सुशांत सिंह राजपूतचे शेवटचे काही तास कसे होते?

सोमवार, 15 जून 2020 (12:21 IST)
मधु पाल वोहरा
 
बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतचे निधन झाले आहे. ही बातमी ऐकणाऱ्या प्रत्येकाचे डोळे पाणावल्याशिवाय राहिले नाहीत. टीव्ही मालिकेत अभिनयाचा ठसा उमटवल्यानंतर सिनेजगतामध्येही चांगलं नाव कमावणाऱ्या सुशांतने आत्महत्या केली आहे.
 
तो वांद्र्याच्या ज्या भाड्याच्या घरामध्ये राहात होता त्याच फ्लॅटमध्ये त्याने आत्महत्या केली आहे.
 
सुशांतच्या आत्महत्येचं कारण अद्याप समजलेलं नाही. परंतु त्याला गेले सहा महिने नैराश्यानं ग्रासलेलं होतं असं सांगितलं जातंय. सुशांतचा मुंबईत स्वतःचा एक फ्लॅट होता पण त्याला मोठ्या घरात राहायचं होतं म्हणून तो या फ्लॅटमध्ये गेल्या आठ महिन्यांपासून राहात होता. या फ्लॅटमध्ये तो एकटाच राहात नसे.
 
त्याच्याबरोबर त्याचे क्रिएटिव्ह मॅनेजर, त्याचा एक मित्र आणि जेवण करणारा एक नोकरही राहात होता. रविवारची सकाळ सुशांतच्या आयुष्यातली शेवटची सकाळ असेल असा या घरात राहाणाऱ्या कोणीही विचार केला नव्हता. सुशांत सिंहच्या नोकराने पोलिसांना सांगितले, सकाळपर्यंत सर्व काही ठीक होतं.
 
सकाळी 6.30 वाजता सुशांत उठला होता. 9 वाजता त्याला डाळिंबाचा रस दिला आणि तो त्याने प्यायलाही होता. त्यानंतर 9 वाजता सुशांतने बहिणीशी गप्पा मारल्या. त्यानंतर अभिनयाची कारकीर्द ज्याच्या बरोबर सुरू केली त्या महेश शेट्टीशीही त्याने फोनवर संवाद साधला. हे दोघे एकता कपूरच्या किस देश मे होगा मेरा दिल मालिकेत होते. दोघेही चांगले मित्र होते. सुशांतने शेवटचा फोन त्यालाच केला.
 
त्यानंतर तो खोलीत गेला आणि आतून लॉक करुन घेतले. सकाळी 10 वाजता जेवणाबद्दल विचारायला गेल्यावर सुशांतने प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर दोन तीन तासांनी मॅनेजरने सुशांतच्या बहिणीला फोन केला. बहीण आल्यावर कुलूप उघडणाऱ्या माणसाला बोलावण्यात आलं आणि दरवाजा उघडला.
 
त्यानंतर त्यांना जे दृश्य समोर दिसलं त्याने सर्वांनाच धक्का बसला. पोलिसांच्या मते सुशांतचा मृत्यू सकाळी 10 ते दुपारी 1 च्या मध्ये झाला असावा. त्याचा मृतदेह पाहून नोकराने पोलिसांना फोन केला. पोलिसांनी माध्यमांशी बोलताना आपल्याला त्याच्या मृत्यूची बातमी दोन वाजता मिळाल्याचे सांगितले. पोलीस 2.30 वाजता त्याच्या घरी पोहोचले आणि तपास सुरू केला.
 
पोलिसांना अद्याप कोणतीही सुसाईड नोट मिळालेली नाही. त्याच्या मृतदेहाला संध्याकाळी साडेपाच वाजता आरएन कूपर रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्याच्यावर पोस्ट मार्टेम होईल. मुंबई डीसीपी झोन-9 च्या अभिषेक त्रिमुखे यांनी म्हटलं आहे की पोस्टमार्टेमचा अहवाल आल्यावरच योग्य कारण सांगता येईल.
 
अद्याप कोणतीही संदिग्ध वस्तू सापडली नसल्याचं त्यांनी सांगितलं. सुशांत राजपूत 34 वर्षांचा अभिनेता होता. त्याने आपल्या अभिनयाद्वारे बॉलीवूडमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली होती. त्याचे वडील आणि संपूर्ण कुटुंब मुंबईत पोहोचत आहे.  आज सोमवारी त्याच्यावरील अंत्यसंस्काराची प्रक्रीया सुरू होईल.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती