डोनाल्ड ट्रंप यांच्यावर महाभियोग चालणार -नॅन्सी पेलोसी

शुक्रवार, 6 डिसेंबर 2019 (11:45 IST)
सत्तेचा कथित दुरुपयोग केल्याप्रकरणी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्याविरोधात महाभियोग खटला चालणार आहे, असं अमेरिकेन संसदेच्या कनिष्ठ सभागृहाच्या सभापती नॅन्सी पेलोसी यांनी म्हटलं आहे.
 
"राष्ट्राध्यक्षांनी आमच्यासमोर दुसरा कोणताही पर्याय ठेवलेला नाही," असं पेलोसी यांनी म्हटलंय.
 
डोनाल्ड ट्रंप यांनी म्हटलं होतं की, "डेमोक्रॅटिक पक्षाला माझ्याविरोधात महाभियोगाचा प्रस्ताव आणायचा असेल, तर त्यांनी तो लवकरात लवकर आणावा."
 
नॅन्सी पेलोसी यांच्या वक्तव्यानंतर डोनाल्ड ट्रंप यांनी ट्वीट करत म्हटलं की, "तुम्हाला माझ्याविरोधात महाभियोग आणायचा असेल तर तो आताच आणावा. जेणेकरून सदस्य याची निपक्षपातीपणे चौकशी करू शकतील आणि देशाला आपलं पुढील काम करता येईल."
 
गुरुवारी सकाळी नॅन्सी पेलोसी यांनी संसदेत म्हटलं, "राष्ट्राध्यक्षांनी राजकीय फायद्यासाठी राष्ट्रीय सुरक्षेचा गैरवापर केला आहे. आपल्या राजकीय प्रतिस्पर्ध्याविरोधात चौकशी जाहीर करण्यासाठी त्यांनी लष्कराची मदत थांबवली."
 
"ही आमच्यासाठी दु:खद बाब आहे की, आमच्या राष्ट्राध्यक्षाविरोधात महाभियोग प्रस्तावाचा विचार करावा लागत आहे. संसदेत यावर निष्पक्ष सुनावणी होईल," असंही त्यांनी म्हटलं आहे.
 
ट्रंप काय म्हणाले?
"काहीच काम न करणाऱ्या डेमोक्रॅटिक पक्षानं माझ्याविरोधात महाभियोग चालवण्याची घोषणा केली आहे. रॉबर्ट मिलर यांच्या प्रकरणी आधीच त्यांची पीछेहाट झाली आहे. त्यामुळे आता यूक्रेनच्या राष्ट्राध्यक्षाबरोबर झालेल्या दोन वेळच्या संभाषणांना ग्राह्य मानून ते ही पावलं टाकत आहेत," असं ट्रंप यांनी ट्वीट केलं आहे.
 
"यापूर्वी क्वचितच वापरण्यात आलेला महाभियोग आता इथून पुढे राष्ट्राध्यक्षांविरोधात सर्रास वापरला जाऊ शकतो, अशी शक्यता यातून दिसते. देशाच्या संस्थापकांच्या मनात ही बाब नव्हती. चांगली गोष्ट आहे की, रिपब्लिकन पक्ष आज इतका यापूर्वी कधीच एकजूट नव्हता विजय आमचाच होईल."
 
महाभियोगप्रकरणी डोनाल्ड ट्रंप दोषी आढळल्यास त्यांना राष्ट्राध्यपदावरून पायउतार व्हावं लागेल.
 
आता काय होणार?
या प्रकरणी ट्रंप आणि यूक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेंस्की यांच्यातील फोनवरील संभाषणाची चौकशी होईल.
 
या संभाषणात डोनाल्ड ट्रंप यांनी पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाचे संभाव्य उमेदवार जो बाइडेन आणि त्यांचे पुत्र हंटर बाइडेन यांच्या चौकशीची कथित मागणी केली होती.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती