ही व्यवस्था आहे. बसचालकांचीही वेळोवेळी तपासणी केली जाते आहे.
 
आयपीएलचं वेळापत्रक आखताना खेळाडू, सपोर्ट स्टाफ आणि इतरांना जास्त प्रवास करावा लागणार नाही, याची काळजी घेण्यात आली आहे. यंदा मुंबई, चेन्नई, कोलकाता, बंगळुरूमध्ये दहा-दहा सामन्यांचं आयोजन होईल.
 
क्लस्टर कॅरव्हॅन फॉरमॅटनुसार हे सामने खेळवले जाणार आहेत. क्लस्टर कॅरव्हॅन प्रकार काय आहे? तर क्लस्टर म्हणजे एक गट आणि कॅरव्हॅन किंवा कारवां म्हणजेच वाहनांचा तांडा.
 
आयपीएलमध्ये चार चार टीम्सचा एक गट म्हणजे क्लस्टर तयार करण्यात आलं आहे आणि या क्लस्टरमधल्या चार टीम्स एकाच शहरात एकमेकांशी सामने खेळतील तसंच एकाच गटानं प्रवास करतील आणि पुढच्या सामन्यांसाठी दुसऱ्या शहरात दाखल होतील.
 
एकूण सहा शहरांत आयपीएलचं आयोजन होणार असून एकावेळी दोन शहरांत सामने खेळवले जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात मुंबई आणि चेन्नईत दहा-दहा सामने खेळवले जात आहेत. त्यासाठी चेन्नई, राजस्थान, दिल्ली आणि पंजाबच्या टीम्स सध्या मुंबईतच आहेत तर बाकीचे संघ चेन्नईत सराव करत आहेत.
 
मुंबई आणि चेन्नईतले सामने आटोपल्यावर अहमदाबाद आणि दिल्लीत आठ-आठ सामने खेळवले जातील. त्यानंतर कोलकाता आणि बंगळुरूमध्ये दहा-दहा सामने खेळवले जातील. तर प्लेऑफचे सामने अहमदाबादमध्ये होणार आहेत.
 
मुंबईत काय खबरदारी घेतली जाते आहे?
मुंबईत गेल्या काही दिवसांत दररोज दहा हजाराच्या आसपास नव्या कोव्हिड रुग्णांची भर पडते आहे. त्यात नाईट कर्फ्यू आणि वीकएण्ड लॉकडाऊनमुळे शहरात आयपीएलच्या आयोजनावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं होतं. राज्य शासनानं मुंबईत आयपीएलच्या सामन्यांना कडक अटींसह परवानगी दिल्यानं तो प्रश्न मिटला आहे.
 
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर 10 ते 25 एप्रिल दरम्यान आयपीएलच्या दहा सामन्यांचं आयोजन होणार आहे. पण गेल्या आठवड्यात याच वानखेडे स्टेडियमवरील काही ग्राऊंड्समनना कोव्हिडची लागण झाल्याचं स्पष्ट झालं होतं.
 
त्यानंतर मुंबई क्रिकेट असोसिएशननं (एमसीए) या कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या इतरांना विलगीकरणात ठेवलं आहे. एमसीएच्या इतर मैदानांवरील कर्मचारी वानखेडेवरील जबाबदारी सांभाळतील. पण नेमकी काय व्यवस्था करण्यात आली आहे?
 
एमसीएचे कार्यकारिणी सदस्य नदीम मेमन यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "आयपीएलच्या आयोजनाशी निगडीत सर्व कर्मचाऱ्यांची राहण्याची, जेवण्याची सोय आता त्या त्या व्हेन्यूजवळच करण्यात आली आहे. कोणालाही 25 तारखेपर्यंत घरी जाता येणार नाही. वीकएण्डला मुंबईत तसंही लॉकडाऊन आहे."
 
मुंबईत असलेल्या चारही टीम्सचा वानखेडे स्टेडियमशी अजून संबंध आलेला नाही, असंही मेमन यांनी स्पष्ट केलं.
 
सध्या मुंबईत उपस्थित असलेल्या चारपैकी दोन टीम्स वांद्रे कुर्ला संकुलातील एमसीएच्या मैदानात आणि इतर दोन टीम्स क्रिकेट क्लब ऑफ इंडियाच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर वेगवेगळ्या वेळेस सराव करत आहेत.
 
"सगळे कर्मचारी खेळाडूंप्रमाणेच एका वेगळ्या बायो-बबलमध्ये आहेत. त्यांचा खेळाडूंशी थेट संबंध येत नाही. अगदी ड्रेसिंगरूममध्येही खेळाडूंशिवाय इतर कोणीही जात नाहीत. तिथे साफसफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही बायोबबलमध्येच ठेवण्यात आलं आहे. ते पीपीई किट घालून काम करत आहेत. त्यांची वेळोवेळी तपासणी केली जाते आहे."
 
सामन्यापूर्वी आणि सामन्यानंतर जिथे लोकांचा वावर असतो, अशा जागा सॅनिटाईझ केल्या जात असल्याचंही मेमन यांनी सांगितलं. आयपीएलशी निगडीत सर्व कर्मचाऱ्यांची किमान चार दिवसांनी तपासणी केली जाते आहे.
 
"आतापर्यंत बीकेसी आणि ब्रेबॉर्नवरचा सराव निर्विघ्नपणे सुरू आहे. त्यामुळे आम्हाला आशा आहे की सगळं काही सुरळीतपणेच पार पडेल."
 
एमसीएला आपल्यासमोरच्या आव्हानांची कल्पना असल्याचंही मेमन कबूल करतात. "सगळे आपल्या घरापासून दूर आहेत आणि भीती तर अनेकांना वाटते आहेच. परिस्थिती खूप कठीण आहे, पण सगळेजण ज्या पद्धतीनं काम करत आहेत त्याचा मला अभिमान वाटतो."
 
मुंबईतल्या बाकीच्या क्रिकेट स्पर्धा आणि कांगा लीगच्या नॉक आऊट फेरीचे समात्र 15 मे पर्यंत स्थगित करण्यात आल्या आहेत.
 
चेन्नईत लसीकरण, दिल्लीत खबरदारी
मुंबईप्रमाणेच चेन्नई आणि दिल्लीतही कोव्हिडच्या रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढू लागली आहे. तामिळनाडूत झालेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चेन्नईतली परिस्थिती बिकट होण्याची भीती व्यक्त केली जाते आहे.
 
खबरदारीचा उपाय म्हणून तामिळनाडू क्रिकेट असोसिएशननं आधीच सर्व 80 कर्मचाऱ्यांचं लसीकरण केल्याचं वृत्त टाईम्स ऑफ इंडियानं दिलं आहे. लसीकरणानंतरही दर दहा दिवसांनी कर्मचाऱ्यांची कोव्हिड टेस्ट केली जाते आहे.
 
दिल्लीत आयपीएलचे सामने 28 एप्रिलपासून सुरू होणार आहेत. पण दोन आठवडे आधीच म्हणजे 10 एप्रिलपासून तिथल्या आयपीएलशी निगडीत कर्मचाऱ्यांना बायोबबलमध्ये ठेवण्याचा निर्णय दिल्ली अँड डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशननं घेतला आहे. तसंच अनेक कर्मचाऱ्यांना लशीचा पहिला डोसही देण्यात आला आहे.
 
आयपीएल टीम्स कशी काळजी घेत आहेत?
कोव्हिड टेस्ट केल्यावर आणि विलगीकरणात राहिल्यावरच खेळाडूंना आपापल्या संघात प्रवेश देण्यात आला आहे. बहुतांश फ्रँचायझींनी संपूर्ण हॉटेलच टीमसाठी बुक केलं आहे.
 
आयपीएलमधली टीम म्हणजे फक्त बारा-पंधरा खेळाडू नव्हेत. राखीव खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ मिळून प्रत्येक संघात किमान 50 ते 60 जणांचा समावेश आहे. या सगळ्यांना किमान दीड महिना बाहेरच्या जगाशी प्रत्यक्ष ठेवता येणार नाही.
 
बायो बबल कायम राखण्याची जबाबदारी पाळण्यासाठी काही टीम्सनी स्वतंत्र व्यवस्थाच केली आहे. त्याविषयी कोलकाता नाईट रायडर्सचे सीईओ वेंकी मैसोर यांनी काही दिवसांपूर्वी व्हर्च्युअल प्रेस कॉन्फरन्समध्ये बोलताना माहिती दिली.
 
वेंकी सांगतात की, त्यांच्या टीमनं बबल मॅनेजर आणि बबल इंटिग्रिटी मॅनेजरची नियुक्ती केली आहे. "आम्ही एका तज्ज्ञ डॉक्टरकडूनही सातत्यानं सल्ला घेतो आहोत. संपूर्ण टीम आणि कर्मचाऱ्यांनी बबल कायम राखण्याची जबाबदारी घेतली आहे."
 
गेल्या मोसमात युएईमध्ये मिळालेला अनुभव इथे कामी येईल असं त्यांना वाटतं.
 
चिंतेचं सावट आणि पर्यायी व्हेन्यू
एखाद्या शहरात काही कारणांमुळे सामने घेणं अशक्य झालं, तर पर्यायी व्हेन्यू म्हणून हैदराबादमध्ये सामने खेळवले जाऊ शकतात, अशी चर्चा आहे. तर काहींनी सामने किंवा स्पर्धाच रद्द करण्याची मागणीही केली आहे.
 
एमसीएचे नदीम मेमन त्याविषयी सांगतात, "कुणाच्याही आरोग्याशी खेळ होता कामा नये, हे आम्हीही जाणतो. म्हणूनच आम्ही पूर्ण काळजी घेतो आहोत. खेळाडूंनाही ते स्वीकारत असलेल्या धोक्यांची कल्पना आहे आणि ते खेळण्यासाठी तयार आहेत. आयपीएलमध्ये मोठ्या प्रमाणात पैसा गुंतलेला आहे. खेळाडूच नाही, तर शेकडो कर्मचाऱ्यांचं पोट त्यावर अवलंबून आहे."

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती